एका महिला रुग्णाची आई तिच्याविषयी काहीतरी सांगतांना म्हणाली, ‘‘काय ही सध्याची पिढी. आम्ही किती कामे करायचो, तरी सगळे झेपायचे; आनंदातही असायचो. आता यांना सगळ्या सोयी आहेत, पैसे आहेत, तरी कामाचे ताण येतात आणि आनंदीही नसतात.’’ मी जितक्या रुग्णांना भेटते, त्यातून एक नक्की लक्षात आले की, हे ताण केवळ कामाचे नाहीत. रस्त्यावर केवळ १०० मीटर पार करतांना लागू शकणार्या १५ मिनिटांचे आहेत. घर, कार्यालय, व्यवसाय या सगळीकडे स्वतःची छाप उठवण्यासाठी लागणार्या प्रयत्नांचे आहेत; ‘Trying to fit in’च्या नादात प्रत्येक ‘टीम आऊटिंग’ (सहली) आणि ‘गेट टुगेदर’ला (स्नेह मेळाव्याला) जाण्याचे आहेत, आपला एखादा सहकारी अचानक हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाल्यामुळे वाटलेल्या भीतीचे आहेत. संयुक्त छोट्या कुटुंबपद्धतीमुळे आपल्याला काही झाले, तर आपल्या मुलांचे काय ? याचे ताण आहेत. रस्त्यावर गाडी चालवतांनासुद्धा सगळे सतत जोरजोरात, वेडीवाकडी मोठमोठ्याने हॉर्न वाजवत गाडी चालवत असल्याने होत असलेल्या वैतागाचे आहेत आणि या त्रासांना कुणी चुकले नाही.

आयुर्वेदात शरिराला प्राधान्य ठेवून औषधे
शरिराविषयी बोलायचे, तर सध्याच्या काळात तुम्ही पाहिले असेल, अनुभवले असेल की, अगदी बारकासा सर्दी खोकला सुद्धा महिनोन्महिने टिकतो. यातून प्राणघातक काही होते का ? बर्याचदा नाही. त्रासदायक आहे का ? अतिशयच. या सगळ्यांशी लढायला अतिशय मोठ्या प्रमाणात औषधांचा मारा सतत शरिरावर केला जातो. औषधे घेऊ नयेत का ? नक्कीच घ्यावीत, आपल्याला अधिकाधिक उपयोगी, तितक्याच पटकन काम करणारी आणि त्रासदायक नसलेल्या पर्यायातील. आयुर्वेदात नेहमीच शरिराला प्राधान्य ठेवून त्या त्या रोगातील औषधे दिली जातात. रोग लक्षणे लगेच न्यून करणारी आणि शरिरात रोग वाढणारे वातावरण होऊ न देणारी. हे झाले, तर लक्षणे आणि रोग आपोआप आटोक्यात रहातात.
छोट्या रोगांनी अधिक जोरदार त्रास होणे आणि बाहेर न कळता हळूहळू शरिरात गंभीर पालट होत जाणे, ही नवीन युगाची फळे आहेत. या सगळ्या गदारोळाच्या नादात आपल्या शरिरावर जे परिणाम होतात, ते आधी समजत नाहीत आणि समजले की, त्यांना तितके लक्ष देणे किंवा आपल्या मनाला तो निवांतपणा देणे मागेच पडते; कारण वेळेची कमतरता. वेळ द्यायचा प्रयत्न केला, तरी जमतही नाही; कारण मेंदूमध्ये तितकी शांतताच नाही. यामुळे शरिरात रोगांना जागा मिळवणे सध्या पुष्कळ सोपे झाले आहे. सकस आहार शेतातूनच न पिकल्याने अशक्त होत चाललेली पुढची पिढी इथपासून ते स्वतःची अनिवार्यपणे पालटलेली दिनचर्या इथपर्यंत सगळ्या गोष्टींमुळे हे घडते. ‘सर्व गोष्टी बाजूला ठेवून आधी शरिराकडे लक्ष द्यावे’, असे आयुर्वेदात म्हटले आहे.

शरिरावरील परिणाम टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी
मान दुखणे, डोके दुखणे, अंगदुखी, सतत झोप येणे किंवा अजिबात झोप न येणे इत्यादी लक्षणे साधारण झाली आहेत. या लक्षणांसाठी औषधे आहेतच. वरील लक्षणे सतत राहिल्याने आणि तात्पुरती न्यून करून पुढे त्यावर काहीही उपाय न केल्याने पुढे होत जाणारे हृदयरोग, रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल अन् बाकीही परिणाम टाळण्यासाठी काही सूत्रे पुढीलप्रमाणे :
१. शिळे खाणे, प्लास्टिकमधील गरम खाणे, अतिशय तिखट खाणे, हे सगळे त्रासदायक आहे. यामुळे शरिरात असे पालट घडू लागतात, जे ‘रिव्हर्स’ (पूर्ववत् होणे) होणे अवघड. त्यात वय वाढत गेले की, अजून त्रासदायक होते.
२. वैद्यांशी बोलून काहीतरी रसायन औषधे चालू करता येतात. तुमच्या व्यवसायानुसार एखादे रसायन औषध अपरिहार्य दुष्परिणाम आटोक्यात ठेवतात. शरिरात असे पालट घडवून आणणारी औषधे आहेत, ज्याने त्रासच फार होणार नाही, विदाह न्यून होईल.
३. मेंदू, विचार आणि मन यांच्यावर काम करणार्या औषधांचा विचार करायला हवा. झोप नीट येत नसता डोक्याला औषधी तेल, वैद्यकीय सल्ल्याने ब्राह्मी, अश्वगंधा, आवळा अशा अजूनही काही वनस्पतींची औषधी मिश्रणे उपयोगी ठरतात.
४. प्रतिदिनच्या प्रवासाने होणारे वातप्रकोप, मनस्ताप, त्यातून येणारे हाडांचे त्रास आणि सांधेदुखी हे अंगाला तेल लावणे, व्यायाम, वार्षिक बस्ती याने न्यून रहातात.

५. तुमच्या हाताबाहेरच्या गोष्टींवर रागावणे बंद करा, जसे की, वाहतूक, तुमच्या पाल्याची क्षमता किंवा एखाद्या नातेवाईकाने तुमच्याशी कसे वागावे इत्यादी. आटोक्यातील गोष्टींवर लक्ष केंद्रित करून तेवढ्यावर कष्ट करा.
६. ‘रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी’ (आर.ई.बी.टी. – तर्कशुद्ध भावनिक वर्तणूक उपचार)मध्ये पुष्कळ छान सांगितले आहे, जे वापरता येते. ‘ए’, ‘बी’, ‘सी’, म्हणजेच ‘ए’ (अफेक्टिंग इव्हेंट), म्हणजे जी घटना घडली; ‘बी’ (बिलीफ), म्हणजेच ती घटना आपल्याला काय वाटली आणि ‘सी’ (कॉन्सिक्वेन्स), म्हणजे आपण त्याचे स्वतःवर काय परिणाम होऊ दिले, यातील ‘बी’ आणि ‘सी’ यांवर काम करणे.
७. सगळ्यात शेवटचे आणि महत्त्वाचे, म्हणजे दिनचर्या सांभाळणे (वेळेवर झोपणे, जेवण, व्यायाम), न्यूनतम ‘सिंथेटिक’ (रासायनिक) औषधे घेणे, ‘आर्टिफिशियल हार्मोन’ (कृत्रिम संप्रेरके) घेण्याआधी या त्रासांसाठी आधी पर्याय बघणे (आहेत), स्वतःला अधिकाधिक साचेबद्ध दिनक्रमात बसवणे. या सर्वांमुळे प्रतिदिनच्या मनस्तापांचे मनोशारीरिक परिणाम पूर्ण बंद झाले नाहीत, तरी न्यूनतम रहातील, याची शाश्वती नक्कीच देऊ शकते.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !