श्री दत्तात्रेयांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

१. भगवान दत्तात्रेय हे  परंपरेचे जनक असणे आणि त्यांनी गुरुकुलाची निर्मिती केली असणे

सुश्री (कु.) मधुरा भोसले

दत्तगुरूंच्या उत्पत्तीच्या पूर्वी गुरुतत्त्व हे पूर्णपणे निर्गुण स्तरावर कार्यरत होते. त्यामुळे किमान ७० टक्के आध्यात्मिक पातळी असलेले शिष्यच गुरुतत्त्वाशी जोडले जाऊन श्री गुरूंचे मार्गदर्शन आणि त्यांची कृपा प्राप्त करू शकत होते. श्री दत्तगुरूंच्या उत्पत्तीनंतर गुरुतत्त्व स्थुलातून सगुण स्तरावर गुरूंच्या रूपात प्रगट झाल्यामुळे तीव्र मुमुक्षूंची आध्यात्मिक पातळी ३० ते ६९ टक्के यामध्ये असली, तरी त्यांना सगुण गुरूंचे दर्शन घेण्याचे सौभाग्य प्राप्त होऊ लागले. गुरुसेवा आणि गुरुभक्ती करून अशा देहधारी गुरूंची कृपा संपादन करून शिष्य आध्यात्मिक उन्नती करू लागले. अशा प्रकारे श्री दत्तगुरूंमुळे गुरु-शिष्य परंपरेचा आरंभ झाला आणि गुरुकुलाची निर्मिती झाली. भगवान दत्तात्रेय हे गुरु-शिष्य परंपरेचे जनक आहेत. प्राचीन काळी दत्तात्रेयांचा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आश्रम होता. त्या ठिकाणी अनेक दत्तभक्तांनी येऊन दत्तात्रेयांच्या सगुण रूपाचे साक्षात् दर्शन घेऊन स्वतःचे जीवन कृतार्थ केले आहे.’


श्री दत्तगुरूंची विविध आध्यात्मिक रूपे


१. भक्तवत्सल आणि स्मर्तृगामी रूप : श्री दत्तात्रेय भक्तवत्सल आहेत. त्यामुळे जेव्हा विविध ठिकाणचे श्री दत्तगुरूंचे भक्त संकटात सापडतात किंवा भयंकर परिस्थितीला तोंड देत असतात, तेव्हा दत्तगुरु त्यांच्या भक्तांच्या हाकेला धावून येतात. या रूपाला ‘स्मर्तृगामी रूप’, म्हणजे ‘स्मरण करताच उपस्थित रहाणारे रूप’ असे म्हणतात.
२. उद्धारक स्वरूप : दत्तगुरु विविध ठिकाणी भ्रमण करत असतांना विविध जिवांच्या संपर्कात येतात. तेव्हा ते त्यांना दीक्षा देतात, भस्म लावतात किंवा विशिष्ट सिद्धमंत्र म्हणण्यास सांगतात. त्यामुळे त्या जिवाचे प्रारब्ध जळून त्याचा नवजन्मच होतो. पतीत झालेल्या विविध जिवांचा उद्धार करणार्‍या या श्री दत्तगुरूंच्या अवताराला ‘उद्धारक अवतार’, असे संबोधतात.
– सुश्री मधुरा भोसले


२. श्री दत्तात्रेयांच्या मनोहर पादुका, विमल पादुका आणि निर्गुण पादुका


श्री दत्तगुरूंचे विविध आध्यात्मिक अवतार


१. ज्ञानावतार : जेव्हा दत्तगुरूंचे निर्गुण आणि निराकार रूप ज्ञानाच्या रूपाने शिष्याच्या मनात उदयास येते, तेव्हा श्री दत्तगुरूंच्या या अवताराला ‘ज्ञानावतार’ असे संबोधतात. हा अवतार शिष्याच्या हृदयात प्रगट होणारा सूक्ष्म अवतार आहे.
२. योगीराज अवतार : जेव्हा नाथपंथी, दत्तसंप्रदायी किंवा अन्य प्रकारे दत्तात्रेयांची उपासना करणार्‍या शिष्याची योगशक्ती जागृत करून त्याला योगबळ द्यायचे असते, तेव्हा श्रीदत्त योगीराज अवतार धारण करतात. या अवतारात ते काही क्षणांसाठी स्थुलातून सगुणात, म्हणजे देहधारी रूपात प्रगट होऊन शिष्याच्या आज्ञाचक्राला डाव्या पायाचा अंगठा किंवा उजव्या हाताचा अंगठा लावून तो दाबतात आणि त्याच्या कानात गुप्त स्वरूपातील गुरुमंत्र पुटपुटतात. त्यामुळे शिष्याची कुंडलिनीशक्ती जागृत होऊन ती आज्ञाचक्रापर्यंत पोचते आणि त्याला शक्तीपातयोगानुसार दत्तगुरूंची दीक्षा मिळते. त्यामुळे श्री दत्तगुरूंच्या या अवताराला ‘योगीराज अवतार’ असे संबोधले आहे. – सुश्री मधुरा भोसले


३. श्री दत्तगुरूंच्या विविध आध्यात्मिक अवस्था

३ अ. दिगंबर अवस्था : ‘दिक् एव अम्बरः ।’ म्हणजे ‘दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे असा’, म्हणजे सर्वव्यापी असणारे श्री गुरुदेव दत्त. या अवस्थेत असतांना श्री दत्त केवळ कौपीन (भगव्या रंगाची लंगोट) धारण करून विविध ठिकाणी भ्रमण करत भिक्षा मागतात.

३ आ. अवधूत अवस्था : ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।’ या जयघोषातील ‘अवधूत’ या शब्दाचा अर्थ आहे भक्तांचे चिंतन करणारा आणि भक्तांचा हितचिंतक. हे श्री दत्तगुरूंचे विराट रूप आहे. जेव्हा भक्त दत्तांच्या विराट रूपाच्या दर्शनाची कामना करतात, तेव्हा श्री दत्त अवधूत अवस्थेत जाऊन विराट रूप धारण करतात आणि त्यांच्या भक्तांना दर्शन देऊन त्यांची मनोकामना पूर्ण करतात.

३ इ. निरंजनावस्था : या अवस्थेत श्री दत्तगुरु हातात धर्मदंड घेऊन देहावर काशाय (भगवे) वस्त्र आणि पायांत खडावा धारण करून विविध ठिकाणी भ्रमण करतात. तेव्हा ते शिवदशेत वावरतात.


श्री दत्तगुरूंच्या शिष्यांनी विविध युगांमध्ये केलेली त्यांची नवविधाभक्ती आणि दत्तोपासना !


१. श्रवणभक्ती : विष्णुदत्त
२. कीर्तनभक्ती : वेदधर्मा
३. स्मरणभक्ती : कार्तवीर्य अर्जुन
४. पादसेवनभक्ती : दीपक
५. अर्चनभक्ती : यदुराजा
६. वंदनभक्ती : अलर्कराजा
७. दास्यभक्ती : आयुराजा
८. सख्यभक्ती : परशुराम
९. आत्मनिवेदनभक्ती : विविध दत्तभक्त
– सुश्री मधुरा भोसले


४. श्री दत्तगुरूंच्या संकल्पातून निर्माण झालेली दत्तपिठे, ज्ञानपिठे आणि गुरुपिठे अन् त्यांच्यातील आध्यात्मिक भेद

श्री दत्तगुरूंच्या कृपेमुळे भारतात दत्तपिठे, ज्ञानपिठे, गुरुपिठे यांची निर्मिती झाली. या पिठांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये पुढे विशद केली आहेत.

५. श्री दत्ताशी संबंधित असणारे विविध धार्मिक ग्रंथ

‘दत्तपुराण, अवधूतगीता आणि श्रीगुरुचरित्र’, हे श्री दत्तात्रेय अन् त्यांचे अवतार यांच्याशी संबंधित धर्मग्रंथ आहेत. या ग्रंथांचे भावपूर्णरित्या वाचन करून त्यांतील सूत्रांनुसार आचरण केल्यावर भाविकांवर श्री दत्तगुरूंची भरभरून कृपा होते.

श्री दत्तगुरूंच्या चरणी कृतज्ञता !

अखंड व्हावे श्री दत्तगुरूंचे स्मरण । आमच्या हृदयी स्थापावे श्री गुरुचरण ।।

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(ज्ञान मिळण्याचा दिनांक आणि टंकलेखन करण्याची वेळ २.११.२०२५, दुपारी ३ ते ३.१५)