पुण्यातील श्री कसबा गणपति मूर्तीवरील शेंदूर काढल्यानंतर १५ व्या शतकातील मूळ मूर्ती प्रकट

१५ व्या शतकातील मूळ मूर्तीच्या मनोहारी रूपाचे दर्शन भाविकांना घेता येणार !

पूर्वीची शेंदूरलेपित मूर्ती

पुणे –  ऐतिहासिक ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री कसबा गणपति मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेस सोमवार, १५ डिसेंबरपासून प्रारंभ झाला होता. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मंदिर सर्व भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवले होते. शेंदूर कवच काढल्यावर आत अतिशय मनोहारी अशी मूळ स्वरूपातील मूर्ती समोर आली आहे. मूर्तीतज्ञ आणि पुरातत्व विभाग यांच्या माहितीप्रमाणे या मूळ मूर्तीचा कालावधी थेट १५ व्या शतकात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मंदिराच्या आतापर्यंतच्या उपलब्ध असलेल्या इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच झाल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेला देवस्थानचे खजिनदार हेरंब ठकार, विश्वस्त श्रीमती संगीताताई जयंता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मिहीर ठकार, मंदार ठकार, तेजस ठकार, हर्षद ठकार आदी उपस्थित होते. ९०० किलो वजनाचा शेंदूर लेप काढल्यावर ही मूळ मूर्ती समोर आली आहे, तसेच मूर्तीचे तत्कालीन कोरीव काम केलेले दगडी सिंहासन आणि प्रेक्षणीय गाभार्‍याचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या या मूळ स्वरूपातील मूर्तीचा पुनर्प्राणप्रतिष्ठापना सोहळा २९ डिसेंबरला मंदिराचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार, मधुरा विनायक ठकार, विश्वस्त स्वानंद मयुरेश्वर ठकार, साक्षी स्वानंद ठकार यांच्या शुभहस्ते पार पडला.

शेंदूर काढल्यानंतर मूळ स्वरूपात प्रकट झालेली मूर्ती

गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक पुरातन स्वयंभू श्रींच्या मूर्तीवरील शेंदूरमिश्रित कवच गळून पडत होते. ग्रामदैवत श्री कसबा गणपति तमाम गणेशभक्तांचे नवसाला पावणारे आराध्यदैवत आहे. त्यामुळे भविष्यात कुठलाही दुर्धर प्रसंग उद्भवू नये, म्हणून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेंदूर कवच काढण्याची प्रक्रिया करण्यात आली. शेंदूर कवच काढण्याकरिता विविध मूर्तीतज्ञ, धार्मिक क्षेत्रातील तज्ञ अन् पुरातत्व विभागाकडूनही मार्गदर्शन घेण्यात आले होते. शेंदूर कवच काढणे आणि अन्य प्रक्रिया २ आठवड्यांत पार पडली.

पुनर्प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम

पुनर्प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंदिराकडून सनई वादन, अथर्वशीर्ष पठण, ढोल-ताशा वादन, कीर्तन महोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशभक्तांनी या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मंदिराकडून करण्यात आले आहे.

मूळ मूर्तीची माहिती

श्री जयति गजानन मूळ मूर्ती साधारण २ फूट उंच असून चतुर्भुज आहे. चतुर्भुज पैकी एक डावा हात अभय मुद्रेत, एक उजवा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. दुसर्‍या डाव्या हातात मोदक आणि मोदकावर सोंड ठेवलेली असून, उजव्या बाजूला खालच्या बाजूस मूषक वाहन आहे. ही मूर्ती डाव्या सोंडेची असून मूर्तीची अर्ध पद्मासनाची बैठक आहे. लंबकर्ण आणि लंबोदर ही मूर्तीची इतर वैशिष्ट्ये आहेत.