श्री गुरु दत्तात्रेयांनी श्री टेंब्येस्वामी यांना दाखवलेली चूक आणि त्यातील मतितार्थ !

एकदा प.प.वासुदेवानंद सरस्वती (श्री टेंब्येस्वामी) मंदिरात पूजेस बसले असता कुणीतरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले. प्रसादाचे ताट पाहून तेथील ब्राह्मण पुजार्‍याचा मोह अनावर झाला. त्याने ते नैवेद्य भरलेले ताट त्वरित खाल्ले. तेव्हा श्री टेंब्येस्वामी फार चिडले. त्याला पुष्कळ बडबडले आणि नंतर पूजेस बसले.

श्री टेंब्येस्वामी

श्री गुरु दत्तात्रेयांनी श्री टेंब्येस्वामी यांना पुजारी ३ दिवस जेवला नसल्याचे सांगून चुकीची जाणीव करून देणे

पूजा संपल्यावर श्री गुरु दत्तात्रेयांना गाभार्‍यातून निघून जातांना त्यांनी पाहिले. त्यानंतर ३ दिवस त्यांना श्री गुरु दत्तात्रेयांनी दर्शन दिले नाही. ते बैचेन झाले. त्यांना कळले, ‘मी पुजार्‍याला रागावून बोललो; म्हणून श्री गुरु दत्तात्रेयांना राग आला असणार. तेव्हा श्री टेंब्येस्वामी सरस्वतींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, तसेच त्यांच्या मुखातून ‘करुणा त्रिपदी’चे बोल बाहेर पडले, ‘शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता ।’

‘करुणा त्रिपदी’चे हे बोल ऐकून श्री गुरु दत्तात्रेय टेंब्येस्वामी सरस्वतींच्या समोर उभे राहिले. तेव्हा श्री टेंब्येस्वामी म्हणाले, ‘देवा माझे काही चुकले, असे मला वाटत नाही. तुला नैवैद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजार्‍याने तो खाल्ला.’ तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांनी प्रश्न केला, ‘इथे सत्ता कुणाची ?’ या प्रश्नावर श्री टेंब्येस्वामी म्हणाले, ‘देवा इथे सत्ता तुमची आहे. इथे सारे तुमच्या इच्छेने चालते.’ त्यावर श्री गुरु दत्तात्रेय म्हणाले, ‘अरे, तो पुजारी गेले ३ दिवस उपाशी होता, याच्यासाठी मी ते ताट पाठवले होते, ते त्याने खाल्ले. त्यात तुझे काय गेले…?’ त्यावर श्री टेंब्येस्वामी सरस्वतींना स्वतःची चूक कळली आणि श्री गुरु दत्तात्रेय अंतर्धान पावले.

रागावर नियंत्रण नसेल, तर आयुष्यभराची साधना व्यर्थ होऊ शकते !

या आध्यात्मिक मार्गात प्रामाणिकपणे वाटचाल करणार्‍या माणसाची देवाकडून, गुरूंकडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते. इतका हा मार्ग कठीण आहे. टेंब्येस्वामी हे अधिकारी पुरुष होते. एका रागामुळे त्यांची ही अवस्था झाली. आपण तर सामान्य माणसे आपण जर राग आवरू शकलो नाही, तर स्वतःची आयुष्यभराची साधना व्यर्थ होऊ शकते.

ईश्वरी इच्छेचा आदर करणे महत्त्वाचे !

आपण ज्या मंदिरात जातो तेथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी, ‘त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते. तिथे चालणार्‍या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते. मंदिरातील सेवेकरी, पुजारी आणि विश्वस्त यांची सर्व कृत्ये त्या देवाला ठाऊक असतात. ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते, तेथे सामान्य माणसाने केवळ ईश्वरी इच्छेचा आदर करावा.

(साभार : विविध संकेतस्थळे)

मंदिरात देवाची सत्ता असते आणि केवळ तिथेच नव्हे, तर संपूर्ण विश्वात चालणार्‍या सर्वच गोष्टींकडे त्याचे लक्ष असते !