सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडून तीव्र शारीरिक त्रासातही कठोर साधना करून घेऊन प्रारब्ध सुसह्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना तीव्र शारीरिक त्रास असूनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांना अखंड सेवारत ठेवणे

१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना कंबरदुखीचा त्रास असूनही त्यांच्याकडून सलग २ वर्षे दक्षिण भारतात प्रसारसेवा करून घेणे : ‘वर्ष २००९ पासून माझा कंबरदुखीचा त्रास वाढला होता. त्या काळात मला दक्षिण भारतातील ४ राज्यांमध्ये प्रसाराची सेवा होती. महाराष्ट्राच्या तुलनेत दक्षिण भारतात प्रसारकेंद्रे दूर आहेत. त्यामुळे मला एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यासाठी पुष्कळ प्रवास करावा लागत असे. बर्‍याच वेळा मला रात्रीच्या बसने प्रवास करावा लागत होता आणि दिवसा प्रसाराच्या अंतर्गत बैठका घेणे, अभ्यासवर्ग घेणे, संपर्क करणे इत्यादी सेवा असत. अशा प्रकारे मी तेथे २ वर्षे प्रसारसेवा केली. मला कंबरदुखीचा त्रास असूनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला शक्ती देऊन माझ्याकडून सेवा करून घेतली.

१ आ. सेवेमुळे पुरेशी विश्रांती न मिळणे : डिसेंबर २०१० मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात विदेशी साधकांसाठी शिबिर आयोजित केले होते. त्या वेळी मला कंबर आणि मान यांचे दुखणे पुष्कळ प्रमाणात होते. मी शिबिराच्या आयोजन सेवेत असल्यामुळे मला विश्रांतीसाठी वेळ मिळत नव्हता. तेव्हा दुपारच्या महाप्रसादानंतर मी विदेशी साधकांसाठी अर्धा घंटा नामजपादी उपाय करत असे. दिवसभर शिबिर आणि नंतर रात्री शिबिराची सिद्धता इत्यादींमुळे मला रात्री झोपायला विलंब होत असे. या सर्व सेवा गुरूंच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडल्या.

१ इ. शारीरिक दुखणे वाढल्यामुळे प.पू. डॉक्टरांनी देवद येथील सनातनच्या आश्रमात पाठवणे : एप्रिल २०११ पासून माझी महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील प्रसारसेवा चालू झाली. नोव्हेंबर २०११ पासून माझे शारीरिक दुखणे पुष्कळ वाढले. त्यामुळे मला बसताही येईनासे झाले. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी माझी जिल्ह्यांमधील प्रसारसेवा थांबवून मला देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पाठवले.

१ ई. शुद्धीकरण सत्संग घेण्याचा निरोप आल्यावर बसता येत नसल्याने झोपूनच सत्संग घेणे : देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पोचल्यावर मला निरोप आला, ‘देवद आश्रमातील साधकांसाठी शुद्धीकरण सत्संग घेणे चालू करा.’ त्याप्रमाणे मी देवद आश्रमात पोचल्यावर लगेचच हे शुद्धीकरण सत्संग (स्वभावदोष आणि अहं निर्मूलन या अंतर्गत साधकांचे सत्संग) चालू केले. हे सत्संग सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत असत. काही वेळा रात्री जेवणानंतरही काही तातडीचे सत्संग घ्यावे लागत असत. मला थोडेसुद्धा बसता येत नसल्यामुळे मी सर्व सत्संग झोपूनच घेत होतो. हे सत्संग ४ – ५ मास चालले.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

१ उ. शारीरिक क्षमता अल्प होणे : पुढे पुढे माझी शारीरिक स्थिती पुष्कळच खालावत गेली. मला जेवणासाठीसुद्धा बसता येत नव्हते. दैनिक ‘सनातन प्रभात’ हातात घेऊन वाचताही येत नव्हते. माझी मानदुखीसुद्धा पुष्कळ प्रमाणात वाढली होती.

१ ऊ. सनातन चैतन्य वाहिनीची सेवा मान आणि कंबर यांचा तीव्र त्रास असूनही सलग ३ – ४ वर्षे करणे : त्या वेळी सनातन चैतन्य वाहिनीची सेवा होती. या अंतर्गत ‘सर्व जिल्ह्यांकडून प्रसाराची माहिती मागवणे, त्याचे संकलन करणे आणि त्याचा अभ्यास करून त्याच्या चलचित्रफिती (व्हिडिओ) बनवून प्रक्षेपित करणे’, अशी सेवा होती. हे प्रक्षेपण सर्व जिल्ह्यांसाठी आठवड्यातून एकदा ३ घंटे असे. चित्रीकरण करण्यासाठी २ – ३ दिवस लागत. त्यासाठी बरेच घंटे मला बसावे लागे. माझी मान आणि कंबर येथे पट्टा लावून मी अधून-मधून झोपून आणि थोडे बसून ही सेवा करत होतो. अशा प्रकारे ही सेवा सलग ३ – ४ वर्षे चालू होती.

१ ए. आधुनिक वैद्यांनी बोलण्यासाठी आवश्यक शक्ती नसल्यामुळे ‘अधिक बोलू नये’, असे सांगणे : याच काळात माझा थकवा पुष्कळ वाढला. माझ्या देहातील स्नायूंची क्षमता पुष्कळ उणावली. तेव्हा मला आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘बोलण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती तुमच्याकडे नसल्याने आता तुम्ही अधिक बोलायचेही नाही, तसेच तुमच्या पोटाचे स्नायू पुष्कळ दुर्बल झाले आहेत.’’

१ ऐ. दूरभाषवरून सत्संग घेतांना मोठ्याने बोलण्यासाठी पुष्कळ शक्ती लागणे : तेव्हा मला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी दूरभाषवरून शुद्धीकरण सत्संग घेण्यास सांगितले होते. प्रतिदिन ते सत्संग ४ – ५ घंटे असत. असे ५ – ६ मास चालू होते. तेव्हा ‘स्मार्टफोन’ नसल्याने साध्या दूरभाषसंचावर मोठ्याने बोलावे लागायचे. त्यासाठी पुष्कळ शक्ती लागत असे.

१ ओ. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे सत्संग घेणे : याच काळात काही जिल्ह्यांतून साधक स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शिकण्यासाठी देवद आश्रमात येत होते. त्यांचे नियमित सत्संग घेण्याची सेवा माझ्याकडे होती.


‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘आपल्या त्रासांकडे कोणत्या दृष्टीने पहायचे आणि साधना कशी करायची ?, याचे उत्कृष्ट उदाहरण येथे दिले आहे. अनेक प्रसंगांत दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि प्रत्यक्षातही ‘साधना अन् सेवा यांविषयी कोणता दृष्टीकोन ठेवावा आणि ती परिपूर्ण कशी करावी ?’, याबद्दल मी मार्गदर्शन केले आहे. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्याचा उत्तम रितीने लाभ करून घेतला. त्याबद्दल मी त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे आणि त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे ! त्रास असलेल्या सर्व साधकांनी त्यांचा आदर्श दृष्टीसमोर ठेवून साधनेत लाभ करून घ्यावा.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (३०.१०.२०२५)

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या शारीरिक त्रासाची तीव्रता न्यून करून प्रारब्ध सुसह्य करण्यासाठी केलेली कृपा !

अ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव त्यांचा कृपाशीर्वादरूपी चैतन्यदायी प्रसाद मला नियमितपणे पाठवत. त्यामुळे मला लढण्यासाठी बळ मिळून माझे प्रारब्ध सुसह्य झाले.

आ. मला होणारे सर्व प्रकारचे त्रास दूर करण्यासाठी आणि मला चैतन्य मिळण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी त्यांच्या हस्ताक्षरातील चैतन्यमय हस्तलिखिते मला पाठवली होती.

इ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी वापरलेल्या पलंगाच्या लाकडाच्या ३ मोठ्या फळ्या त्यांनी मला आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी पाठवल्या होत्या. त्या फळ्या मी अजूनही माझ्या पलंगाच्या गादीच्या खाली ठेवतो.

ई. सप्टेंबर २०१२ मध्ये माझ्या ५० व्या वाढदिवसानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी माझ्यासाठी गुरुकृपायोगाचा सोन्याचा ‘लोगो’ आणि त्यांच्या छायाचित्राची एक ‘फ्रेम’ पाठवली. तो ‘लोगो’ मी गळ्यात घातल्यामुळे माझ्याभोवती संरक्षककवच निर्माण झाले. त्यांनी पाठवलेली ‘फ्रेम’ मी रहात असलेल्या खोलीतील देवघरात ठेवल्यामुळे मला आपोआप त्यांच्या अनुसंधानात रहाता आले.

उ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव अधून-मधून साधकांकडे माझी विचारपूस करायचे. यावरून ‘त्यांचे माझ्याकडे सतत लक्ष आहे’, हे माझ्या लक्षात येत असे. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव माझी आठवण काढतात’, हे माझ्यासाठी पुष्कळ प्रेरणादायी होते आणि साधना करण्यासाठी बळ देणारे होते.

ऊ. जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव दूरभाषवरून माझ्याशी बोलायचे, तेव्हा प्रत्येक वेळी ते काहीतरी नवीन सूत्रे सांगून मला प्रोत्साहित करत. त्यांच्या काही मिनिटांच्या बोलण्याने माझा उत्साह पुष्कळ वाढत असे. त्यामुळे माझे त्रासाकडे सहज दुर्लक्ष होत असे. यातून ‘ते मला प्रारब्ध भोगण्यासाठी शक्ती द्यायचे आणि ते सुसह्य करायचे’, हे माझ्या लक्षात येत असे.

ए. त्याच कालावधीत परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यासारख्या उच्च कोटीच्या संतांकडून प्रतिदिन माझ्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले जात असत. त्यांनी केवळ माझ्यासाठी काही मास प्रत्यक्ष उपाय केले नाहीत, तर माझ्यासाठी वेळोवेळी मंत्रजप देऊन माझे दुखणे सुसह्य करण्याचा प्रयत्न केला. या कालावधीत मला त्यांचे पुष्कळ प्रेम लाभले. याविषयी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ‘अशा अवघड स्थितीत परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यासारख्या थोर संतांचा सत्संग सतत मिळणे’, ही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची माझ्यावर असलेली अपार कृपाच आहे.

ऐ. माझ्या शारीरिक त्रासाची तीव्रता सुसह्य करण्यासाठी आश्रमातील वैद्यांच्या माध्यमातून मला औषधोपचार मिळाले, शरिराचे मर्दन करण्यासाठी साधकांना तशी शक्ती आणि बुद्धी देऊन प्रतिदिन मर्दनाची सोय आश्रमातच उपलब्ध करून दिली.

ओ. प्रतिदिन चैतन्य वाहिनीची सेवा करतांना प्रत्येक सप्ताहात एक लेख लिहावा लागे. त्यासाठी मला एका साधकाचे साहाय्य मिळाले. मी झोपून जे सांगेन, ते तो लिहून घेऊन संगणकावर लेख बनवत असे. अशा प्रकारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली यांनी या जिवाकडून ५० पेक्षा अधिक लेख लिहून घेतले.

३. रुग्णाईत असतांना सेवा करणे टाळणार्‍या साधकांनो, पुढील दृष्टीकोन लक्षात घ्या !

हे सर्व लिहिण्याचा उद्देश म्हणजे काही साधक रुग्णाईत असले की, सेवा करणे टाळतात. त्यांनी पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावेत. 

३ अ. आपल्याला होणार्‍या व्याधी या आपल्या प्रारब्धानुसार असतात ! : आपल्याला होणार्‍या लहान-सहान व्याधी किंवा दीर्घकालीन टिकणारे आजारपण, हे आपल्या प्रारब्धानुसार येत असते. ‘दीर्घकालीन व्याधींमध्ये आपल्याला झोपून रहावे लागते किंवा काही सेवा करता येत नाही’, असे आपल्याला वाटते. अशा किंवा वयोमानानुसार होणार्‍या व्याधी हे सर्व आपल्या प्रारब्धाचा भाग आहे.

३ आ. तीव्र प्रारब्ध सुसह्य होण्यासाठी तीव्र साधना आणि त्या समवेत गुरूंची कृपा आवश्यक ! : अध्यात्मशास्त्रानुसार प्रारब्ध जेवढे तीव्र, तेवढे ते सुसह्य करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी तीव्र साधना करावी लागते. त्या समवेत आपल्यावर गुरूंची कृपा असणे आवश्यक असते; अन्यथा प्रारब्धाच्या तीव्र झळा आपल्याला सहन कराव्या लागू शकतात.

३ इ. व्याधीविषयीचे विचार करण्यापेक्षा देवाच्या अनुसंधानात किंवा सेवेत रहाणे आवश्यक ! : असाध्य रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या मनात त्याच्या व्याधीविषयीचे विचार सतत येत असतात, म्हणजेच ती व्यक्ती देहाच्या अनुषंगाने पहाते आणि दुःखी होते. त्यापेक्षा देवाच्या अनुसंधानात किंवा सेवेत राहिल्यास, त्या व्यक्तीला आहे त्या स्थितीतही आनंद मिळू शकतो.

४. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या जन्‍मकुंडलीतील तीव्र देहप्रारब्‍ध दर्शवणारे योग  

काहींना वाटायचे की, मी विश्रांती न घेता प्रसारसेवा करत आहे; म्हणून माझी स्थिती अशी झाली आहे. माझ्या कुंडलीत ‘शनि आणि केतू या ग्रहांची युती असून शनि अन् केतू यांचा रवि आणि मंगळ या ग्रहांशी ‘षडाष्‍टकयोग’ (अशुभयोग) आहे’, हे योग तीव्र देहप्रारब्‍ध दर्शवतात. त्यामुळे ‘हे दुखणे येणे’, हा माझ्या प्रारब्धाचा एक भाग आहे.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तीव्र प्रारब्धात कठोर साधना करून घेतल्यामुळे केवळ ६ वर्षांत संतपदावरून सद्गुरुपदी विराजमान करणे 

५ अ. प्रतिकूल परिस्थितीत साधना जलद होणे : मी या कालावधीत ‘साधना करण्यासाठी जेवढी परिस्थिती प्रतिकूल असते, तेवढे देवाचे साहाय्य अधिक प्राप्त होऊन साधना जलद होते’, याची अनुभूती घेतली.

५ आ. तीव्र प्रारब्धात कठोर साधना करून घेऊन सद्गुरुपदी विराजमान करणे : शारीरिक अस्वास्थ्य असतांना सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी माझ्याकडून वरीलप्रमाणे कठोर साधना करून घेतली. त्यामुळे संत झाल्यानंतर केवळ ६ वर्षांत, म्हणजेच जुलै २०१६ मध्ये त्यांनी मला सद्गुरुपदी विराजमान केले.

६. कृतज्ञता  

माझी शारीरिक क्षमता पुष्कळ अल्प झाल्यामुळे दिवसभर माझे शरीर पुष्कळ दुखत असे. मला ते दुखणे सहन करणे असह्य होते. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला दिवसभर सेवा देऊन त्या दुखण्याकडे दुर्लक्ष करण्यास शिकवले. ‘माझे दुखणे जेवढे तीव्र होत गेले, तेवढ्या प्रमाणात मला त्यांनी अधिकाधिक सेवा देऊन माझ्याकडून कठोर साधना करून घेतली. याद्वारे त्यांनी माझ्यावर अनंत कृपा करून माझे प्रारब्ध पुष्कळ सुसह्य केले, जणू नष्ट केले’, याबद्दल त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी लिहून घेतलेली ही शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण !

श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।

इदं न मम ।’

– सद्गुरु राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.९.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक