ज्वलंत विषयांवर सार्वजनिक चर्चा आणि सनातन संस्कृतीचे जवळून दर्शन घडवून आणणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ इंद्रप्रस्थ (देहली) मधील ‘भारत मंडपम्’मध्ये पार पडला. सनातन संस्थेच्या या राष्ट्रीय  महोत्सवामध्ये सहभाग घेण्याचा योग मला मिळाला. १३ डिसेंबर २०२५ या दिवशी दुपारी ३ वाजता चालू झालेल्या सत्रांपासून मी महोत्सवात सहभागी झालो. त्या दिवशी ‘स्वराज्य संवाद : छत्रपती शिवाजी महाराज यांची दृष्टी आणि वर्तमान भारत’, ‘सनातन संस्कृतीचे रक्षण’ आणि ‘मंदिर रक्षण संवाद’ ही ३ चर्चासत्रे पार पडली. चर्चासत्रांतील वक्त्यांनी अभ्यासपूर्वक चर्चा करून तिन्ही महत्त्वाचे विषय प्रेक्षकांना सविस्तरपणे अवगत केले.

१३ डिसेंबर २०२५

१. ‘स्वराज्य संवाद : छत्रपती शिवाजी महाराज यांची दृष्टी आणि वर्तमान भारत’ चर्चासत्र

१ अ. चर्चासत्र सादरकर्ते मान्यवर : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदुत्वनिष्ठ लेखिका सौ. शेफाली वैद्य, ‘सरयु फाऊंडेशन’चे श्री. राहुल दिवाण, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’चे श्री. उदय माहुरकर, ‘छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी’चे महासचिव कर्नल मोहन काकतीकर (निवृत्त) हे मान्यवर, तर या चर्चासत्राचे सूत्रसंचालन ‘जागरण टीव्ही’च्या राजकीय संपादिका स्मृती रस्तोगी यांनी केले.

१ आ. छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी वर्तमान भारताला मार्गदर्शक : १७ व्या शतकामध्ये उत्तर भारतामध्ये दृढ झालेली मोगलांची सत्ता होती, तर नर्मदा नदीच्या दक्षिणेला महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश येथे ३ बहामनी सुलतानांचे राज्य (आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही) स्थिर झालेले होते. हरिहर आणि बुक्कराय या सम्राटांनी वर्ष १३३६ मध्ये दख्खनमध्ये स्थापन केलेल्या विजयनगरच्या साम्राज्यामध्ये कृष्णा नदीच्या दक्षिणेचा जवळजवळ सर्व भारत होता. बहामनी सुलतानांनी एकत्र होऊन वर्ष १५६५ मध्ये तालिकोटाच्या लढाईमध्ये विजयनगर साम्राज्याचा पराभव केला. तेव्हापासून वर्ष १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होईपर्यंत १०९ वर्षे भारतात हिंदु राजा झालेला नसल्यामुळे हिंदूंना कुणी वाली नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हे पुष्कळ मोठे स्थित्यंतर होते. देहलीचे मोगल आणि दख्खनचे सुलतान यांच्या प्रचंड सैन्यशक्तीला हरवून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले ‘श्रींचे हिंदवी स्वराज्य’ हे सनातन धर्माधिष्ठित, न्यायाधिष्ठित आणि प्रजाहितदक्ष होते. हिंदवी स्वराज्यामध्ये प्रजेची काळजी घेतली जात असे. सह्याद्री पर्वतातील रहिवासी, म्हणजेच मावळ्यांमध्ये देशभक्तीची जागृती करून त्यांच्या साहाय्याने देहलीचा बादशाह आणि दख्खनचा सुलतान यांच्याविषयी चाणक्यनीती वापरून अन् त्यांच्या सैन्यबळाविरुद्ध गनिमी काव्याची लढत देऊन हिंदवी स्वराज्य स्थिर केले. केवळ

५० वर्षांच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिळवलेले उत्तुंग यश लक्षणीय आहे, जसे की, अफझलखानाचा वध, शाहिस्तेखानाला स्वराज्यातून पळवून लावणे, आगर्‍याहून सुटका, सुरतेची २ वेळा लूट, राज्याभिषेक इत्यादी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दख्खनच्या मराठ्यांमध्ये रूजवलेली प्रेरणा अतुलनीय होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू (वर्ष १६८०), औरंगजेबाने केलेली छत्रपती संभाजी महाराज यांची निर्घृण हत्या (वर्ष १६८९), राणी येसूबाई आणि बालराजा शाहू औरंगजेबाच्या कैदेत (वर्ष १६८९ ते १७०७), छत्रपती राजाराम महाराज जिंजीला परागंदा (वर्ष १६९० ते १७००), असे अनेक आघात पचवून महाराष्ट्रामध्ये राजाचे अधिष्ठान नसतांना आणि शिवछत्रपतींच्याच प्रेरणेने त्यांच्या पश्चात मराठ्यांनी २७ वर्षे मोगलांशी लढा दिला अन् औरंगजेबाला जेरीस आणला. औरंगजेब त्याच्या मृत्यूपर्यंत (वर्ष १७०७) महाराष्ट्रावर अधिसत्ता मिळवू शकला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘राज्यव्यवहारकोश’ यांसारखे मार्गदर्शक ग्रंथ सिद्ध करून सात्त्विक प्रवृत्तीचे प्रशासन निर्माण केले आणि परकीय गुलामी मानसिकता नष्ट केली.

‘छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी वर्तमान भारताला मार्गदर्शक आहे’, हा या प्रथम चर्चासत्राचा निष्कर्ष आहे.

विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त)

विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त)विविध क्षेत्रांतील तज्ञांना पाचारण करून त्यांच्याकडून वर्तमानातील ज्वलंत विषयांवर सार्वजनिक चर्चा घडवून आणल्याविषयी सनातन संस्थेचे अभिनंदन ! विशेष जाणवलेले सूत्र, म्हणजे सनातनचे सर्व साधक देशभक्तीने प्रेरित असून ते परस्परांविषयी करत असलेला आदरभाव पाहून महोत्सवामध्ये सनातन संस्कृतीचे जवळून दर्शन झाले.

– विंग कमांडर विनायक पुरुषोत्तम डावरे (निवृत्त)

२. ‘सनातन संस्कृतीचे रक्षण’ चर्चासत्र

२ अ. सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी कायद्याच्या कठोर कार्यवाहीची आवश्यकता ! : वर्ष १९४७ मधील देशाच्या विभाजनानंतर राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे देशभरात झालेले सनातन संस्कृतीचे पतन अत्यंत हानीकारक आहे. प्रचंड प्रमाणात झालेली आणि होत असलेली विदेशी मुसलमानांची घुसघोरी, अनिर्बंध धर्मांतर (विशेषतः आदिवासी क्षेत्रांमध्ये) आणि हिंदु जन्मदरात झालेली लक्षणीय घट या कारणांमुळे भारताच्या ८०० पैकी २०० जिल्ह्यांमध्ये हिंदु अल्पसंख्य झालेले आहेत. भारतातील हिंदु लोकसंख्येतील ही घट अशीच चालू राहिली, तर येत्या १२ वर्षांमध्ये संपूर्ण भारतात हिंदु अल्पसंख्यांक होतील. तमिळनाडू, तेलंगाणा, कर्नाटक, छत्तीसगड या राज्यांतील शासनकर्त्यांच्या सनातनविरोधी धोरणांमुळे हिंदु संस्कृतीवर पुष्कळ मोठे संकट आलेले आहे. ‘घुसखोरांना देशाबाहेर हाकलणे आणि त्यांना आळा घालणे, नागरिकत्व सुधारणा कायदा अन् राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिया कायदा कडकपणे कार्यवाहीत आणणे, धर्मांतर थांबवणे, तसेच हिंदु जन्मदरात वाढ करणे, या गोष्टी त्वरित करण्यासाठी सर्व सनातनी वृत्तीच्या नागरिकांना आवाहन केले पाहिजे. वरील गोष्टी कार्यवाहीत आणल्याविना सनातन संस्कृतीचे रक्षण होणार नाही’, हा या चर्चासत्राचा निष्कर्ष आहे.

३. ‘मंदिर रक्षण संवाद’ चर्चासत्र

३ अ. चर्चासत्र सादरकर्ते मान्यवर : तंजावूर (तमिळनाडू) येथील वेदप्रचाररत्न वेदकुलपती श्री. जी.के. सीतारामन्, सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता श्रीधर पोतराजू, श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संयोजक श्री. सुनील घनवट. वृत्तनिवेदिका श्वेता त्रिपाठी यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.

३ आ. देशातील सर्व मंदिर संचालकांनी समान धोरणे कार्यवाहीत आणणे महत्त्वाचे ! : ८०० वर्षांच्या पारतंत्र्याच्या काळामध्ये भारतातील सहस्रो सनातनी मंदिरांना नष्ट करून त्यांच्यावरच मशिदी बांधण्यात आल्या. सनातन संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर वास्तविक त्या सर्व मंदिरांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक होते; परंतु हिंदुद्वेषी शासनकर्त्यांच्या मुसलमानांच्या तुष्टीकरणामुळे हिंदुविरोधी कायदे कार्यवाहीत आणून मंदिरांच्या पुनरुज्जीवनाला आळा घातला गेला. अयोध्येमध्ये श्रीरामजन्मभूमीवर प्रभु रामलल्लाला विराजमान करण्यास ५०० वर्षे लागली. श्रीकृष्ण जन्मभूमीचे पुनर्स्थापन, श्री काशीविश्वेश्वर येथील पुनरुज्जीवन इत्यादी संघर्ष चालू आहेत. सनातनी आंदोलनांनी त्या क्षेत्रांमध्ये बरीच प्रगती केलेली आहे, तरी त्याला गती येऊन संपूर्ण यश येणे आवश्यक आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये दुर्दैवाने स्वतंत्र भारताच्याच सरकारांनी मंदिरांच्या संपत्तीवर घाला घातला. शासनकर्त्यांनीच मंदिरांची संपत्ती लुटून त्यातून मशिदी आणि चर्च यांना निधी पुरवला अन् अजूनही पुरवत आहेत. सनातनविरोधी धोरणांमध्ये पालट करून सनातन प्रवृत्तीची शासने परिस्थितीमध्ये पालट करत आहेत; परंतु सनातनविरोधी शासनकर्ते अजूनही मंदिरांवर घाला घालून त्यांना लूटत आहेत. सनातनी मंदिरांची संपत्ती हिंदु धर्मासाठीच वापरली पाहिजे. त्यासाठी सर्व सनातनींनी एकत्र येऊन आंदोलन करणे आवश्यक आहे.


१४ डिसेंबर २०२५

१. स्वराज्य काळातील शौर्यनाद

कोल्हापूर येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’चे आचार्य श्री. लखन जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी ‘स्वराज्य काळातील शौर्यनाद’ सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील विविध शस्त्रास्त्रांचे कौशल्य दर्शवणारी अप्रतिम प्रात्यक्षिके करून दाखवली.

२. उद्बोधन सत्र : सनातन कार्यदर्शन

या सत्रामध्ये ‘सनातन राष्ट्र स्थापना, रामराज्य स्थापना, स्वराज्याचे स्मरण आणि शौर्यजागृती, लोकसंख्या असंतुलन : समस्या तथा समाधान, राष्ट्रीय सुरक्षा’ या महत्त्वाच्या विषयांवर विविध मान्यवर हिंदुत्वनिष्ठांनी उद्बोधित केले. या उद्बोधन सत्रामध्ये ‘हिंदु जनजागृती समिती’चे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, ‘विश्व हिंदु परिषदे’चे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष अधिवक्ता आलोक कुमार, ‘सुदर्शन वृत्तवाहिनी’चे मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाणके, देहलीचे संस्कृती आणि न्याय मंत्री श्री. कपिल मिश्रा, सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. उदय माहुरकर, ‘हिंदु जनजागृती समिती’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

 

३. रणसंवाद : भारताची सामरिक नीती

या चर्चासत्रामध्ये भारताच्या सामरिक नीतीच्या संदर्भामध्ये विविध विशेषज्ञांनी चर्चा आणि उद्बोधन केले.

३ अ. चर्चासत्र सादरकर्ते मान्यवर : ब्रिगेडियर संजय अग्रवाल (निवृत्त); विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त); कर्नल आर्.एस्.एन्. सिंह, ‘रॉ’चे माजी अधिकारी; श्री. नीरज अत्री, अध्यक्ष, नॅशनल सेंटर फॉर हिस्टोरिकल रिसर्च आणि कंपॅरिटिव्ह स्टडीज; अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद; श्री. अशोक श्रीवास्तव, संपादक, डी.डी. न्यूज; श्री. राहुल कौल, अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर.

या रणसंवादाचे सूत्रसंचालन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. या रणसंवादासाठी निवडलेले विषय वर्तमान स्थितीशी निगडित होते. सर्व विशेषज्ञांनी उत्तम विश्लेषण करून श्रोत्यांना आपलेसे केले. सनातन राष्ट्राविषयी भारतीय सैनिकांच्या श्रद्धेविषयी सांगतांना विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त) यांनी सैन्यातील विविध ‘रेजिमेंट्स’च्या (पथकाच्या) युद्धघोषणा सांगितल्या. या घोषणा उपस्थितांना इतक्या आवडल्या की, त्यांनी उत्स्फूर्तपणे सैनिकांना पाठिंबा देणार्‍या राष्ट्रीय घोषणा दिल्या.

– विंग कमांडर विनायक पुरुषोत्तम डावरे (निवृत्त), पुणे (१७.१२.२०२५)