Chinese Infiltrator Arrested उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ एका चिनी घुसखोराला अटक !

पाकिस्तानशी संबंधाचा संशय !


लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील बहराइच येथील नेपाळ सीमेजवळ सुरक्षादलाच्या सैनिकांनी २४ नोव्हेंबर या दिवशी एका चिनी घुसखोराला अटक केली. कुठलीही अनुमती न घेता भारतीय भूभागात घुसून संवेदनशील ठिकाणांचे व्हिडिओ बनवतांना त्याला पकडण्यात आले. अटकेतील चिनी नागरिक चीनमधील हुनान प्रांतातील असून त्याचे नाव लिऊ कुंजिंग असे आहे.

चिनी घुसखोर लिऊ कुंजिंग

चौकशीत त्याच्याकडे भारतात प्रवेशासाठी कोणतेही वैध कागदपत्र नसल्याचे समोर आले. त्याच्याकडून पाकिस्तान, चीन आणि नेपाळ या देशांच्या चलनी नोटा, ३ भ्रमणभाष संच आणि नेपाळचे मानचित्र (नकाशा) जप्त करण्यात आला. चौकशीत तो पाकिस्तानला भेट देऊन परतल्याचेही स्पष्ट झाले. त्याला सखोल चौकशीसाठी पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे. बहराइचमधील रूपैडिहा पोलीस ठाण्यात विदेशी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस आणि इतर सुरक्षायंत्रणा पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानी, बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्यासह आता चिनी घुसखोरही भारतात सापडणे, हे लज्जास्पद !