श्री महालक्ष्मीदेवी तीर्थक्षेत्र आराखड्यासह शहरात सर्व पायाभूत सुविधा देणार ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री

कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध !

कोल्हापूर, ९ जानेवारी (वार्ता.) – श्री महालक्ष्मीदेवी आणि जोतिबा देवस्थान यांचा १ सहस्र ४०० कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र आराखडा संमत करून वाराणसीच्या धर्तीवर कोल्हापूरची प्रगती करणे, रस्ते-पाणी, पंचगंगा नदी स्वच्छता, महापालिकेसाठी नवीन इमारत यांसह शहरात सर्व पायाभूत सुविधा देणारा महायुतीचा जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करत आहोत, असे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्या प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर, भाजपचे खासदार धनंजय महाडिक, भाजपचे आमदार अमल महाडिक, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांसह अन्य उपस्थित होते.

कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्धी प्रसंगी बोलतांना उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांसह अन्य

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘‘तीर्थक्षेत्र आराखडा होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आग्रही होते आणि ते याच्या पायाभरणीसाठी येणार आहेत. यात भूमी अधिग्रहण सोडून उर्वरित १७३ कोटी रुपयांची कामे चालू करण्यात आली आहेत. थेट पाणीवाहिनीद्वारे शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करणे, कोल्हापूरसाठी मोठ्या क्षमतेची विमाने चालू करणे, महिला बचत गटांसाठी स्वतंत्र बझार चालू करून केवळ त्यांच्याच वस्तू विकल्या जातील अशा सुविधा करणे, अशा प्रकारे ‘माणसांचा विकास’ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येणार्‍या निवडणुकीत महायुतीच्या ६५ पेक्षा अधिक जागा निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे.’’

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘कोल्हापूर शहराला महापुराचा फटका बसू नये म्हणून जागतिक बँकेचा ३ सहस्र ८०० कोटी रुपयांचा प्रकल्प संमत झाला आहे. यात नद्यांचे खोलीकरण, रूंदीकरण यांसह अतिरिक्त पाणी धाराशीव येथे देण्याचे प्रस्तावित आहे.’’

कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करतांना उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांसह अन्य

महायुतीच्या वचननाम्यातील ठळक घडामोडी

१. उद्योगभूमीला साहाय्य आणि नव्या ‘आय.टी. हब’ला मान्यता !

२. सार्वजनिक वाहतुकीसाठी २०० नवीन इलेक्ट्रिक बस आणण्याचे प्रयोजन !

३. शहर आणि उपनगरात सुरक्षिततेसाठी ‘सी.सी.सी.टी.व्ही.’चे जाळे !

४. ‘ऑक्सिजन पार्क’ आणि विरंगुळा केंद्राची निर्मिती !

५. प्रत्येक प्रभागात ‘बाळासाहेब ठाकरे आपले रुग्णालय’ !

६. प्रत्येक वर्षी भद्रकाली ताराराणी पुरस्कार !

‘जे मनात तेच मनपात’ असे घोषवाक्य महायुतीने घोषित केले असून ‘भगवा तिळगुळ घ्या महायुती बोला’, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.