Karni Sena Threat : महाराणा प्रताप यांच्याविषयी अवमानकारक विधान करणार्‍या पंजाबच्या राज्यपालांना क्षत्रिय करणी सेनेची धमकी

पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया व क्षत्रिय करणी सेनेचे संस्थापक राजसिंह शेखावत

जयपूर (राजस्थान ) : क्षत्रिय करणी सेनेचे संस्थापक राजसिंह शेखावत यांनी पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांना सामाजिक माध्यमांतून धमकी दिली आहे. करणी सेनेशी संबंधित सदस्यांना आवाहन करत त्यांनी म्हटले आहे, ‘हा मनुष्य जिथे दिसेल, तिथेच त्याला ठार करा.’ ४ दिवसांपूर्वी कटारिया यांनी महाराणा प्रताप यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर शेखावत यांनी ही धमकी दिली आहे. करणी सेनेतील अनेक सदस्यांनी राज शेखावत यांच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला आहे. धमकीविषयी माहिती समोर आल्यानंतर उदयपूरचे पोलीस अधीक्षक योगेश गोयल यांनी सांगितले की, प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे.


गुलाबचंद कटारिया यांनी काय म्हटले होते ?

२२ डिसेंबर या दिवशी गुलाबचंद कटारिया उदयपूरजवळील गोगुंदा येथील धूली घाटी येथे भूमीपूजन सोहळ्यात सहभागी झाले होते. त्या प्रसंगी भाषणात त्यांनी म्हटले की, महाराणा प्रताप यांचे नाव पूर्वी काँग्रेसच्या सत्ताकाळात ऐकायला मिळत होते; मात्र त्यांना प्रथम जनसंघानेच जिवंत ठेवले.


कटारिया यांनी महाराणा प्रताप यांना प्रथमच जिवंत केल्याचा केलेला उल्लेख करणी सेनेकडून तीव्र विरोधास कारणीभूत ठरला आहे. क्षत्रिय करणी सेनेने या विधानाला ‘मेवाडच्या अभिमानाचा अपमान’ असे संबोधले. याच पार्श्वभूमीवर राज शेखावत यांनी कटारिया यांच्या विरोधात कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कटारिया यांनी यापूर्वीही केले होते वादग्रस्त विधान

महाराणा प्रताप यांच्याविषयी गुलाबचंद कटारिया यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधान केले आहे. त्यानंतर विरोधाच्या पार्श्वभूमीवर त्यांना क्षमा मागावी लागली होती. वर्ष २०२० मध्ये राजसमंद येथील जनसभेत त्यांनी केलेल्या विधानावर मोठा वाद निर्माण झाला होता आणि शेवटी त्यांना ३ वेळा सार्वजनिकरीत्या दिलगिरी व्यक्त करावी लागली होती.