Devkinandan Thakurji : सनातन संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी ‘सनातन बोर्डा’ची स्थापना करा !

सनातन संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी हरिद्वारमध्ये ‘विश्व सनातन महापीठ’ बांधणार ! – कथावाचक देवकीनंदन ठाकूर

कथावाचक देवकीनंदन ठाकूर

हरिद्वार (उत्तराखंड) – स्वातंत्र्यापासून भारतात ‘वक्फ बोर्ड’ आहे. मग हिंदूंसाठी ‘सनातन बोर्ड’ का असू शकत नाही? सनातन संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी ‘सनातन बोर्डा’ची स्थापना करा, अशी मागणी सुप्रसिद्ध कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी येथे केली. सनातन संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी हरिद्वारमध्ये २१ नोव्हेंबरला ‘विश्व सनातन महापिठा’चा शिलापूजन समारंभ उत्साहात पार पडला. यामध्ये देशभरातील प्रमुख संत आणि कथावाचकर उपस्थित होते. यामध्ये कथावाचक ठाकूर बोलत होते.

कथावाचक देवकीनंदन ठाकूर पुढे म्हणाले, ‘‘कुठल्याही शाळेत मुलांना टिळा लावण्यापासून रोखल्यास पालकांनी शाळेत जाऊन प्रशासकांकडून स्पष्टीकरण मागितले पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांना केवळ सनातनचा उपदेश करू नये, तर त्यांना अभिमानाने सनातनी बनवावे. ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांच्या तुलनेत हिंदूंमध्ये धार्मिक शिक्षणाचे प्रमाण फार अल्प आहे. मुसलमानांची मुले मदरशांमध्ये जातात; पण आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जातात, जिथे सनातनी मूल्ये शिकवली जात नाहीत. जर आपल्या मुलांना आपण श्रीराम, श्रीकृष्ण, रामायण आणि गीतेचे धडे दिले असते, तर आज मथुरेत श्रीकृष्णाचे भव्य मंदिर बांधले गेले असते. आपण धर्मापेक्षा पैशांना अधिक महत्त्व दिले, ज्यामुळे विकासाच्या नावाखाली विनाश झाला. आपली सर्व तीर्थस्थळे मांस आणि दारूच्या दुकानांपासून मुक्त असली पाहिजेत. ’’

१०० एकर भूमीवर बांधले जाणार ‘विश्व सनातन महापीठ !’

‘विश्व सनातन महापीठ’ हा प्रकल्प १०० एकर भूमीवर बांधला जाणार असून यासाठी अंदाजे १ सहस्र कोटी रुपये गुंतवले जातील. बाबा हठयोगी आणि रामविशाल दास महाराज यांनी या प्रकल्पाच्या विविध उद्दिष्टांची माहिती या वेळी दिली. या प्रकल्पात वेद मंदिर, शंकराचार्य पीठांसाठी प्रेरणा संकुल, १०८ संत निवासस्थाने, एक स्वयंरोजगार केंद्र आणि स्थानिक गाय संवर्धन केंद्र यांचा समावेश असणार आहे.