आतंकवादी जुबेरचे अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्याशी असलेले संबंध उघडकीस !

  • न्यायवैद्यक पडताळणीच्या अहवालातून माहिती उजेडात !

  • जुबेरला ३ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – ‘अल कायदा’ या आतंकवादी संघटनेच्या विचारसरणीशी संबंधित असलेला अतिरेकी जुबेर इलीयास हंगरगेकर याचे अफगाणिस्तान, हाँगकाँग यांच्याशी असलेले संबंध उजेडात आले आहेत. ‘न्यायवैद्यक’च्या (फॉरेन्सिक) पडताळणीच्या प्राथमिक अहवालामध्ये ही माहिती आढळून आली आहे. जुबेरचा भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणकाचे (लॅपटॉप) ‘न्यायवैद्यक प्रयोगशाळे’त विश्लेषण केल्यानंतर मोठ्या प्रमाणात माहिती अन्वेषण यंत्रणांना मिळाली आहे.

१. जुबेरच्या ‘टेलीग्राम’ गटातील १०२ आय.डी.पैकी ४ आयपी अ‍ॅड्रेस मिळाले आहेत. त्यातील ३ आयपी अ‍ॅड्रेस अफगाणिस्तानचे, १ हॉगकाँगचा आहे.

२. भ्रमणसंगणक आणि भ्रमणभाष यांमधून ‘अल कायदा इन इंडियन सब कॉंन्टीनेट मॅनिफेसीटेशन’ आणि ‘इन्सस्पायर मॅग्झिन’ आढळले आहे. त्यातून स्फोटके सिद्ध करण्याचा आराखडा (फॉर्म्युला) मिळाला आहे.

३. जुबेरच्या एका साथीदाराने २८ ऑक्टोबर या दिवशी पुण्यातील कोंढवा भागातील सभेत संशयित पुस्तकांचे वितरण केले होते. ती पुस्तके आणि काही कागदपत्रे काळेपडळ येथील मदरशामध्ये जाळली होती, ती जागा अन्वेषण यंत्रणांनी शोधली आहे.

४. जुबेरला वर्ष २०२५ मध्ये अबू अनस नावाच्या व्यक्तीने खिलाफत आणि इसिसच्या काही चित्रफिती दाखवल्या. वर्ष २०२१ मध्ये मुलांच्या शारीरिक, क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण ठाण्यातील पडघा येथे घेतले होते, तेही ठिकाण त्याने दाखवले.

५. जुबेर आणि त्याचे साथीदार भारतात खिलाफतचे राज्य आणून शरीयत कायदा लागू करण्याच्या सिद्धतेत होते. इसिस, अल कायदा अशा आतंकवादी संघटनांची विचारसरणी आणण्यासाठी मुसलमान तरुणांचे मनपरिवर्तन करत होते. त्यांना धार्मिक विचार देऊन कट्टर धार्मिकतेकडे वळवत होते.