‘करुणात्रिपदी’ची जन्मकथा

गेले काही दिवस समाजमाध्यमांवर परमहंस परिव्राजकाचार्य (प.प.) श्री टेंब्येस्वामी यांच्याविषयी एक खोटी कथा पुष्कळ प्रसारित झाली. त्यातील सर्व संदर्भ खोडसाळपणेच सिद्ध केलेले होते. एका मंदिराचा पुजारी देवाचा नैवेद्य खातो; म्हणून टेंब्येस्वामी त्याला रागावतात आणि ते पाहून दत्तप्रभु चिडून स्वामींना ओरडतात, ‘आमचे पुजारी किंवा विश्वस्त काय करतात, ते आम्हाला ठाऊक असते आणि त्यावर आमचे लक्ष असते… इत्यादी.’ मग स्वामी त्यांची क्षमा मागून ही करुणात्रिपदीची करुणा भाकतात’, अशा स्वरूपाची ती पूर्णपणे खोटी गोष्ट सर्वत्र प्रसारित होत होती. ही गोष्ट स्वतःच्या चुकांवर रितसर पांघरूण घालण्यासाठीच कुणीतरी मुद्दाम रचलेली आहे, हे स्पष्ट दिसून येते. असा कोणताही प्रसंग प.प. टेंब्येस्वामींच्या चरित्रात कधीही घडलेला नाही. ‘करुणात्रिपदी’ची रचना होण्यामागे एक महत्त्वाची गोष्ट घडलेली होती, तीच या लेखातून येथे देत आहोत.

१. दत्तप्रभूंची उत्सवमूर्ती पालखीतून खाली येणे

श्रीक्षेत्र नरसोबाचीवाडी ही श्रीदत्तप्रभूंची राजधानी मानली जाते. या स्थानावर भगवान श्रीनृसिंह सरस्वतीस्वामी महाराज यांचे १२ वर्षे वास्तव्य झालेले आहे. त्यांच्या ‘मनोहर पादुका’ कृष्णा काठावरील औदुंबर वृक्षाखाली स्थापित असून सर्व दत्तभक्तांचे हे अतीव प्रेमादराचे स्थान आहे. या वाडीची नित्यपूजा आणि उत्सव यांची सर्व पद्धत अन् आचारसंहिता-नियमावली स्वत: प.प. श्री टेंब्येस्वामी यांनीच घालून दिली आहे. त्यानुसार चातुर्मासातील आषाढ पौर्णिमेपासून दसरा हा अडीच मासांचा काळ सोडता उर्वरित वर्षभर प्रतिदिन संध्याकाळी येथे श्रींची पालखी प्रदक्षिणा असते. वर्ष १९०५ मध्ये एके दिवशी वाडीला पालखी प्रदक्षिणा चालू असतांना पुजारी गुंडोपंत खोंबारे यांच्या हातून श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून खाली आली. हा भलताच अपशकुन पाहून सगळे घाबरले. ‘नक्कीच भविष्यात काहीतरी संकट येणार असून त्याचीच ही पूर्वसूचना आहे’, असे जाणून ते सगळे पुजारी प्रचंड घाबरले.

२. दत्तप्रभूंनी प.प. श्री टेंब्येस्वामी यांना पालखीतून मूर्ती खाली येण्यामागील सांगितलेले कारण

त्या वेळी प.प. श्री टेंब्येस्वामी हिंगोली जिल्ह्यातील नरसी (नामदेव) येथे चातुर्मासाच्या निमित्त मुक्कामाला होते. पुजारी मंडळी त्यांना भेटायला गेली. त्यांच्या तोंडून सर्व हकीकत ऐकल्यावर प.प. श्री टेंब्येस्वामी ध्यानाला बसले आणि त्यांनी ध्यानात दत्तप्रभूंना कारण विचारले. त्यावर देव क्रोधाविष्ट होऊन म्हणाले, ‘तू घालून दिलेल्या नियमांनुसार हे लोक वागत नाहीत. पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात. तुझी निंदा करतात. आम्हालाच तेथे रहायचा कंटाळा आला आहे. पंच नेमून परभारे (परस्पर) व्यवस्था करावी !’

ध्यानातून उठल्यावर प.प. श्री टेंब्येस्वामी यांनी पुजार्‍यांना रोषाने सांगितले, ‘जर दुर्वर्तन सुधारून श्रींची योग्य प्रकारे सेवा करणार नसाल, तर काय भयंकर परिणाम होतील, ते आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही आपले वर्तन सुधाराल तर ठीक, नाही तर तुम्ही जाणे आणि तुमचे देव जाणे !’

३. प.प. श्री टेंब्येस्वामी यांनी भगवान श्रीदत्तप्रभूंची प्रार्थना करतांना ‘करुणात्रिपदी’ची रचना करणे

पुजार्‍यांनी हात जोडून पुन्हा पुन्हा क्षमा मागितल्यावर आणि नीट वागण्याची, तसेच जशी घालून दिली आहे त्याप्रमाणे सेवा करण्याची हमी दिल्यावर प.प. श्री टेंब्येस्वामी यांनी कळवळा येऊन भगवान श्रीदत्तप्रभूंची प्रार्थना केली. त्याच वेळी त्यांनी ही ३ पदांची ‘करुणात्रिपदी’ रचून ती प्रतिदिन प्रार्थनापूर्वक म्हणण्याची पद्धत घालून दिली. आजही पालखीच्या तिसर्‍या प्रदक्षिणेला ३ थांब्यांवर ही त्रिपदी म्हटली जाते. ‘करुणात्रिपदी’ ही नावाप्रमाणेच करुणा भाकणारी; झालेल्या अपराधांची क्षमा करावी, अशी प्रार्थना करणारी; अतीव भावपूर्ण, मंत्रमय आणि रसाळ रचना आहे. यातून श्री स्वामी महाराज भगवान श्रीदत्तप्रभूंना विनवणी करत आहेत. देवांना त्यांच्या लीलांची आठवण करून देऊन ‘त्या लीलांमध्ये जशी तुम्ही भक्तांवर, शरणागतांवर क्षमापूर्वक कृपा केली, तशीच आमच्यावरही करा, आमच्याकडून सेवा निरंतर करवून घ्या. आईच्या मायेने आमचे दोष पदरात घेऊन आम्हा सर्वांवर मायेचे कृपाछत्र घाला’, अशी अत्यंत दयार्द्र होऊन भगवंताची ते प्रार्थना करत आहेत.

परमहंस परिव्राजकाचार्य (प.प.) श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज

परमहंस परिव्राजकाचार्य (प.प.) श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज यांचे समग्र वाङ्मय हा अद्भुत चमत्कारच आहे. अत्यंत काटेकोर, व्याकरण-काव्य नियमांचा धागा न सोडता, प्रतिपादनाच्या विषयातच विविध मंत्रांची चपखल योजना करत त्यांनी रचलेली असंख्य संस्कृत आणि मराठी स्तोत्रे हा भारतीय वाङ्मयातील अजरामर अन् अलौकिक असा विशेष विभाग आहे. त्यांनी रचलेल्या भगवान श्रीदत्तप्रभूंच्या ‘अष्टोत्तरशतनाम’ स्तोत्रामध्ये असे १४ मंत्र खुबीने गुंफलेले आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक नवीन शब्दही निर्माण केलेले आहेत. अशा प्रकारच्या रचना करण्यासाठी विलक्षण प्रतिभा आणि भाषेवर अद्वितीय प्रभुत्व लागते. प.प. श्री टेंब्येस्वामी महाराजांची एक रचना संपूर्ण जगात अतिशय प्रसिद्धी पावलेली आहे. प्रत्येक दत्तभक्त प्रतिदिन ही रचना म्हणतोच म्हणतो. त्यांची ही सुप्रसिद्ध रचना, म्हणजेच ‘करुणात्रिपदी’ होय !

४. दत्त संप्रदायात ‘करुणात्रिपदी’ला सर्वदूर मान्यता !

आज श्रीदत्तप्रभूंच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आणि दत्त संप्रदायातील संतांच्या स्थानांवर ही ‘करुणात्रिपदी’ प्रतिदिन आरतीनंतर विनवणी म्हणून म्हणायची पद्धतच पडलेली आहे. साक्षात् दत्तावतार प.प. श्री टेंब्येस्वामी यांचेच हे प्रासादिक, मंत्रमय शब्द असल्याने आजवर अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की, ‘करुणात्रिपदी’च्या भावपूर्ण गायनाने श्रीदत्तप्रभूंची कृपा नक्की होतेच. ‘अपराधक्षमापना’साठीच्या उपलब्ध काव्यांमधील एकमेवाद्वितीय, अद्भुत आणि अलौकिक काव्य म्हणून ‘करुणात्रिपदी’ला सर्वदूर मान्यता आहे ! प्रार्थनेचा आदर्श वस्तूपाठ असणार्‍या ‘करुणात्रिपदी’ची ही रंजक जन्मकथाही विशेषच म्हणायला हवी. प.प. श्री टेंब्येस्वामी त्रिपदीचा समारोप करतांना श्रीदत्तमहाराजांकडे फार सुंदर मागणे मागतात, ‘प्रार्थी वासुदेव पदीं ठेवी भाव । पदीं देवो ठाव, देव अत्रिनंदन ॥’ देवा सद्गुरुराया अत्रिनंदना, मी आपल्या श्रीचरणी प्रेमभाव ठेवून प्रार्थना करतो, ‘आपण मला कायमच आपल्या पदी ठाव द्यावा, आपल्याच श्रीचरणी निरंतर सेवारत ठेवावे.’ ‘करुणात्रिपदी’च्या सतत अनुसंधानाने श्री टेंब्येस्वामी यांच्या या मागणीप्रमाणे करुणावरुणालय भगवान श्रीदत्तप्रभु तुम्हा-आम्हा सर्वांवर कृपावर्षाव करो’, हीच प्रार्थना !

लेखक : रोहन विजय उपळेकर, पुणे.