कोल्हापूर येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा !

सोहळ्याला ‘सनातन प्रभात’चे ३५० हून अधिक वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते, हिंदुत्वनिष्ठ यांची उपस्थिती

– व्यासपिठावर दैनिक ‘सनातन प्रभात’ विशेषांकाचे प्रकाशन करतांना डावीकडून श्री. अजय केळकर, श्री. समीर दरेकर, सद्गुरु स्वाती खाडये आणि श्री. सुनील घनवट

कोल्हापूर, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – गेल्या २६ वर्षांपासून अविरतपणे हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध असलेल्या आणि समाजावर साधना अन् धर्मपालन यांचे संस्कार करणार्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’चा २६ वा वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात येथील ‘नष्टे लॉन’ येथे पार पडला. या सोहळ्याला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, हिंदुत्वनिष्ठ लेखक अन् व्याख्याते श्री. समीर दरेकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेष प्रतिनिधी श्री. अजय केळकर यांनी संबोधित केले. या सोहळ्याला ‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते, साधक अशा ३५० हून अधिक जणांची उपस्थिती होती. या वेळी मान्यवरांच्या हस्ते ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

व्यासपीठावर दीपप्रज्वलन करतांना  (डावीकडून)  सद्गुरू स्वाती खाड्ये, श्री. समीर दरेकर, श्री. अजय केळकर, श्री. सुनील घनवट

सद्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर वेदमूर्ती श्री. प्रसाद निगुडकर यांनी वेदमंत्रपठण केले. ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिक समूहाचे संस्थापक संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या संदेशाचे वाचन रणरागिणी शाखेच्या सौ. प्रीती पवार यांनी केले. या प्रसंगी सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान सौ. गौरी पाटील यांनी केला. श्री. समीर दरेकर यांचा सत्कार बांधकाम व्यावसायिक श्री. आनंद पाटील यांनी केला, तर श्री. सुनील घनवट यांचा सत्कार व्यावसायिक श्री. प्रभुप्रसाद जांगीड यांनी केला.


सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवर

सोहळ्याला उपस्थित वाचक आणि मान्यवर

संत, प्रवचनकार – ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील

हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर – शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, ‘सेवाव्रत प्रतिष्ठान’चे संस्थापक आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. संभाजीराव साळुंखे, उद्वव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ‘हिंदु एकता’चे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, श्री. दिलीप भिवटे, चिकोडी (कर्नाटक) श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. अमोल चेंडके, ‘अंबाबाई भक्त समिती’चे श्री. प्रमोद सावंत, वीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळा’चे श्री. नितीन वाडीकर, उद्योजिका सौ. मनीषा वाडीकर, हिंदु महासभेचे श्री. मनोहर सोरप, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रामभाऊ मेथे, सचिन भोसले, रघुनाथ टिपुगडे, मंदिर महामंघाचे सर्वश्री अशोक गुरव, आप्पासाहेब गुरव, सुभाष सुर्वे, ‘नमो नमो संघटने’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम जरग, हिंदु महासभेच्या महिला आघाडीच्या शैलाताई माने आणि रश्मी साळोखे, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, श्री. अमेय भालकर, श्री. विकास जाधव, श्रीराम सेनेचे श्री निवास चव्हाण, भाजप उपाध्यक्ष श्री. अजित सूर्यवंशी

‘सनातन प्रभात’ने हिंदु जागृतीसह अध्यात्मविषयक सदरांतून समाजाला साधना शिकवली ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु स्वाती खाडये

‘साधना’ हा मानवी आयुष्याचा महत्त्वाचा पैलू असून साधनेमुळे व्यक्तीमध्ये किती परिवर्तन होऊ शकते, याविषयीच्या अनुभूती ‘सनातन प्रभात’मध्ये वेळोवेळी प्रसिद्ध होतात. साधना म्हणजे काय ? याविषयीचे जे लेख प्रसिद्ध होतात, तेही दिशादर्शक असतात. हिंदूंच्या सर्व धर्मग्रंथांमध्ये साधना, षड्रिपू निर्मूलन, अहंकार घालवणे यांविषयी मार्गदर्शन केले आहे; पण ते प्रत्यक्ष कृतीत कसे आणायचे ? हे साधनाविषयक लेखांमधून शिकायला मिळते. ‘सनातन प्रभात’ने केवळ हिंदु समाजात जागृतीच केली नाही, तर अध्यात्मविषयक सदरांतून समाजाला साधना शिकवली, धर्मशिक्षणविषयक सदरांतून समाजाला धर्माचरण करायला शिकवले, हिंदूंवरील आघात समाजासमोर मांडून हिंदुजागृती केली; परिणामी अनेक जणांनी साधना चालू केली, अनेक जणांनी धर्माचरणाला आरंभ केला.

हिंदु समाजाला धर्माच्या कार्यासाठी, अस्तित्वासाठी जागृत व्हावेच लागेल ! – समीर दरेकर, प्रखर हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते

समीर दरेकर

अल्पसंख्य या शब्दाचे गारूड अद्यापही हिंदूंवर पुष्कळ मोठ्या प्रमाणात आहे. या देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. मुसलमानांना स्वतंत्र राष्ट्र, भूमी आणि संस्कृतीही दिली. इतके सगळे त्यांना दिल्यानंतरही सच्चर आयोगाच्या माध्यमातून मुसलमानांना २२ मंत्रालयांच्या माध्यमातून सहस्रो कोटी रुपयांची खिरापत वाटण्यात आली. यात मदरशांच्या आधुनिकरणापासून पोलीस प्रशिक्षण यांसह प्रत्येक गोष्टीसाठी मुसलमानांना हिंदूंच्या करातून मिळणार निधी दिला गेला. यापुढील काळात हिंदूंना नेमका शत्रूबोध समजावून घेऊन त्याप्रमाणे कृती करावी लागेल ! हिंदु समाजाला धर्माच्या कार्यासाठी, अस्तित्वासाठी जागृत व्हावेच लागेल !


हिंदु राष्ट्र स्थापनेच्या वैचारिक क्रांतीचा शिलेदार म्हणजे ‘सनातन प्रभात’ ! – अजय केळकर, विशेष वरिष्ठ प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’

गेल्या २७ वर्षांत हिंदूंना सर्वधर्मसमभावाच्या भ्रमातून बाहेर काढून धर्मनिष्ठ बनवण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ने केले आहे. राष्ट्र-धर्म विरोधकांची पोलखोल करण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ने केले. हिंदूंचा हरवलेला आत्मविश्वास, क्षात्रतेज आणि त्यांचा धर्माभिमान यांना प्रज्वलित करण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ने केले आहे. ‘हलाल जिहाद’ असो वा ‘लव्ह जिहाद’, अशा अनेक विषयांवर प्रारंभीपासून ‘सनातन प्रभात’ने सजग भूमिका घेतली आणि हेच विषय पुढे आंदोलनाचे कारण ठरले. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘केसरी’ जसे स्वराज्यासाठी लढले, तसे आज ‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्रासाठी लढत आहे !


हिंदु राष्ट्राच्या वैचारिक क्रांतीला पाठबळ देण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

कोणतेही राजकीय पाठबळ नसतांना, हिंदु विरोधकांच्या विरोधाला पुरून उरत तब्बल २७ वर्षे हिंदुत्वाच्या विचारांचे दैनिक चालवणे, ही काही सोपी गोष्ट नाही. गेल्या काही वर्षांपासून देशभरात हिंदुत्वाचे वारे वहात असल्याचे चित्र आहे; पण जेव्हा ‘हिंदुत्वाचा पुरस्कार करणेही अपराध वाटावा’, अशी स्थिती होती, तेव्हा ‘सनातन प्रभात’ने निर्भीडपणे हिंदुत्वाची बाजू उचलून धरली. ‘प्रतिकूल परिस्थितीतही प्राणपणाने झुंज देणे’, हा योद्ध्याचा गुण आहे. त्या अर्थाने ‘सनातन प्रभात’ हे एक वर्तमानपत्र असले, तरी त्याची भूमिका वैचारिक योद्ध्यापेक्षा अल्प नाही. आज अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय उराशी बाळगून मार्गक्रमण करत आहेत. या ध्येयाला, अर्थात् हिंदु राष्ट्र विषयक चळवळींना वैचारिक बळ पुरवण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे. हिंदु राष्ट्रविषयक चळवळींना प्रसिद्धी देऊन ‘हिंदु राष्ट्रा’चा विचार जनसामान्यांपर्यंत पोचवण्यामध्ये ‘सनातन प्रभात’चे विशेष योगदान आहे. ‘सनातन प्रभात’चा प्रत्येक वाचक, तसेच वर्गणीदार यांना हिंदु राष्ट्राच्या कार्याच्या स्थापनेत प्रत्यक्ष कृतीशील करण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे.