‘सनातन राष्ट्र शंखनाद सोहळ्या’निमित्त पुणे येथील मान्यवरांनी व्यक्त केलेले मनोगत !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव’ या निमित्ताने १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यातील फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. त्यानिमित्त पुणे येथील काही मान्यवरांनी व्यक्त केलेले मनोगत पुढे दिले आहे.

१. श्री. विवेक प्रभाकर सिन्नरकर (स्थापत्य अभियंता, लेखक, माजी संपादक (विवेक, संस्कृती वार्ता)), पुणे  

१ अ. ‘ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण आपल्या सनातन धर्माचे एक दीपस्तंभ ठरोत’, ही परमात्म्याला प्रार्थना ! : ‘सनातन संस्थेच्या विविध सभा, भाषणे, लेख-लेखन या पवित्र कार्यात मला वेळोवेळी सहभागी होता आले’, हे माझे भाग्य ! वर्ष २०१७ मध्ये मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाऊन परात्पर श्री गुरुजींचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) प्रत्यक्ष दर्शन झाले. त्यांच्याशी चर्चा झाली आणि मला प्रत्यक्ष त्यांचे चरणस्पर्श करून वंदन करण्याचे भाग्य लाभले. त्या भेटीच्या वेळी मी लिहिलेल्या ‘गीता विवेक’ या श्रीमद्भगवद्गीता ग्रंथावरील मराठी समश्लोकी काव्यानुवादास श्री श्री आठवले गुरुजींचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) लेखी आशीर्वादरूपी प्रसाद लाभला. त्या वेळी ‘माझा त्यांच्याशी जन्मजन्मांतरीचा ऋणानुबंध आहे’, असा मला प्रत्यय आला. ‘त्यांना शतकोत्तर पंचवीस वर्षे आयुष्य मिळो. आगामी कसोटीच्या काळात त्यांच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण आपल्या सनातन धर्माचे एक दीपस्तंभ ठरोत’, ही परमात्म्यास प्रार्थना !

‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले गुरुजी यांचे ८४ व्या वर्षात पदार्पण होण्याचे सौभाग्य वर्ष आणि सनातन संस्थेच्या कार्यास रौप्य महोत्सवी वर्षाचे तारुण्य प्राप्त होणे’, या निमित्ताने ‘भारतातील सर्व हिंदूंना संत समागम घडवण्याचा आपला मानस पूर्ण सिद्धीस जावो’, ही श्रीरामचरणी प्रार्थना ! तसेच सर्व देवदुर्लभ असे आपल्यासारखे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना विनम्र अभिवादन अन् ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’स शुभेच्छा !

जयतु सनातन हिंदु राष्ट्र ! जय श्रीराम !’

१ आ. अशा स्वरूपाचे नियोजन आणि सेवा हे केवळ सनातनचे साधकच करू शकतात. त्यामुळे ते यशस्वी होते.’ (१८.४.२०२५)

२. विंग कमांडर शशिकांत ओक (निवृत्त), पुणे 

२ अ. सक्षम हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी समविचारी संघटनांना सनातन संस्थेचे व्यासपीठ उपलब्ध आहे ! : ‘मला सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सहभागी व्हायला मिळाले’, याचे श्रेय आपणास आहे. आपण आवर्जून आणि आपुलकीने निमंत्रण द्यायला आलात, त्यासाठी सर्वप्रथम धन्यवाद ! सोहळ्याच्या दिवशी सकाळीच शस्त्र संग्रहालय, संत पादुकादर्शन, नाडीपट्टीतून ‘प.पू. गुरुदेवांचे जन्मोत्सव कशा प्रकारे साजरे करावेत ?’, याविषयी मिळालेले आदेश आणि त्यानुसार झालेले अन्य जन्मोत्सव’ हे सर्व पाहून आनंद झाला.

संपूर्ण महोत्सवातून महत्त्वाचा संदेश मिळाला की, ‘आपापल्या क्षमतेने राष्ट्र आणि हिंदु धर्म यांसाठी कार्य करणार्‍या अनेक संघटनांना त्यांच्यातील मतभेद दूर करून एक सशक्त जाळे निर्माण करायला सनातन संस्थेने पुढाकार घेतला आहे. आपण नुसते दूरचित्रवाणी, इतर ‘मिडिया’ यांवर काम करत राहून उपयोगाचे नाही, तर आता घराघरात जाऊन विषारी मानसिकतेच्या विरुद्ध लढा देण्यासाठी आणि सक्षम हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी समविचारी संघटनांना आता सनातन संस्थेचे व्यासपीठ उपलब्ध आहे.’’

२ आ. सनातन संस्थेच्या शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतातील हिंदु जनजागृतीसाठी झटणार्‍या विविध संस्था, संघटना आणि व्यक्तीविशेष यांतून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित झाली ! : तुम्ही सर्वांनी पुष्कळ परिश्रम घेतले. त्यामुळे हा महोत्सव यशस्वी झाला. नाडीपट्टीमधून आदेश आल्याशिवाय असे होणार नाही. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना आतापर्यंत मी संपर्क करत होतो; पण ‘त्यांना भेटता येईल न येईल’, असे मला वाटत होते. ‘या महोत्सवात मी त्यांना भेटू शकलो’, याचा मला पुष्कळ आनंद झाला. साधकांनी पुष्कळ चांगले नियोजन केले. प.पू. गुरुदेवांचे मार्गदर्शन लाभले.

सनातन संस्थेच्या शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतातील हिंदु जनजागृतीसाठी झटणार्‍या विविध संस्था, संघटना आणि व्यक्तीविशेष यांतून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित झाली. गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प.पू. स्वामी गोविंददेव गिरी, ‘सुदर्शन न्यूज चॅनेल’चे संपादक श्री. सुरेश चव्हाणके, सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन, धर्मध्वज फडकवणारे अनेक तडफदार नेते, धर्माची बाजू मांडणारे विचारक यांच्या विशेष उपस्थितीतून ३० सहस्रांहून अधिक साधक आणि साधिका यांना मार्गदर्शन मिळाले.

आताही आपण आवर्जून घरी येऊन उरलेली पुस्तके आणि हिशोब दिलात, यासाठी आपले धन्यवाद ! पुस्तक विक्रीची रक्कम सनातन संस्थेच्या कार्यासाठी माझ्याकडून देणगी म्हणून स्वीकारावी, ही विनंती !’’ (‘हे सांगतांना त्यांचा भाव जागृत झाला होता. विंग कमांडर शशिकांत ओक लिखित ‘प्रतापगडाची उलटवलेली बाजी’ या पुस्तकांच्या प्रती ग्रंथ प्रदर्शनकक्षात ठेवल्या होत्या.’ – संकलक) (२९.५.२०२५)

३. श्री. संजय सदाशिव कर्पे (अध्यक्ष, तिळवण तेली समाज धर्मशाळा), जुन्नर, पुणे. 

३ अ. गुरुदेवांच्या रूपाने विठुमाऊलीच भेटली ! : ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. त्यामध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांचे दर्शनही झाले. या संधीचे सोने झाले. मला सर्व संतांचे दर्शन झाले आणि त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ झाला. त्यामुळे ‘संतदर्शने हा लाभ । पद्मनाभ जोडला ।।’ म्हणजे ‘संतांच्या दर्शनाने मला पद्मनाभ अशा श्रीहरीच्या दर्शनाचाच लाभ झाला’, असे जाणवले. महाधन्वन्तरि यागाच्या रूपात मी शास्त्रशुद्ध यज्ञ प्रथमच अनुभवला. संस्थेने उत्तम व्यवस्था केली होती. आम्ही पंढरपूरच्या वारीचा अनुभव घेतला आहे. येथे गुरुदेवांच्या रूपाने विठुमाऊलीच भेटली.’’ (१८.६.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक