देशाप्रती अधिक दायित्व वाढवणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव !’

‘ हे राष्ट्र श्रींचे आहे. श्रींच्या इच्छेनेच राष्ट्राची सर्वांगीण विकासाची आणि उन्नतीची दिशा ठरणार आहे, तसेच ठरवली जाणार आहे. हा मनातील ठाम विश्वासाचा धागा प्रत्येक भारतियाच्या मनामध्ये अगदी पुरातन काळापासून अभेद्य आहे. त्या धाग्याच्या अधिक सुदृढतेसाठी सनातन राष्ट्राचा देहली येथे संपन्न होणारा, तसेच दाही दिशा गाजवणारा शंखनाद चालना देणारा ठरणार आहे. आपण प्रत्येक भारतियाने भविष्याचा वेध घेणारा हृदयातील समान धागा अधिक जोरकसपणे पकडून तो पुढे नेल्यास हा देश सर्व दृष्टीने सामर्थ्यवान बनण्यास अधिक काळ लागणार नाही. आज त्याच आत्मिक एकजुटीला सामर्थ्य, तसेच चालना देण्याचे कार्य शासकीय पातळीवर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत आहे; परंतु शासकीय पातळीवर चाललेले कार्य हे पाण्याच्या पृष्ठभागावर चाललेल्या हालचालीसारखे असते. वास्तविक तळागाळातून त्या कार्याला दिशा प्राप्त झाली, तर तो एकप्रकारे ‘शंखनाद’ उच्च पातळीवर अधिक जोरकसपणे जाऊन ‘हिंदु राष्ट्र’ कार्याची दिशा अन् महती राष्ट्र पातळीवर नेऊन स्थिर होऊ शकतो.

१. देहलीतील शंखनाद महोत्सव देशाची आध्यात्मिकदृष्ट्या पुढील दिशा ठरवणारा !

प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी साधना अन् स्वयंशिस्त यांची आवश्यकता असते. त्याच प्रकारे राष्ट्राचे मनोबल आणि त्याची भविष्याची दिशा ठरवणे आवश्यक आहे. तशी दिशा प्रस्थापित होऊन ती अधिक जोमाने वाढण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर अशा महोत्सवांची आवश्यकता वाटते. १३ आणि १४ डिसेंबरला पार पडणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा राष्ट्राला तीच दिशा अन् आंतरिक सामर्थ्य बहाल करण्यासाठी आणि ते ठरवणारी दिशा प्राप्त करण्यासाठी अपेक्षित कार्य करणारा होणार आहे. व्यक्तीच्या स्वतःच्या आयुष्यात व्यतीत केलेला प्रत्येक क्षण त्या व्यक्तिमत्वाच्या घडणीच्या कार्यास चालना देत जातो. सभोवतालच्या समाज बांधवांवर त्या कार्याचे न्यूनाधिक प्रमाणात चांगले-वाईट परिणाम करणारा ठरतो. त्याच पद्धतीने देहलीतील शंखनाद महोत्सव देशाची आध्यात्मिकदृष्ट्या पुढील दिशा ठरवणार आहे.

२. हिंदु राष्ट्रासाठी सनातन संस्थेचे कार्य हा पाया !

श्री. महेश पारकर

प्रखर विरोधाच्या आगीतून पुढे जात सनातन संस्थेने आज २६ वर्षांनंतर घेतलेली उंच भरारी असामान्य आहे. देहली येथील शंखनाद महोत्सवाच्या भव्य स्वरूपात ती प्रगट होणार आहे. ‘प्रत्येक साधकाच्या आत्मिक विकासासह सामजिक उत्कर्षासाठी झटणारी आपली संस्था !’, अशी आज तिची महती जगभर झालेली आहे. आपल्या देशाला किंबहुना हिंदु समाजाला स्थिरस्थावरता ही संस्थेच्या प्रयत्नांमुळे प्राप्त झालेली आज आपण अनुभवत आहोत. ‘सर्वांगाने आणि सर्वतोपरी अधिक बलशाली होत संपूर्ण जगामध्ये भारत देश अग्रेसर व्हावा’, ही इच्छा संस्थेच्या प्रत्येक साधकाची आहे. आगामी शंखनाद महोत्सवाच्या प्रेरणेने तशीच इच्छा प्रत्येक देशवासियाने बाळगल्यास ‘सोनियाचा दिन’ प्रत्यक्षात येऊ शकतो. सर्वसामान्याच्या आयुष्याचा स्तर उंचावणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संस्थेच्या स्थापनेपासून स्वतः घेतलेल्या परिश्रमांची गणना करणे सर्वथा अशक्य आहे. स्वतःच्या आयुष्याकडे सकारात्मकपणे बघत ते अधिकाधिक समृद्ध करत पुढे वाटचाल करण्याचा उद्देश संस्थेने साधकांना दिला. नामजप आणि साधना यांच्या आधारे सर्वसामान्यांना जगण्याचे बळ, तसेच दिशा दाखवणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे या समाजावर अनंत उपकार आहेत. नामजपासारख्या सोप्या साधनामार्गाच्या आधारे साधकांच्या आयुष्याची योग्य बांधणी करण्यासाठी व्यष्टी साधनेची वाट त्यांनी दाखवली, तर समष्टी साधनेच्या आधारे समाजाची पक्की बांधणी करायचे मार्गदर्शन करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! त्यांचे कार्य एकमेवाद्वितीय, तसेच संपूर्ण देशाला अनुकरणीय असेच आहे. शंखनाद महोत्सवाच्या अनुषंगाने त्या कार्यास चालना मिळावी, असे मनोमन वाटते.


हे वाचा → संपादकीय : ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद कशासाठी ?


३. देहलीतील महोत्सव देशातील नागरिकांना जगण्याचे उद्दिष्ट बहाल करणारा !

कल्पना करूया की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्थापन केलेली सनातन संस्था समजा अस्तित्वात आलीच नसती, तर समाज, देश अन् आपला गोमंत प्रदेश यांची आज काय अवस्था झाली असती ? समाज आज दिशाहीन अवस्थेत कुठे भरकटत गेला असता, याची कल्पना करणेसुद्धा भयावह वाटते. ‘शितावरून भाताची परीक्षा’ करता येते. त्याच पद्धतीने संस्थेच्या साधकांच्या आयुष्याचा स्तर पडताळून संपूर्ण देशाच्या मानसिकतेचे अवलोकन करणे आज शक्य आहे. आगामी शंखनाद महोत्सवाच्या नांदीनंतर देशाच्या उज्ज्वल भविष्याची पहाट उजाड‌णार आहे. हा ठाम विश्वास मनाला वाटतो आहे. संपूर्ण समाजाला स्थिरस्थावरता देण्याचा कार्यारंभ ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ करणार आहे. गोव्यात पार पडलेल्या शंखनाद महोत्सवाच्या प्रचंड यशानंतर जनतेच्या संस्थेविषयक आशा आकांक्षा वाढलेल्या आहेत. जनतेच्या मनामध्ये सकारात्मकता सार्वत्रिकपणे आणण्याचे कार्य या महोत्सवाने केलेले आहे. हिंदु समाज आणि देश यांच्यातील सकारात्मक वाढीप्रती गोव्यातील शंखनाद महोत्सवाने पाया रचलेला आहे. आगामी देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव देशासाठी जगण्याचे उद्दिष्ट नागरिकांना बहाल करणार आहे. देशबांधणीच्या संघटनात्मक कार्यास अधिक वेगाने मार्गस्थ होण्याची प्रेरणा देणारा ठरणार आहे. सनातन संस्थेने वास्तविक हेच उद्दिष्ट नेह‌मी दृष्टीसमोर ठेवून आजपर्यंतची वाटचाल केलेली आहे. ‘बेशिस्त आणि अराजक माजण्याची शक्यता, तिथे साधकांची उपस्थिती अन् सकारात्मक वर्तणूक यांमुळे तिथे समस्यांची सोडवणूक’, हे चित्र नेहमी बघायला मिळते. समाज आजपर्यंत हे कार्य विशेषतः साधकांची सकारात्मकता न्याहाळीत आलेला आहे.

४. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला तन-मन पूरक शुभेच्छा !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी घालून दिलेली ही शिकवण संपूर्ण देशाच्या इच्छित मार्गक्रमणेस साहाय्यभूत ठरो’, ही प्रार्थना करत देहलीतील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला आम्हा साधकांच्या तन-मन पूरक शुभेच्छा आहेतच. तुम्हा-आम्हा साधकांचे, तसेच प्रत्येक नागरिकाचे दायित्व आता वाढले आहे. ते अधिक वाढत जाणार आहे. ‘धर्म, म्हणजे समाजकल्याण आणि सामाजिक बांधीलकी, एका विशाल परिवारात प्रेम अन् आपुलकीने रहाण्याची हमी.’ शंखनाद महोत्सवाच्या यशस्वी संपन्नतेनंतर तर ही भावना देशभरात प्रस्थापित होणार आहे.’

– श्री. महेश पारकर, साहित्यिक, शिरोडा, गोवा. (१.१२.२०२५)