‘जिवाचे अंतरंग जाणून सर्वांगीण उन्नतीसाठी त्याला दिशादर्शन करणे’, हे ज्योतिषशास्त्राचे खरे प्रयोजन !

‘ज्योतिषशास्त्र हे मनुष्याच्या जीवनाशी संबंधित शास्त्र आहे. मनुष्य जीवनाची २ अंगे आहेत – बाह्य अंग आणि अंतरंग. शिक्षण, विवाह, अर्थार्जन, संतती आदी गोष्टी बाह्य अंगाशी संबंधित आहेत, तर जिवाच्या जन्माचा उद्देश, मूलभूत क्षमता, व्यक्तीमत्त्व, नियत कर्म आदी गोष्टी अंतरंगाशी संबंधित आहेत. ज्योतिषशास्त्र हे जीवनाच्या खोल पातळीला, म्हणजे अंतरंगाला स्पर्श करणारे शास्त्र आहे. प्रस्तुत लेखाद्वारे ‘ज्योतिषशास्त्राचे मानवी जीवनात खरे स्थान काय आहे ?’, याचा आपण विचार करू.

१. मानवी जीवनाच्या प्रयोजनाला अनुरूप असे ज्योतिषशास्त्राचे उद्दिष्ट असणे

ज्योतिषशास्त्र हे मानवी जीवनाशी संबंधित शास्त्र असल्याने मानवी जीवनाच्या प्रयोजनाला अनुरूप असे ज्योतिषशास्त्राचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे प्रथम मानवी जीवनाचे उद्दिष्ट समजून घेऊ. मानवी जीवनाचे उद्दिष्ट समजून घेण्यापूर्वी ईश्वराचे सृष्टी-निर्मितीचे उद्दिष्ट समजून घेऊ.

१ अ. ईश्वराचे सृष्टी-निर्मितीचे उद्दिष्ट : ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली, ती स्वतःला व्यक्त करण्यासाठी ! कारण ‘व्यक्त होणे’, हा ईश्वराचा, म्हणजे चेतनेचा (जाणिवेचा) स्वभाव आहे. निर्गुण ईश्वरी तत्त्वात अनंत क्षमता आणि शक्यता असतात; पण त्यांचे प्रकटीकरण झालेले नसते. जसे एखाद्या चित्रकारात सुंदर चित्रे काढण्याची योग्यता असते; पण प्रत्यक्ष चित्रे काढल्यावरच ती व्यक्त होते. त्याचप्रमाणे स्वतःतील अनंत क्षमता आणि शक्यता यांना व्यक्त करून त्यांचा परिपूर्ण विकास करण्यासाठी ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली. ईश्वराची सृष्टी-निर्मिती हे त्याच्या आनंदाचे प्रकटीकरण आहे. ईश्वर हा स्वतः सृष्टीच्या रूपाने नटला आहे. प्रथम निर्जीव पदार्थ, त्यानंतर वृक्ष-वनस्पती, त्यानंतर पशू-पक्षी आणि त्यानंतर मानव अशा क्रमाने त्याने उत्पत्ती केली. या उत्पत्तीक्रमात चेतनेचा (जाणिवेचा) विकास उत्तरोत्तर होत गेला आहे. ईश्वराची सृष्टीरचना येथेच थांबत नाही. ‘मानवामधील चेतनेचा अत्युच्च विकास करून पृथ्वीवर दिव्य जीवन अवतरित करणे’, हे ईश्वराचे उद्दिष्ट आहे किंवा ही त्याची ‘लीला’ आहे. दिव्य जीवन म्हणजे सत्य, ज्ञान, प्रीती, व्यापकता, आनंद आदींनी युक्त जीवन !

श्री. राज कर्वे

१ आ. मानवी जीवनाचे प्रयोजन : ईश्वराच्या सृष्टी-उत्पत्तीच्या क्रमात मानव हा अतिशय महत्त्वाचा सांधा (दुवा) आहे. मानवातील चेतना अधिक विकसित असल्यामुळे त्याला विचार करण्याची शक्ती लाभली. वैचारिक शक्तीमुळे तो स्वतःच्या बुद्धीने कर्म करू शकतो. चांगल्या कर्मांमुळे तो सुख भोगतो, तर वाईट कर्मांमुळे तो दुःख भोगतो. मनुष्याला जीवनात येणारे विविध अनुभव त्याला शिकवत आणि घडवत असतात. ‘जीवनातील सर्व प्रकारचे अनुभव घेणे, त्यांतून शिकणे, विवेकी होणे आणि साधनेद्वारे स्वतःच्या चेतनेचा अत्युच्च विकास (आध्यात्मिक उन्नती) करणे’, हे मानवी जन्माचे उद्दिष्ट आहे. आध्यात्मिक उन्नतीमुळे मनुष्यात सत्यनिष्ठता, प्रीती आणि व्यापकता येते. त्यामुळे त्याला जीवनात आनंद, शांती आणि दिव्यता लाभते. आध्यात्मिक उन्नती झाल्यावर तो ईश्वरस्वरूप होतो; म्हणजे ईश्वरच त्याच्या माध्यमातून कार्य करतो, तेव्हा मनुष्यजन्माचे उद्दिष्ट साध्य होते.

१ इ. ज्योतिषशास्त्राचे प्रयोजन : मनुष्यजन्माच्या प्रयोजनाला अनुरूप असे ज्योतिषशास्त्राचे प्रयोजन आहे. मनुष्यत्वातून ईश्वरत्वाकडे जाण्याचा हा प्रवास अनेक जन्मांचा आहे. जन्मकुंडली ही जीवात्म्याचा प्रवास दर्शवणारा एक आरसा आहे. ‘जीवात्मा त्याच्या प्रवासात कोणत्या टप्प्याला पोचला आहे ?’, हे जन्मकुंडली दर्शवत असते. ‘कोणते कर्म करण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी त्याने जन्म घेतला आहे ?’, हे जन्मकुंडली सांगते. जिवाच्या विकासाला अनुकूल अशा ग्रहस्थितीमध्ये ईश्वर जिवाला जन्माला घालतो. ‘जीवात्म्याच्या स्तरावरील तथ्यांचे आकलन करून घेणे आणि जिवाला पुढील उन्नतीसाठी दिशादर्शन करणे’, हे ज्योतिषशास्त्राचे खरे प्रयोजन आहे. जीवात्म्याच्या स्तरावरील कोणत्या गोष्टी जन्मकुंडलीवरून लक्षात येतात, ते पुढे दिले आहे.

१ इ १.‘जिवाचा आत्मिक विकास (आध्यात्मिक उन्नती) कोणत्या स्तरापर्यंत झाला आहे ?’, हे कळणे : तमोगुणाकडून सत्त्वगुणाकडे जाणे, हे जीवात्म्याचे ध्येय असते. काही व्यक्तींची प्रवृत्ती तामसिक, काहींची राजसिक आणि काहींची सात्त्विक असते; याचे कारण म्हणजे जीव त्याच्या प्रवासात ज्या टप्प्याला आहे, त्यानुसार त्याची प्रवृत्ती असते. जन्मकुंडलीवरून जिवाची प्रवृत्ती कळू शकते, म्हणजे पर्यायाने ‘त्याचा आत्मिक विकास कोणत्या स्तरापर्यंत झाला आहे ?’, हे कळू शकते. जन्मकुंडलीतील ग्रहांमध्ये असलेले योग, त्यांच्या राशी आणि त्यांची स्थाने यांवरून याचा बोध होतो.

१ इ २. ‘जिवाच्या चित्तात कोणत्या प्रकारच्या कामना आहेत ?’, हे कळणे : ‘जिवाच्या चित्तात मूलतः कोणत्या प्रकारच्या कामना आहेत ?’, हे जन्मकुंडलीवरून कळते. साधारणपणे इंद्रियांच्या माध्यमातून सुख मिळवणे, ही ‘तामसिक कामना’ असते; कुटुंब, धन, व्यवसाय, प्रतिष्ठा आदींद्वारे मानसिक सुख मिळवणे, ही ‘राजसिक कामना’ असते; तर विद्या, ज्ञान आदींद्वारे बौद्धिक सुख मिळवणे, ही ‘सात्त्विक कामना’ असते. कुंडलीतील नवग्रहांमध्ये होत असलेल्या परस्पर योगांतून ‘व्यक्तीमध्ये कोणत्या प्रकारच्या मूलभूत कामना आहेत ?’, हे लक्षात येते.

१ इ ३. जिवाच्या स्वधर्माचा बोध होणे : ‘स्वधर्म’ म्हणजे जिवाच्या मूलभूत प्रवृत्तीनुसार त्याच्यात असलेली क्षमता. ही क्षमता जिवाला जन्मतःच लाभलेली असते. व्यक्तीने तिची प्रवृत्ती आणि क्षमता यांनुसार कर्म करणे, हे तिच्यासाठी अन् समाजासाठी लाभदायक असते. चिंतनशील व्यक्तीने ज्ञानार्जन करणे, संशोधकबुद्धी असलेल्या व्यक्तीने संशोधन करणे, संघटनकुशल व्यक्तीने संघटन करणे, नेतृत्वगुण असलेल्या व्यक्तीने नेतृत्व करणे, व्यवहारकुशल व्यक्तीने व्यापार करणे, कलागुण असणार्‍या व्यक्तीने कला आत्मसात करणे इत्यादी स्वधर्मानुसार कृती करणे, हे व्यक्तीच्या एकंदर उत्कर्षासाठी साहाय्यक असते. मोहमयी संसारात मनुष्याला बाह्य विषयवस्तू सतत आकर्षित करत असतात, तसेच तो स्वतःची तुलना इतरांशी करत असतो. त्यामुळे त्याला स्वधर्माचा विसर पडतो. जन्मकुंडलीच्या माध्यमातून व्यक्तीला त्याच्या स्वधर्माचे ज्ञान होऊ शकते.

१ इ ४. जन्मकुंडलीवरून प्रारब्धाचे स्वरूप लक्षात येणे : प्रारब्ध हा जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या जीवनातील बहुतांश घटना, परिस्थिती, सुखदुःख, यशापयश हे प्रारब्धाने प्रभावित असतात. प्रारब्ध कळणे, ही मानवी बुद्धीच्या पलीकडील गोष्ट आहे; परंतु ज्योतिषशास्त्राच्या साहाय्याने प्रारब्धासंबंधी संकेत मिळतात. प्रारब्धाची तीव्रता किती, त्याचे स्वरूप काय आणि कोणत्या कालावधीत ते कशा प्रकारे फलद्रूप होईल, याचे जन्मकुंडलीवरून आकलन होते.

२. आधुनिक भौतिकवादी विचारसरणी आणि ज्योतिषशास्त्र 

आधुनिक भौतिकवादी विचारसरणीत ईश्वर, आत्मा, चेतना, पुनर्जन्म, कर्मफल आदी तत्त्वांना स्थान नाही. त्यामुळे आधुनिक शिक्षणप्रणालीत विविध विज्ञाने, तंत्रज्ञान, कला आदींचे शिक्षण तर मिळते; पण ‘जीवन म्हणजे काय ? जीवनाचे प्रयोजन काय ? जीवनाचे ध्येय काय ? आध्यात्मिक उन्नतीचे महत्त्व काय ?’, आदींविषयी काही शिकवले जात नाही. आजची शिक्षणप्रणाली जीवनाच्या गाभ्याला स्पर्श करत नाही, तर जीवनाच्या केवळ बाह्य अंगालाच महत्त्व देते. त्यामुळे व्यक्ती आणि समाज दिशाहीन होतो. ज्योतिषशास्त्र हे जीवनाच्या अंतरंगाला स्पर्श करणारे शास्त्र असल्याने व्यक्तीच्या जन्माचे उद्दिष्ट, त्याची प्रवृत्ती, स्वधर्म, प्रारब्ध आदींचा बोध होऊन व्यक्तीला जीवनात योग्य दिशा मिळू शकते.

३. ज्योतिषशास्त्र हे भारतीय विचारसरणी विकास पावलेले शास्त्र असणे

आधुनिक विचारसरणी भौतिकवादी असल्यामुळे सृष्टीच्या केवळ बाह्य अंगाला (जडत्वाला) सत्य मानते. त्यामुळे त्याद्वारे होणारा विकास एकांगी, अस्थिर, तात्कालिक आणि विनाशकारी आहे. याउलट भारतीय संस्कृतीत ‘समग्र सृष्टीच्या मुळाशी एकच चैतन्य (आत्मतत्त्व) आहे’, हा दृष्टीकोन आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या विचारसरणीवर होणारा विकास हा सर्वांगीण, स्थिर, व्यापक, दूरगामी आणि कल्याणकारी आहे. भारतीय संस्कृतीत विकास पावलेली शास्त्रे हीसुद्धा एकांगी नाहीत, तर भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही अंगांना स्पर्श करणारी आहेत. ज्योतिषशास्त्र हे त्यांपैकी एक शास्त्र आहे. ते केवळ बाह्य जीवनाविषयी नाही, तर आंतरिक जीवनाविषयी महत्त्वपूर्ण संकेत देते.

४. ज्योतिषशास्त्राच्या आध्यात्मिक अंगाला महत्त्व देणे आवश्यक !

दुर्दैवाने आधुनिक विचारसरणीच्या प्रभावामुळे आज ज्योतिषशास्त्राची आध्यात्मिक बाजू दुर्लक्षित झाली आहे. ज्योतिषशास्त्राचा आध्यात्मिक अंगाने विचार करणारे ज्योतिषी आज पुष्कळ अल्प आहेत; कारण लोक अधिकतर सांसारिक प्रश्न विचारण्यासाठी ज्योतिषांकडे येतात. आजची शिक्षणव्यवस्था केवळ भौतिकवादाचे धडे देत असल्याने लोकांनाही जीवनाची आध्यात्मिक बाजू जाणून घेण्याची प्रेरणा मिळत नाही. त्यामुळे मनुष्यजन्माचा उद्देश साध्य होतांना दिसत नाही. शेवटी सर्व समस्यांची उत्तरे काळामध्ये आहेत. काळाच्या ओघात समाजमन पालटत असते अन् काळ आता पालटत आहे. मानवतेवरील भौतिकवादाचा पगडा आता हळूहळू न्यून होत आहे. लोक ‘जीवनाच्या अंतरंगात काय आहे ?’, हे जाणण्याचा प्रयत्न करत आहेत. काळ पालटेल तसे ज्योतिषशास्त्रालाही त्याचे मूळ स्वरूप प्राप्त होईल, याची निश्चिती आहे !’

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (७.११.२०२५)