
१. राष्ट्राला सशक्त बनवण्यासाठी एकच राष्ट्रभाषा असणे आवश्यक !
‘भाषा हे अनुभूतीला अभिव्यक्त करण्याचे केवळ माध्यम नाही, तर ती संस्कृतीला संस्कारित करणारी वीणा आणि शब्द देणारी वाणी आहे. कोणत्याही देशाचे प्राण तिची संस्कृती असते. संस्कृतीची अभिव्यक्ती भाषेद्वारे व्यक्त होते. जो श्रद्धाभाव ‘भारतमाता’ शब्दात आहे, तो ‘मदर इंडिया’मध्ये होऊच शकत नाही. ‘मातोश्री’ बोलण्यात जो स्नेहभाव आहे, तो ‘मम्मी’ शब्दात कुठे आहे ? भाषा राष्ट्राची एकता, अखंडता आणि विकास यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. जर राष्ट्राला सशक्त बनवायचे असेल, तर एकच राष्ट्रभाषा असली पाहिजे.
२. देशात पालटणार्या राजकारणामुळे हिंदीच्या ऐवजी इंग्रजी मुख्य राजभाषा बनणे
१२ ते १४ सप्टेंबर १९४९ या कालावधीत चाललेल्या ‘संविधान सभे’तील चर्चासत्रात हिंदीला राजभाषा आणि इंग्रजीला १५ वर्षांपर्यंत अतिरिक्त भाषा ठेवण्याचा प्रस्ताव मान्य झाला; परंतु या देशाचे भाषेविषयीचे राजकारण ज्याप्रकारे कूस पालटत आहे, त्यामुळे अतिरिक्त भाषेच्या रूपात मान्य केलेली इंग्रजी आजही मुख्य राजभाषा बनली आहे आणि हिंदी भाषा इंग्रजीच्या ‘अतिरिक्तत्व’चे ओझे वहात आहे.
३. इंग्रजीचे शिक्षण देणे आणि इंग्रजीचा वापर करणे, म्हणजे गुलामगिरी !
म. गांधींना विदेशी भाषेचे दुष्परिणाम चांगलेच ठाऊक होते. ते म्हणाले, ‘‘विदेशी भाषेतून शिक्षण घेतांना जे ओझे मनावर पडते, ते असह्य आहे. यामुळे देशातील पदवीधर (ग्रॅज्युएट) अधिकांश बेरोजगार, कमजोर, निरुत्साही, रुग्ण आणि केवळ नक्कल करणारे बनतात. त्यांच्यात जिज्ञासा, विचार करण्याची शक्ती, धैर्य, शौर्य, निर्भयता इत्यादी गुण अत्यंत क्षीण होतात. कोट्यवधी लोकांना इंग्रजीचे शिक्षण देणे, हे त्यांना गुलामगिरीत जखडण्यासारखे आहे. हा काय अल्प अन्याय आहे की, आपल्या देशात जर मला न्याय मिळवायचा असेल, तर मला इंग्रजी वापरावीच लागेल. अधिवक्ता झाल्यावर मी स्वभाषा बोलूच शकणार नाही, ही गुलामीची शर्थ नव्हे, तर आणखी काय आहे ?’’
जपानी नागरिकांचा आदर्श घेऊन मातृभाषेत बोला !

जपानी लोक अमेरिकेतही त्यांच्या देशाची जपानी भाषा बोलतात आणि आपण आपल्या देशातही पाश्चात्त्य भाषा वापरून हिंदु संस्कृतीची गळचेपी करत आहोत. गुलामगिरीचे साखळदंड तोडा ! स्वतः मातृभाषेत बोला आणि इतरांनाही प्रेरित करा.
(साभार : मासिक ‘ऋषीप्रसाद’, ऑगस्ट २०१५)
४. राष्ट्रभाषा हिंदीच का ?
४ अ. राष्ट्रभाषेची लक्षणे असणारी हिंदी भाषाच राष्ट्रभाषा होऊ शकणे : आपण गांभीर्याने विचार केला, तर आपल्या लक्षात येईल की, इंग्रजी ही राष्ट्रीय भाषा होऊ शकणार नाही किंवा ती व्हावी, असेही वाटणार नाही. राष्ट्रभाषेची काही लक्षणे पुढे दिली आहेत.
४ अ १. राष्ट्रीय भाषा सरकारी नोकरी करणार्यांसाठी आणि संपूर्ण राष्ट्रासाठी सोपी असावी.
४ अ २. तिच्याद्वारे भारताचे धार्मिक, आर्थिक आणि राजकीय कामकाज होऊ शकले पाहिजे.
४ अ ३. ती भाषा देशातील अधिकाधिक लोक बोलत असले पाहिजेत.
४ अ ४. त्या भाषेचा विचार करतांना क्षणिक स्थितीवर भर दिला जाऊ नये.
इंग्रजी भाषेत यांपैकी एकही लक्षण नाही; म्हणून ती राष्ट्राची भाषा होऊ शकत नाही. हिंदीत ही सर्व लक्षणे आहेत. बहुतांश धर्माेपदेशक संपूर्ण भारतात त्यांचे मार्गदर्शन हिंदीतूनच करतात आणि निरक्षर जनता ती समजून घेते. अशा प्रकारे हिंदी भाषा पूर्वीपासूनच राष्ट्रभाषा बनलेली आहे; म्हणून हिंदीच राष्ट्रभाषा होऊ शकते.
४ आ. स्वदेशाभिमान आणि शिकण्याची वृत्ती यांमुळे सर्व राज्यातील लोकांना हिंदी भाषेत कामकाज करणे सोपे ! : मराठी, बंगाली, सिंधी आणि गुजराती लोकांसाठी हिंदी भाषा वापरणे अतिशय सोपे आहे. काही मासांतच ते हिंदी भाषेत प्राविण्य मिळवून त्या भाषेत ते राष्ट्रीय कामकाज करू शकतात. तमिळ इत्यादी द्रविडी क्षेत्रांत त्यांच्या स्वतंत्र भाषा आहेत आणि त्यांची रचना अन् व्याकरण संस्कृतपेक्षा निराळे आहे; परंतु ही कठीणता केवळ आजच्या शिकलेल्या लोकांसाठीच आहे. त्यांच्या स्वदेशाभिमानावर भरवसा करण्याचा आणि विशेष प्रयत्न करून हिंदी भाषा शिकून घेण्याची आशा बाळगण्याचा आपल्याला अधिकार आहे. जर हिंदीला राष्ट्र भाषेचे पद मिळाले, तर मद्रास आणि इतर राज्यांत विशेष परिचय होण्याची शक्यता वाढेल.
४ इ. भारताला एक राष्ट्र बनवणारी हिंदी भाषा ! : हिंदीला आपण राष्ट्रभाषा मानतो. तीच भाषा राष्ट्रीय बनू शकते, जी अधिकाधिक संख्येने लोक जाणतात, बोलतात आणि जी शिकायला सोपी असेल. (सद्यःस्थितीत हिंदी भाषिकांची संख्या ६० कोटींहूनही अधिक आहे.) ‘जर आपल्याला भारताला एक राष्ट्र बनवायचे असेल, तर कुणी मानो किंवा न मानो, राष्ट्रभाषा तर हिंदीच बनू शकते; कारण जे स्थान हिंदीला लाभले आहे, ते स्थान अन्य भाषेला कधीच मिळू शकत नाही.’
(साभार : ‘मेरे सपनों का भारत’ पुस्तकातून संक्षिप्त, लेखक : मोहनदास गांधी)
५. हिंदी भाषेच्या विकासात संत-महात्म्यांचे योगदान
हिंदी भाषेच्या विकासात संत-महात्म्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. उत्तर भारतातील संत सूरदास, संत तुलसीदास आणि संत मीराबाई, दक्षिण भारतातील प्रमुख संत वल्लभाचार्य, रामानंदाचार्य, महाराष्ट्रातील संत नामदेव महाराज, गुजरातचे ऋषि दयानंद सरस्वती, राजस्थानचे संत दादू दयालजी महाराज, पंजाबचे गुरु नानकदेव इत्यादी संतांनी हिंदु धर्म अन् संस्कृती यांच्या प्रचार-प्रसारासाठी हिंदीलाच सशक्त माध्यम बनवले होते.
६. हिंदी भाषेचा वापर करण्याविषयी समाजाची मानसिकता
आपण स्वतः आपल्या कामकाजात हिंदीचा किती वापर करतो ? स्वतःची स्वाक्षरी, घराबाहेरील नावाची पाटी (नेमप्लेट), हिशोब, टपाल आणि अधिकोष यांचे व्यवहार या सर्वांमध्ये आपण हिंदीचा वापर करतो का ?, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. लोक आपल्या वाहनांवर देवीदेवतांविषयीची वाक्ये उदाहरणार्थ ‘जय माता दी’, ‘ॐ नमः शिवाय’, ‘हरि ॐ’ इत्यादी इंग्रजीत लिहून अभिमानाने मिरवतात.’
(साभार : मासिक ‘ऋषीप्रसाद’, ऑगस्ट २०१५)
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !