मध्यप्रदेशातील मंडला येथे १५ धर्मांतरित ख्रिस्ती नागरिकांनी केली ‘घरवापसी’ !

(घरवापसी म्हणजे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश )

मंडला (मध्यप्रदेश) – मंडला जिल्ह्यातील सुरंगदेवरी गावात काही वर्षांपूर्वी धर्मांतर केलेल्या ३ कुटुंबांमधील १५ ख्रिस्ती नागरिकांनी नुकताच हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. सुरंगदेवरी गावातील सिद्धेश्वरधाम येथे हा कार्यक्रम पार पडला. मंत्रोच्चार, हवन आणि पूजाविधी पूर्ण केल्यानंतर या ३ कुटुंबांनी विधिवत् हिंदु धर्म स्वीकारला.

१. आचार्य ललित मिश्रा यांनी प्रतिवर्षीप्रमाणे सिद्धेश्वरधाम येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने गावकरी आणि भक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या शेवटी जे कुटुंब स्वेच्छेने हिंदु धर्म स्वीकारू इच्छितात, त्यांच्यासाठी विधी केला जातो. या कार्यक्रमात ३ ख्रिस्ती कुटुंबांनी सनातन धर्माचा स्वीकार केला.

२. आचार्य ललित मिश्रा यांचे म्हणणे आहे की, लोभ, गरिबी किंवा इतर कारणांमुळे हिंदु धर्मापासून दूर गेलेल्यांना मूळ संस्कृतीकडे परत आणणे, हे त्यांचे कार्य आहे.

३. सनातन धर्म स्वीकारलेल्या ३ कुटुंबांतील सदस्यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी सामाजिक आणि वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी धर्मांतर केले होते; मात्र काळानुरूप त्यांना त्यांची मूळ परंपरा अन् संस्कृती यांच्याशी असलेले नाते अधिक दृढ वाटू लागल्याने त्यांनी पुन्हा सनातन धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला.