राष्ट्र महान बनवण्यासाठी आधी स्वतः महान बनणे आवश्यक !

२६ नोव्हेंबर २०२५ या दिवशीच्या ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये श्री. योगेश जलतारे यांचा ‘खादाड बनवणारी ‘अनलिमिटेड (अमर्यादित)’ थाळी !’, हा लेख वाचनात आला आणि जागतिक स्तरावरील सुप्रसिद्ध उद्योगपती दिवंगत रतन टाटा यांच्या जीवनातील एक प्रेरणादायी प्रसंग आठवला. तो येथे देत आहे.

अन्नाची सर्रास होणारी नासाडी दर्शवणारे प्रातिनिधिक छायाचित्र

१. दिवंगत रतन टाटा यांच्या जीवनातील एक प्रेरणादायी प्रसंग

‘एकदा रतन टाटा जर्मनी येथे गेले होते. संपूर्ण जगात जर्मनी या देशाची ‘जगातील एक औद्योगिकदृष्ट्या पुष्कळच प्रगत आणि श्रीमंत राष्ट्र’ अशी ख्याती आहे. साहजिकच तेथील जनता शाही जीवन जगत असेल, असे इतर देशातील पुष्कळ लोकांना वाटते.

१ अ. रतन टाटा आणि त्यांचे सहकारी यांनी जेवण वाया घालवल्याने वृद्ध महिलांनी अप्रसन्नता व्यक्त करणे : रतन टाटा जेव्हा जर्मनीतील हॅम्बर्ग येथे पोचले, तेव्हा त्यांच्या एका स्थानिक व्यावसायिक सहकार्‍याने त्यांच्यासाठी एका उपाहारगृहात जेवणाचा बेत ठरवला होता. सर्वजण त्या उपाहारगृहात गेले. त्या व्यावसायिक सहकार्‍याने त्यासाठी बर्‍याच पदार्थांची मागणी (ऑर्डर) दिली होती. मागणीतील पदार्थ वाढले जायला अद्याप थोडा वेळ होता. जेवण येईपर्यंत बसल्या बसल्या रतन टाटांनी इकडे तिकडे पाहिले. त्या उपाहारगृहात इतर पटलांवरही आणखी काही लोक बसलेले होते. एका पटलावर २ – ३ वृद्ध महिला बसल्या होत्या.

थोड्याच वेळात सहकार्‍याने केलेल्या मागणीप्रमाणे एका वाढप्याने (‘वेटर’ने) त्या पटलावर बरेच आणि अधिक प्रमाणात पदार्थ आणून ठेवले. सर्वांचे जेवण झाले, तेव्हा पटलावर जवळपास ३० टक्के अन्न शेष राहिले होते. उपाहारगृहातून बाहेर पडत असतांना तेथे बसलेल्या त्या वृद्ध महिलांनी रतन टाटा आणि त्यांचे सहकारी यांच्यावर ‘किती अन्न वाया घालवले’, म्हणून अप्रसन्नता व्यक्त करत त्यांना ऐकू जाईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

१ आ. रतन टाटांच्या सहकार्‍याने अयोग्य प्रतिक्रिया व्यक्त करणे आणि सामाजिक सुरक्षा संस्थेच्या अधिकार्‍याने त्यांना दंड ठोठावणे : त्यांची ती प्रतिक्रिया ऐकून रतन टाटा यांच्या स्थानिक व्यावसायिक सहकार्‍याने त्यांना फटकारले. तो म्हणाला, ‘‘आम्ही जेवणाचे पैसे दिलेले आहेत. आम्ही किती खातो आणि किती टाकून देतो, याविषयी तुम्हाला काही देणे-घेणे नाही.’’ त्या वृद्ध महिलांना त्यांचे बोलणे आवडले नाही. बोलता-बोलता त्यांच्यापैकी एका महिलेने कुणाला तरी दूरभाष करून बोलावले. थोड्याच वेळात तिकडे एका सामाजिक सुरक्षा संस्थेचा अधिकारी आला. त्याने पूर्ण प्रकरण समजून घेतले आणि एवढे अन्न का वाया घालवले ? म्हणून त्या व्यावसायिकावर ५० युरो, म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे ५२५० रुपये इतका दंड ठोठावला.

श्रीमती अलका वाघमारे

१ इ. सामाजिक सुरक्षा संस्थेच्या अधिकार्‍याने सुनावलेले खडे बोल ! : नंतर तो अधिकारी त्या सर्वांना उद्देशून कठोर शब्दांत म्हणाला, ‘‘तेवढ्याच अन्नाची मागणी करा, जेवढे तुम्ही खाऊ शकता. आज जगातील अनेकांना अन्न मिळत नाही. अन्न मिळवण्यासाठी त्यांना सतत संघर्ष करावा लागतो. तुम्हाला मिळत आहे, तर तुम्ही असे वाया का घालवता ? पैसा जरी तुमचा असला, तरी हे अन्न निर्माण करणारी आणि पुरवठ्याची व्यवस्था करणारी संसाधने (नित्य उपयोगाच्या अत्यावश्यक गोष्टी किंवा वस्तू) यांवर समाजाचा हक्क आहे. ती संसाधने समाजाची आहेत. त्यामुळे तुम्हाला अशा गोष्टींचा दुरुपयोग करण्याचा आणि वाया घालवण्याचा काहीच अधिकार नाही !’’

२. आवश्यक तेवढेच अन्न सिद्ध करण्यासंबंधी विचार होणे आवश्यक !

खरेच यावर विचार करायला हवा. आज जगात सगळीकडेच अन्न मिळवण्यासाठी लोकांना पुष्कळ संघर्ष करावा लागत आहे. जगाचे सोडा, आपण आपल्याच राष्ट्राचा विचार केला, तरी असे लक्षात येते की, आपल्याच देशात आज कोट्यवधी लोकांना अन्न, वस्त्र, निवारा या अत्यावश्यक गरजांसाठी सतत संघर्ष करावा लागतो. काहींना अर्धपोटी रहावे लागते, तर काहींची कित्येकदा उपासमार होते.

याउलट दुसर्‍या बाजूला अनेक लोक इतरांना खुश करण्यासाठी आणि स्वतःचा बडेजाव मिरवण्यासाठी, मेजवानी किंवा विवाहादी कार्यक्रमात स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी महागड्या अन् पुष्कळ पदार्थांची मागणी देतात. त्यात अनेकदा पुष्कळसे अन्न ताटात तसेच सोडून दिल्याने वाया घालवले जाते. बरे ही गोष्ट समाजातील धनवान लोकांविषयी घडते, असे नाही, तर उच्चभ्रू वर्गातही हे अगदी सर्रासपणे घडतांना दिसते. मध्यमवर्गीयही याला अपवाद नाहीत. सकाळचे अन्न सायंकाळी खाल्ले जात नाही. ते संपवण्याऐवजी टाकून दिले जाते. मग करतांनाच योग्य प्रमाणात केले, आवश्यकतेइतकेच शिजवले, तर टाकून देण्याची वेळ येणार नाही; परंतु हा विचार फारसा होतांना दिसत नाही.

जेवढे आवश्यक आहे, तेवढेच घ्या !

अन्न हे पूर्णब्रह्म

आपण लक्षात घ्यायला हवे, ‘अन्न आणि पाणी हे जरी आपण पैसे मोजून विकत घेत असलो, तरी वाया घालवण्याचा आपल्याला अधिकार नाही; कारण संपूर्ण मानवजातीसाठी ते भगवंताने उपलब्ध करून दिले आहे. मला जशी आवश्यकता आहे, तशी ती दुसर्‍यांचीही आवश्यकता आहे.’ अन्न, पाणी इत्यादी आपल्याला भगवंताने निसर्गाच्या माध्यमातून दिले असले, तरी त्याचा साठा मर्यादित आहे. आज काळाच्या ओघात नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडत चालले आहेत. वृक्षतोड, जंगलतोड यांचाही परिणाम जलस्रोत आणि भूमी यांवर होत आहे. शेतीला पाणी मिळाले नाही, तर धान्य पिकणार कसे ? आपल्या अशा चुकीच्या सवयींविषयी आपण गंभीरतेने विचार करायला हवा. जेवढ्याची आवश्यकता आहे, तेवढेच घ्यायची सवय लावायला हवी. – श्रीमती अलका वाघमारे

३. अन्नाप्रमाणेच पाण्याचाही अपव्यय होणे

अन्नाच्या संदर्भात जसे हे होतांना आढळते, तीच गोष्ट पाण्याच्या संदर्भातही घडते. आवश्यकतेपेक्षा पाण्याचा अधिक वापर केला जातो. अनेक ठिकाणी सार्वजनिक नळांच्या तोट्या तुटलेल्या असतात आणि मार्गांत पाणी वहात असते. त्याविषयी संबंधित शासकीय कार्यालयामध्ये कुणी तक्रारही करत नाही. तक्रार केलीच, तर प्रशासनाची माणसे दुरुस्तीसाठी तिकडे पोचत नाहीत. जलवाहिन्यांना भोके पाडलेली असतात, त्यातून अखंड पाणी वहात असते. घराघरांतूनही पाण्याचा अपव्यय केला जातो. अनेक जण पिण्यासाठी फुलपात्र (पेला) भरून पाणी घेतात आणि घोटभर पाणी पिऊन अर्धेअधिक टाकून देतात.

४. राष्ट्र महान करण्यासाठी नागरिकांनी कर्तव्यदक्ष होणे महत्त्वाचे !

लोकहो, ‘जर्मनीसारख्या श्रीमंत राष्ट्रांमधील लोकांची काटकसर आणि त्यांची मानसिकता भारतियांना निश्चितच लाजवणारी आहे. कोणतेही राष्ट्र उगाच महान बनत नाही’, हे ध्यानात ठेवा. ‘राष्ट्र तेव्हाच महान बनते, जेव्हा त्या राष्ट्रातील लोक महान असतात. महान बनणे, म्हणजे केवळ मोठमोठे प्रकल्प राबवणे, गुंतवणूक करणे, असा होत नाही, तर महान बनण्यासाठी लहान लहान गोष्टीसुद्धा कराव्या लागतात आणि या लहान गोष्टींची काटकसर, संसाधनांचा सुयोग्य वापर करणे.’ हे काही केवळ शासनाचे काम नव्हे, तर राष्ट्रातील प्रत्येक आबालवृद्धांचे ते कर्तव्य आहे. हे कर्तव्य आपण जागरूक राहून निभावले, तर आपले राष्ट्र आणखी मजबूत होईल. त्यासाठी ‘पाणी वाया न घालवणे, पाण्याचा अनावश्यक वापर टाळणे, विजेची बचत करणे, अन्न तेवढेच घेणे जेवढे आवश्यक आहे’, अशी लहान लहान पावले राष्ट्रातील सर्व नागरिकांनी उचलल्यास भारत देश निश्चितच महान बनेल आणि त्याची महासत्तेकडे वाटचाल होईल, यात शंका नाही.

– श्रीमती अलका वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१२.२०२५)