ED Raids TMC : कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसच्या माहिती-तंत्रज्ञान विभागावर अंमलबजावणी संचालनालयाची धाड

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी पोचून धारिका (फाईल्स) घेतल्या कह्यात

ममता बॅनर्जी

कोलकाता (बंगाल) : येथे ८ जानेवारीला सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने निवडणूक रणनीतीकार संस्था ‘आयपॅक’चे प्रमुख प्रतीक जैन यांच्या कोलकात्यातील कार्यालयासह देशभरातील १५ ठिकाणांवर धाडी घातल्या. जैन तृणमूल काँग्रेसच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुखही आहेत. या धाडीची माहिती मिळताच संतप्त मुख्यमंत्री ममता बॅनर्जी थेट धाड घातलेल्या ठिकाणी पोचल्या आणि येथील अनेक धारिका (फाईल्स) घेऊन स्वतःच्या गाडीत ठेवल्या.

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर लोकशाही चिरडल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकार अन्वेषण यंत्रणांचा वापर करून विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. हा लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रकार आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि अन्वेषण यंत्रणा देशाप्रतीचे दायित्व विसरले आहेत. मला अशा प्रकारच्या कारवाईची पूर्वसूचना मिळाली होती. त्यामुळे पक्षाशी संबंधित सर्व महत्त्वाचा डेटा आणि हार्ड डिस्क आधीच सुरक्षित करण्यात आल्या आहेत. आम्ही या राजकीय षड्यंत्राला घाबरणार नाही.

ही कारवाई बनावट सरकारी नोकरी नियुक्ती पत्रांच्या घोटाळ्याशी, तसेच कोळसा घोटाळा प्रकरणासंबंधित मनी लॉन्ड्रिंग (काळ्या पैशाला पांढरा करण्याची प्रक्रिया) प्रकरणात केली आहे.