सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजपादी उपाय केल्याने साधिकेच्या छातीत झालेल्या गाठीचा आकार अल्प कालावधीत न्यून होणे

बडोदा (गुजरात) येथील सौ. ऋचा सुळे यांच्या छातीत गाठी झाल्याने त्यांना असह्य वेदना होत होत्या. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजपादी उपाय केल्यामुळे त्यांना होणारा त्रास उणावला. याविषयी सौ. ऋचा यांच्यावर उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यांनी आश्चर्य व्यक्त केले. प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजपादी उपाय केल्यावर सौ. ऋचा सुळे यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. 

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. साधिकेच्या छातीच्या डाव्या बाजूला अकस्मात् असह्य वेदना होणे आणि आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्माची शक्यता व्यक्त करणे

‘९.१०.२०२५ या दिवशी रात्री माझ्या छातीच्या डाव्या बाजूला अकस्मात् वेदना होऊ लागल्या. ‘माझ्याकडून चुकीची हालचाल झाल्यामुळे माझे स्नायू दुखावले असतील’, असे मला वाटले. त्यामुळे मी वेदना होणार्‍या भागावर बाम लावला. सकाळी उठल्यानंतर ‘छातीतील वेदना वाढल्या आहेत’, असे माझ्या लक्षात आले. छातीत गाठ असल्याप्रमाणे कडकपणा असून छातीत खिळा ठोकत असल्याप्रमाणे वेदनांची तीव्रता होती. नंतर मी वेदनाशामक गोळी घेतली, तरीही मला होणार्‍या वेदना न्यून झाल्या नाहीत.

२. सोनोग्राफीच्या अहवालात ‘छातीत एक मोठी गाठ आणि काही लहान गाठी आहेत’, असे आढळणे आणि आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सांगणे

मी आधुनिक वैद्यांशी संपर्क केला. मला होणार्‍या त्रासाविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना कळवले. आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर त्यांनी ‘सोनोग्राफी’ (टीप) आणि कर्करोगाविषयी एक तपासणी करायला सांगितली. माझ्या सोनोग्राफीच्या अहवालात ‘माझ्या छातीत एक मोठी गाठ आणि काही लहान गाठी आहेत’, असे आढळले. ते पाहून आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘रक्तस्राव झाल्याने छातीत वेदना होत असाव्यात आणि तसे असेल, तर शस्त्रकर्म करावे लागेल.’’

(टीप – ‘सोनोग्राफी’: विशिष्ट ध्वनीलहरींच्या साहाय्याने छातीचे चित्र घेण्याची चाचणी)

३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजपादी उपाय शोधून देणे  

मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना मला होणार्‍या त्रासाविषयी सांगितले. त्यांनी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार शोधून मला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री गुरुदेव दत्त । श्री गणेशाय नमः । श्री गणेशाय नमः । ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप नियमित १ – २ घंटे बसून करायला सांगितला. त्यानुसार मी नामजप चालू केला.

४. या कालावधीत मी सेवा करत असतांना मला होणार्‍या वेदनांची तीव्रता अल्प होत असे. नामजप करतांना माझ्या ‘शरिरात देवतेचे चैतन्य येत आहे’, असे मला अनुभवता येत असे. 

सौ. ऋचा सुळे

५. ‘छातीतील गाठीचा आकार अल्प कालावधीत न्यून होणे’, हा चमत्कार आहे’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे  

माझे नामजपादी उपाय आणि औषधोपचार नियमित चालू होते. मला होणार्‍या वेदना केवळ ५ दिवसांत ९० टक्के न्यून झाल्या. ५ दिवसांनी माझी पुन्हा सोनोग्राफी केल्यावर माझ्या छातीत असलेली १९ मिलीमीटरची गाठ १२ मिलीमीटर झाल्याचे दिसून आले. हे पाहून आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘एवढ्या अल्प कालावधीत छातीतील गाठीचा आकार न्यून होणे’’, हा वैद्यकीयदृष्ट्या एक चमत्कार आहे ! आता शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता नाही.’’ मला तपासणारे दोघे आधुनिक वैद्य आणि सोनोग्राफी करणारी महिला यांना ‘५ दिवसांत माझ्या छातीमधील गाठीचा आकार न्यून झाला’, त्याबद्दल नवल वाटले.

६. आधुनिक वैद्यांनी ‘सनातनची साधना आणि प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजपादी उपाय शोधणे’, इत्यादींविषयी समजून घेण्याची जिज्ञासा दाखवणे अन् ग्रंथ खरेदी करणे 

‘सनातन संस्थेचे कार्य, साधना, सनातनचे ग्रंथ आणि प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजपादी उपाय शोधून केल्याने अनेक साधकांना कशा प्रकारे अनुभूती येतात ?’, इत्यादींविषयी मी आधुनिक वैद्यांना माहिती सांगितली. त्यांनी ‘प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजपादी उपाय शोधून नामजप कसा करावा ?’, ‘बिंदूदाबन’, ‘अध्यात्म’, ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ इत्यादी सनातनच्या ग्रंथांची मागणी केली. आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘विज्ञानापेक्षाही एक मोठी शक्ती आहे’, हे आम्ही मानतो. आम्हाला तुमच्या प्रसंगातून ती शक्ती अनुभवायलाही मिळाली. आम्हाला सनातनची साधना समजून घेण्यास आवडेल.’’

‘श्री गुरु साधकांचे प्रारब्ध सुसह्य करतातच. ते जिज्ञासूंना गुरुकार्यात सहभागीही करून घेतात’, हे वरील प्रसंगातून श्री गुरूंनीच मला अनुभवायला दिले’, त्याबद्दल मी श्री गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. ऋचा सुळे, बडोदा, गुजरात. (२१.१०.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक