मुंबई येथील बाबुलनाथ मंदिराच्या जागेचा प्रश्न मार्गी !

  • महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सभागृहात निवेदन !

  • १ रुपयात भाडेपट्टा नूतनीकरण !

बाबुलनाथ मंदिर

नागपूर, १२ डिसेंबर (वार्ता.) – गिरगावजवळील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याच्या जागेचा (भाडेपट्टा) प्रश्न राज्य सरकारने निकाली काढला आहे. या जागेचा भाडेपट्टा आता ‘बाबुलनाथ चॅरिटी ट्रस्ट’ला अवघ्या १ रुपया या नाममात्र शुल्काने ३० वर्षांसाठी नूतनीकरण करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १२ डिसेंबर या दिवशी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत निवेदनाद्वारे ही माहिती दिली.

मलबार-कंबाला हिल महसूल विभागातील ‘भुकर क्रमांक ४३५ पार्ट’ या मिळकतीचा हा विषय होता. या निर्णयानुसार एकूण ७१८.२३ चौ.मी. क्षेत्रफळापैकी १३५ चौ.मी. क्षेत्राचा वापर हा ‘वाणिज्यिक’ कारणांसाठी होत असल्याने ते क्षेत्र वगळण्यात आले आहे. उर्वरित ५८३.२३ चौ.मी. जागेचा वापर हा केवळ बाबुलनाथ मंदिराकडे जाणार्‍या मार्गिकेसाठी (पायर्‍या आणि रस्ता) होत असल्याने या जागेचा भाडेपट्टा नूतनीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील अतिशय प्राचीन आणि जागृत शिवमंदिर आहे.  मंदिराकडे जाणार्‍या पायर्‍या आणि मार्गिकेची जागा ही शासकीय भूमीवर (‘लीझ’वर) होती. या ‘लीझ’चे नूतनीकरण वेळेवर न झाल्याने काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, तसेच मलबार हिलसारख्या उच्चभ्रू आणि महागड्या परिसरात ही जागा असल्याने त्याचा बाजारभावानुसार कर भरणे चॅरिटी ट्रस्टला अवघड होऊ शकले असते.