
छत्रपती संभाजीनगर – प्रतिदिन गीतेचे वाचन करणारे, पांडुरंगाची पुष्कळ भक्ती, सर्वांना प्रेम आणि आनंद देणारे, तसेच निरपेक्ष वृत्तीने जीवन जगणारे मूळचे देशगव्हान, अंबड येथील आणि आता छत्रपती संभाजीनगर येथे राहून साधना करणारे श्री. गोविंदराव कुलकर्णी (वय ९२ वर्षे) यांनी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता एका प्रवचनात घोषित करण्यात आली. १५ डिसेंबर २०२५ (मार्गशीर्ष कृष्ण एकादशी) या दिवशी सनातनचे साधक श्री. प्रकाश कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शनामध्ये ‘साधना प्रवास कसा असतो ? साधना करत असतांना सत्त्वगुणामध्ये कशी वाढ होते ? आणि सत्त्वगुण वाढल्यावर प्रगती कशी होते ?’ याविषयी मार्गदर्शन करत असतांना ही आनंदवार्ता सर्वांना दिली. कुलकर्णी आजोबा वारकरी संप्रदायानुसार साधना करतात. आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर त्यांना विठ्ठलाची प्रतिमा आणि खाऊ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पांडुरंगाची प्रतिमा भेट स्वरूप मिळाल्यावर ‘आज साक्षात् पांडुरंगच घरी आला आहे’, असे आजोबांना वाटले आणि सत्कार झाल्याचा दिवसही एकादशीचा होता, तर त्यांना ‘हा जणू दैवी योगच आहे’, असे वाटले.
श्री. गोविंदराव कुलकर्णी यांच्याविषयी त्यांचा मुलगा श्री. प्रकाश कुलकर्णी यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. बाबांचे वागणे हे निरपेक्ष आहे.
२. स्वतःची सर्व कामे ते स्वतः करतात.
३. ते प्रतिदिन पहाटे ४ ते ५ या वेळेत गीतेचे वाचन करतात आणि रात्री ७ ते ८ या वेळेत नामजप करतात. घरात कुणीही आले, तरी ते नामजप करतात.
४. आरती म्हणत असतांना बर्याच वेळा त्यांची भावजागृती होत असते.
५. त्यांची पांडुरंगावर पुष्कळ भक्ती आहे. ‘पांडुरंग माझ्यासमवेत नेहमी असतो, त्यामुळे मला काही होत नाही’, असा त्यांचा भाव असतो. ‘मी जेथे आहे, तेथे तू माझा सांगाती’, असा त्यांचा भाव असतो.
६. ते नेहमी आनंदी असतात. कधीही कुणावर चिडत नाहीत.
७. पांडुरंगाची वारी करून आल्यावर जालना येथे गुरूंचे दर्शन घेऊन ते छत्रपती संभाजीनगरला एकटेच घरी आले. आल्यावर आवरून लगेच गुरुपौर्णिमा असलेल्या स्थळी गेले. ते कधीच थकत नाहीत.
‘आज गुरुदेवांनी हा आनंददायी क्षण अनुभवायला दिला. आज मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली, हे माझे परम भाग्य आहे. गुरुमाऊलींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’
पांडुरंगावर अतुट श्रद्धा असणारे छत्रपती संभाजीनगर येथील श्री. गोविंदराव केशवराव कुलकर्णी !

‘श्री. गोविंदराव कुलकर्णीआजोबा हे छत्रपती संभाजीनगर येथील असून ते पूर्वी शेती करायचे. छत्रपती संभाजीनगर येथील साधक श्री. गोविंदराव कुलकर्णी यांना वर्ष १९७५ मध्ये टेबुर्नी, ता. भोकरदन (जिल्हा जालना) येथील ह.भ.प. वासुदेवराव महाराज देव यांच्याकडून गुरुमंत्र मिळाला. गेल्या २० वर्षांपासून कुलकर्णीआजोबा आषाढी एकादशीला छत्रपती संभाजीनगर ते पंढरपूर (३१६ कि.मी.) एकटेच पायी वारी करतात. असे त्यांचे अजूनही चालूच आहे. तसेच त्यांचा दिवसभर नामजपासाठी प्रयत्न चालू असतो.
कुलकर्णीआजोबा प्रतिदिन गीतेचा अभ्यास करतात, तसेच ते देवपूजा करण्यात २ घंट्यांपेक्षा अधिक वेळ तल्लीन होतात. देवाची आरती करतांना नेहमी त्यांचा भाव जागृत होतो.
४.१२.२०२५ या दिवशी माझी श्री. कुलकर्णीआजोबा यांची त्यांच्या घरी भेट झाली. त्या वेळी त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. ‘आपले घर म्हणजे पांडुरंगाचा आश्रम आहे’, या भावाने ते घराची स्वच्छता करतात.
२. आजोबा स्वतःची कामे स्वतः करतात. त्यांचे आरोग्य उत्तम आहे. त्यांना कुठलेही रोग नाहीत आणि अपवाद वगळता आजारपण आलेले नाही.
३. पांडुरंगावर त्यांची अतूट श्रद्धा असून ‘सर्वकाही तोच करतो’, असा त्यांचा भाव असतो.
४. आजोबांकडे पाहून भाव आणि आनंद जाणवतो, तसेच ‘ते कर्मयोगी आणि भक्तीयोगी आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्या बोलण्यात मधुरता आहे. ‘त्यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे वाटते.
५. माझ्या मनात विचार आला की, ‘कुलकर्णीआजोबांना स्वप्नात विठ्ठलाचे दर्शन झाले आहे.’ म्हणून मी आजोबांना विचारले, ‘‘तुम्हाला स्वप्नात विठ्ठलाचे दर्शन झाले आहे का ?’’ त्यावर आजोबा म्हणाले, ‘‘हो. झाले आहे.’’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१२.२०२५)
फोंडा, गोवा येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी आलेली अनुभूती
फोंडा, गोवा येथे मे २०२५ येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी श्री. प्रकाश कुलकर्णी हे यज्ञासाठी बसले होते. तेव्हा आजोबा (श्री. गोविंदराव कुलकर्णी) पूर्ण वेळ यज्ञस्थळी बसून होते. शंखनाद महोत्सवाच्या सेवेसाठी श्री. प्रकाश कुलकर्णी हे ८ दिवस आधीच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. त्या वेळी आजोबा सर्व साधकांसमवेत रेल्वेने महोत्सवाला आले होते. आजोबा पैठणला गेल्यावर किमान ५० जण तरी त्यांना भेटून नमस्कार करतात. याचा काडीमात्र अहंकार आजोबांना नाही. ‘सगळे काही पांडुरंगाचे आहे’, असा त्यांचा भाव असतो.
प्रवचनाला उपस्थित जिज्ञासू श्री. शिरीष बर्दापूरकर हे मनोगत व्यक्त करत असतांना म्हणाले, ‘‘नामजपाचे महत्त्व ठाऊक होते; पण माझ्याकडून नामजप केला जात नव्हता. आज सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांचे मार्गदर्शन ऐकल्यावर ‘नामजपाने कसा लाभ होतो ? आणि कशी प्रगती होते ?’ हे सर्व शिकायला मिळाल्यामुळे आजपासूनच मी नामजप करायला प्रारंभ करणार आहे.’’
कु. चैताली डुबे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांचे मनोगत
१. श्री. कुलकर्णीआजोबांचे वय सध्या ९२ वर्षे आहे. या वयातही ते पंढरपूर वारीला चालत जातात. ते वारीला जाण्यापूर्वी चालण्याचा सराव नियमित करत होते.
२. जेव्हा ते आश्रमात येतात, तेव्हा ते नेहमी आनंदी असतात. आश्रमात आल्यावर पहिले गुरुदेवांना नमस्कार करतात.
३. ‘घरकामाला बाई येते, तरी घर हा आश्रम आहे’, असा भाव ठेवून आजोबा सेवा म्हणून प्रतिदिन घर स्वतः झाडतात.
४. आजोबा प्रत्येक एकादशीला पैठणला जातात.
५. आजोबांचे घर मुख्य रस्त्यावरून पुष्कळ आत आहे, तेथे रिक्शा सहजरित्या मिळत नाही. त्यांना मंदिरात जायचे असेल आणि श्री. प्रकाश कुलकर्णी (मुलगा) घरी नसतील, तर ते कुठलीही तक्रार न करता चालत जातात.
६. आजी कधी रुग्णालयात भरती असतील, तर स्वतःची साधना पूर्ण करून आजोबा रुग्णालयात आजीची काळजी घेण्यासाठी थांबतात.
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !