अचानक मृत्यूमुखी पडण्यामागे कोरोना प्रतिबंधक लसीशी कोणताही संबंध नाही ! – AIIMS Study

(एम्स – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था)

नवी देहली – गेल्या काही वर्षांत तरुण अचानक मृत्यूमुखी पडत असलेल्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. काही जण त्याचा कोरोना प्रतिबंध लसीकरणाशी जोडत होते; मात्र ‘एम्स’ने केलेल्या सविस्तर अभ्यासातून या विषयावरील सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे. तरुणांमधील अचानक मृत्यू आणि कोरोना लसीकरण यांचा थेट कोणताही संबंध नाही, असा खुलासा ‘एम्स’ने केला आहे. सुमारे एक वर्ष चाललेल्या याविषयावरील अभ्यासातून हे स्पष्ट झाल्याचे ‘एम्स’ने म्हटले आहे. ‘एम्स’चा हा अहवाल ‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.  अचानक मृत्यूंची कारणे लसीकरण नसून इतर आरोग्यविषयक गुंतागुंती असल्याचे त्यात म्हटले आहे.

१. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि ‘नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’सह देशातील अनेक प्रमुख संस्थांनी केलेल्या तपासणीतही भारतातील कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२. ‘एम्स’च्या संशोधनात १८ ते ४५ वयोगटातील तरुणांचा सखोल अभ्यास करण्यात आला. या तपासणीत असे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले गेले की, कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या आणि लस न घेतलेल्या व्यक्तींमध्ये अचानक मृत्यूमुखी पडण्याचा धोका किंवा पद्धत सारखीच होती. त्यामुळे तरुणांमधील या आकस्मिक मृत्यूंचा लसीकरणाशी थेट संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

३. अभ्यासानुसार तरुणांमध्ये अचानक मृत्यूमुखी पडण्याचे सर्वांत मोठे आणि प्रमुख कारण ‘कोरोनरी आर्टरी’ आजार असल्याचे आढळून आले आहे. या आजारामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणार्‍या कोरोनरी धमन्यांमध्ये चरबीचा साठा जमा झाल्यामुळे त्या अरुंद किंवा कडक होतात. त्यामुळे हृदयाला पुरेसा ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा होत नाही. यामुळे हृदयविकाराचा झटका संभवतो.

४. हा अभ्यास मे २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत करण्यात आला असून अचानक मृत्यूमुखी पडलेल्या एकूण १८० प्रकरणांची यात पडताळणी करण्यात आली.

५. अचानक मृत्यूंचे मुख्य कारण ‘कोरोनरी आर्टरी’ आजार असल्याने तरुणांनी त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक पालट करणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ञांचे मत आहे.