नाशिक येथील झाडे वाचवून साधूग्रामही होईल, असा मार्ग काढणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

वृक्षतोडीला विनाकारण आक्षेप घेणार्‍यांवर मुख्यमंत्र्यांची टीका !

नाशिक – येथील तपोवनामधील वृक्षतोडीविषयीचे राजकारण दुर्दैवी असून ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ए असे म्हणणारे याविषयीच्या आंदोलनात पुढे आहेत. तपोवनातील झाडे गेल्या ४ – ५ वर्षांतील असून झाडे वाचली पाहिजेत आणि साधूग्रामही झाले पाहिजे, असा मध्यममार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. नाशिक महापालिकेच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले,…

१. कुंभपर्वाचे पावित्र्य टिकवून विकासासोबत ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यात येईल.

२. कुंभपर्व म्हणजे सनातन संस्कृतीचे प्रतीक असून यात नदी आणि वृक्ष संवर्धन महत्त्वाचे आहे. झाडे तोडणे कुणालाही आवडणारे नाही; मात्र तपोवनात पूर्वी झाडे नव्हती. ही जागा साधूग्रामसाठीच राखीव असून वर्ष २०१७ – २०१८ मध्ये महापालिकेने येथे वृक्षारोपण केले होते. तीच ही झाडे आहेत. प्रयागराजचा कुंभमेळा १५ सहस्र हेक्टरवर झाला होता. नाशिकचा कुंभमेळा ३५० एकर जागेवर होणार असून या वादात मध्यम मार्ग काढला जाईल.

३. साधूंच्या मुक्कामासाठी तपोवनातील गर्द झाडी तोडून तिथे साधूग्राम बांधण्याचा निर्णय सरकारी पातळीवरून घेण्यात आला आहे. याला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला असला, तरी तपोवनात वृक्षतोड करण्यावर सरकार ठाम आहे.

४. कुंभपर्व आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे, तसेच पर्यावरणही महत्त्वाचे आहे. आमचे कुणाचेही मत नाही की, झाडे तोडली गेली पाहिजेत. यात एक गोष्ट लक्षात घ्या. प्रयागराजला जिथे कुंभपर्व होतो, तिथे १५ सहस्र हेक्टर जागा आहे. नाशिकची साधूग्रामची जागा ३०० ते ३५० एकर आहे. वर्ष २०१५-१६ च्या गूगलच्या नकाशात तेथे झाड दिसत नव्हते; पण राज्यशासनाने ५० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला, तेव्हा नाशिक महापालिकेने ही झाडे लावली. आता तेथे झाडांमुळे साधूग्राम निर्माण होणे अशक्य आहे; पण न्यूनतम झाडे कापली जाऊन त्यांची पुनर्लागवड कशी करता येईल, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

५. काही लोक विनाकारण पर्यावरणवादी झाले आहेत. पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही, असा मार्ग आम्ही काढू.