धर्माचे रक्षण करणार्‍या उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा ! – कालीचरण महाराज यांचे आवाहन

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीला भाजपने नगरसेवकपद दिल्यावरून व्यक्त केला संताप

नाशिक – धर्माचे रक्षण करणार्‍या उमेदवारांच्या पाठीशी उभे रहावे. हिंदु मतांचे विभाजन टाळावे, तसेच हिंदूंच्या रक्षणासाठी राजकारणाचे ‘हिंदुकरण’ आवश्यक आहे, असे मत कालीचरण महाराजांनी व्यक्त केले. ते येथे शिवसेनेच्या प्रचारार्थ आले असतांना त्यांनी वरील वक्तव्य केले. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरण घडलेल्या शाळेचे सचिव तुषार आपटे यांना भाजपने कुळगावबदलापूर नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकपद (असा सदस्य ज्याची निवड थेट जनतेद्वारे मतदानातून न होता, महापालिका किंवा नगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे केली जाते) दिले होते; परंतु राज्यभरातून त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया उमटल्याने त्यांनी आता नगरसेवकपदाचे त्यागपत्र दिले आहे. महाराजांना आपटे यांना हे पद दिल्याच्या संदर्भात विचारले असता, त्यांनी त्यावर तीव्र संताप व्यक्त केला.

कालीचरण महाराज

बदलापूर येथील बलात्कार प्रकरण !

गेल्या वर्षी बदलापूरमधील एका शाळेत २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. स्थानिक नागरिकांनी रस्ते आणि रेल्वे रोखत तीव्र आंदोलन केले होते. या प्रकरणी चकमकीत मारला गेलेला शाळेतील स्वच्छता कर्मचारी अक्षय शिंदे याच्यासह तुषार आपटे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

कोण आहेत तुषार आपटे ?

अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणाच्या वेळी तुषार आपटे त्या काळात शाळा व्यवस्थापनात सचिव होते. गुन्हा नोंद झाल्यानंतर ते ४४ दिवस पसार होते. अखेर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अवघ्या ४८ घंट्यांत आपटे यांना जामीन संमत झाला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून आपटे जामिनावर बाहेर आहेत.