१० नोव्हेंबर २०२५ या दिवशी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास देहलीतील लाल किल्ल्याजवळ अत्यंत शक्तीशाली असा स्फोट एका हळूहळू पुढे सरकणार्या गाडीमधून झाला आणि त्यात १३ जण मृत्यू पावले, तर अनेक जण घायाळ झाले. मृतांमधील अनेक जण मुसलमान आहेत. हा स्फोट हे आतंकवादी कृत्य होते आणि त्यात अनेक निष्पाप लोकांना ठार मारून जगाचे लक्ष्य त्याच्याकडे वेधणे, हेच होते. सध्या या स्फोटाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय्.ए. – नॅशनल इन्व्हिस्टिगेशन एजन्सी) करत आहे.
१. अन्वेषणात उघड झालेली माहिती
आतापर्यंतच्या अन्वेषणात असे दिसते की, डॉ. उमर नबी जो हरियाणातील फरीदाबाद येथे असलेल्या ‘अल् फलाह विद्यापिठा’त शिकवत होता. हा मूळचा काश्मिरी; पण त्याने वर्ष २०२४ मध्ये काश्मीर सोडले होते. ‘आयईडी’ स्फोट करण्यात तो प्रशिक्षित होता. त्यापूर्वी मागच्या १५ दिवसांत जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि उत्तरप्रदेश पोलिसांनी ३ डॉक्टरांसह ८ लोकांना पकडले होते. त्यामध्ये पुलवामा येथे रहाणार्या डॉ. मुजम्मिल अहमद गनेय (वय ३२ वर्षे) उपाख्य मुसाईब आणि लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे रहाणार्या डॉ. शाहीन शाहीद (वय ४० वर्षे) यांना अनुक्रमे ३० ऑक्टोबर अन् ८ नोव्हेंबर या दिवशी अटक करण्यात आली होती. हे दोघेही ‘अल फलाह रुग्णालया’त काम करत होते. डॉ. अदिल जो जम्मू-काश्मीरमधील पुलवामा, वानपोरा येथील रहिवासी होता, त्याला उत्तरप्रदेशातील सर्हाणपूर येथून ५ नोव्हेंबरला पकडण्यात आले होते. १० नोव्हेंबर या दिवशी डॉ. मुजम्मिल हा ज्या घरात भाड्याने रहात होता, तेथून ३५० किलो स्फोटके आणि शस्त्रे पकडल्याचे फरीदाबाद पोलिसांनी वृत्तप्रतिनिधींना सांगितल्यानंतर वरील लोकांना अटक केल्याचे उघडकीस आले होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनीही घोषित केले की, २९०० किलो स्फोटके, शस्त्रे, टाइमर्स, बॅटरीज आणि मेटल शीट्स कह्यात घेतली आहेत. बाकीचे लोक पकडले गेल्यानंतर घाईघाईत ‘आपण पकडले जाऊ नये’; म्हणून डॉ. उमर नबी हा काही स्फोटके घेऊन गाडीने जात असतांना लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानकाच्या जवळ संध्याकाळी गर्दीच्या वेळी त्याने स्फोट केला.

२. महिला आतंकवादी डॉ. शाहीन शाहीद हिची अटक आणि त्याचा मतितार्थ
डॉ. शाहीन शाहीद ही नुकत्याच बनवण्यात आलेल्या ‘जमात-उल-मोमिनात’ या संघटनेची कार्यकर्ती होती. ही महिलांची संघटना ‘जैश-ए-महंमद’ या बंदी असलेल्या जिहादी संघटनेने ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारतात आतंकवादी कृत्ये करण्यासाठी महिलांची भरती करणारी संघटना बनवली होती. ‘जैश-ए-महंमद’चा प्रमुख मसूद अझहर याने त्याची बहीण सादिया अझहर हिला या संघटनेची प्रमुख म्हणून ऑक्टोबरमध्ये घोषित केले होते. सादिया ही यूसुफ अजहर जो ७ मे या दिवशी मर्काझ सुभानअल्ला बहवालपूर, पाकिस्तान येथे भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारला गेला होता, त्याची बायको आहे.
डॉ. शाहीनच्या अटकेतून हे स्पष्ट होते की, जैश-ए-महंमद ही संघटना ‘इसिस’प्रमाणे महिलांचा उपयोग आक्रमणे करण्यासाठी आणि आत्मघातकी कारवायांसाठी करत आहे. मूलतत्त्ववादी मौलवी हे शिक्षणसंस्थांमध्ये, मदरशांमध्ये तरुण मुलामुलींना मोठ्या प्रमाणात स्वतःच्या जाळ्यात ओढतांना दिसतात. जैश-ए-महंमद या संघटनेस पाकिस्तान सरकार आणि सैन्य यांचा उघडपणे पाठिंबा आहे अन् भारताविरुद्ध कारवायांना ते सतत साहाय्य करत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये उद्ध्वस्त केलेली आतंकवादी संघटनांची ठिकाणे पाकिस्तान सरकार पुन्हा बांधून देण्यास साहाय्य करत आहे.
३. पुष्कळ आधुनिक शिक्षण घेतलेले, धनाढ्य मुसलमान तरुण-तरुणी; पण तितकेच कडवे आतंकवादी !
आतापर्यंत उपलब्ध माहितीवरून दिसते की, मोठ्या प्रमाणात वैद्यकीय, तसेच संगणकीय, उच्च शिक्षण घेतलेल्या मुलामुलींना वापरून त्यांच्या माध्यमातून नवीन तरुण-तरुणींना आतंकवादी त्यांच्या जाळ्यात ओढत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातूनही अशाच प्रकारे काम करणारे डॉक्टर आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र यांमध्ये काम करणार्या व्यक्तींना अटक केली होती. ‘अल् कायदा’चा म्होरक्या ओसामा बिन लादेन हाही पुष्कळ शिकलेला अन् धनाढ्य होता; पण तितकाच अत्यंत कडवा आतंकवादी होता.
आतंकवादी संघटना या मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर करून तरुणांची डोकी भडकवत असतात. त्यांना खोटे व्हिडिओ दाखवले जातात आणि त्यांना आतंकवादी कृत्ये करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. या व्यक्ती आधुनिक शिक्षण घेतलेल्या, सर्व नवीन तंत्रज्ञानात कुशल, ‘सॅटेलाईट फोन’ (उपग्रहांच्या आधारे चालणारे भ्रमणभाष)ने सुसज्ज, भरपूर पैसे असणार्या; परंतु धार्मिक कडव्या अशा आहेत.
४. विदेशी सामाजिक माध्यमांच्या वापरातून गुप्त माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांना न मिळणे
नुकत्याच अटक झालेल्या व्यक्तींच्या जबाबातून स्पष्ट होते की, हैद्राबाद (भाग्यनगर) येथे रहाणार्या व्यक्ती शस्त्रे मिळवण्यासाठी गुजरातच्या सीमावर्ती भागात आदलाद येथे गेले असतांना पाकिस्तानमधून ड्रोनच्या साहाय्याने शस्त्रे पाठवली होती, ती घ्यायला ते गेलेले होते. ‘पूर्ण गुप्तता राखली जाईल’, या तत्त्वावर अमेरिकेतून चालवल्या जाणार्या ‘व्हॉटस्ॲप’सारखे सामाजिक माध्यमांचा आतंकवादी संघटना पुरेपूर अपलाभ घेत आहेत आणि सार्वभौम असलेल्या इतर देशातील सुरक्षायंत्रणांना त्यावर काहीही कारवाई करणे वा माहिती मिळवणे, हे जवळजवळ अशक्य आहे. इंग्लंड, युरोप आणि अन्य देशांनी या सामाजिक माध्यमांकडून मागितलेली माहिती सुरक्षेच्या कारणासाठी देण्यास अमेरिकेच्या प्रशासनाने पूर्णपणे नकार दिला आहे. इंटरनेटचा वापर करून प्रचंड प्रमाणात ‘बिटकॉईन्स’ (आभासी चलना)च्या माध्यमातून आज कोट्यवधी रुपये भारतातील तरुण त्यात व्यय करत आहेत. त्याचा वापर करून ड्रग्ज, तसेच शस्त्रास्त्रे यांचा व्यापार होत आहे. अनेक गुन्ह्यांच्या अन्वेषणात आतंकवादी ड्रग्जचा व्यापार करून शस्त्रे खरेदी करून आतंकवादी कृत्ये करतात, हे स्पष्ट झाले आहे.
याउलट भारतीय व्यक्तींनीच बनवलेली ‘झोहो मेल’, ‘आरात्ताई’ यांचा वापर अद्याप नगण्य आहे. त्यामुळे एकतर भारतातील सर्व ‘डेटा’ (माहिती) हा अमेरिकेसारख्या परकीय देशाला सहज उपलब्ध होत आहे आणि त्यातून मिळणारी माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांना उपलब्ध होत नाही अन् त्यामुळे आतंकवाद्यांचे आंतरराष्ट्रीय जाळे भक्कम होत आहे. याउलट चीनने प्रारंभीपासूनच या अमेरिकेतील संस्थांवर बंदी घालून स्वतःची सामाजिक माध्यमे सिद्ध केलेली आहेत.
५. वाहन पडताळणी; रासायनिक द्रव्ये, टायमर्स, मेटल शीट्स यांची विक्री, भाडेकरूंची माहिती देणे बंधनकारक करण्याची आवश्यकता !
कोणतेही घर भाड्याने द्यायचे असल्यास त्यासंबंधीची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असूनही फार क्वचित् ती पुरवली जाते आणि माहिती न देणार्यांनाही न्यायालयातून कठोर शिक्षा झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे पैशाच्या लोभाने आतंकवादी मनात येईल त्या ठिकाणी भाडेकरू म्हणून रहातात आणि स्वतःचे उद्दिष्ट साध्य करतात, हे वारंवार अनेक घटनांनी दाखवले आहे. लोकांना दाखवण्यासाठी समाजात प्रतिष्ठा असेल, अशा पदाचा वापर करून ते स्वतःच्या आतंकवादी कारवाया करतांना दिसतात. फरीदाबाद येथे सापडलेली २९०० किलो स्फोटके हे आतंकवादी अनेक महिन्यांपासून साठवत होते. स्फोटकांसाठी आवश्यक अशी रासायनिक द्रव्ये, टायमर्स, मेटलशीट्स विकणार्या सर्व विक्रेत्यांवरही या गोष्टी कुणाला विकल्या, ही माहिती पोलिसांना देणे बंधनकारक करण्याची आवश्यकता आहे. या सर्व स्फोटकांची वाहतूक ही लक्षात येणार नाही, अशा प्रकारे विविध वाहनांमधून होतांना दिसते. त्यासाठी ठिकठिकाणी वाहनांची पडताळणी करणे आवश्यक आहे. वाहने खरेदी करतांना खोटे पत्ते दिले जातात आणि ते सहज मान्य केले जातात, हे चिंतेचे आहे.
६. नागरिकांनीच आता ‘पोलीस मित्र’ होणे महत्त्वाचे !
आतंकवादी कृत्ये करणार्यांची माहिती केवळ तंत्रज्ञानाचा वापर करून मिळेल, हे समजणे पुरेसे नाही. या लेखात म्हटल्याप्रमाणे ही माहिती मिळण्यावर अनेक बंधने आहेत आणि सर्व आतंकवादी ही माहिती विविध खोटी नावे किंवा ‘कोड’ वापरून पाठवत असतात. त्यामुळे त्यांची खरी ओळख फारच क्वचित् होऊ शकते. त्यामुळे व्यक्तींच्या साहाय्याने गोळा केलेली गुप्त माहिती (ह्युमन इंटेलिजन्स) हीसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. ‘आतंकवादाविरुद्ध लढा’ हे सर्व स्तरांनी एकत्र येऊन लढणे अत्यंत आवश्यक आहे. भारतातील लोकशाहीवर विश्वास असलेल्या अशा मुसलमान समाजातील लोकांनाच त्यासाठी प्रोत्साहन देऊन या कृत्यांचा त्यांनीही निषेध करणे आवश्यक आहे.
त्यांच्या आजूबाजूला कडवे विचार पसरवणारे कोण आहेत ?, गैरकृत्ये करणारे कोण आहेत ? याची माहिती मुसलमानांसह नागरिकांनी सुरक्षायंत्रणांपर्यंत पोचवणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कडव्या विचारांना प्रत्युत्तर देण्याचे कामही या मुसलमान संघटनांनी करणे आवश्यक आहे. त्यासह सर्वसामान्य लोकांनाही ‘पोलीस मित्र’ म्हणून सामावून घेऊन त्यांना चौकस रहाणे, संशयित व्यक्तींची माहिती सुरक्षायंत्रणांना पुरवणे, याचे प्रशिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
७. … असे समजणे, म्हणजे स्वतःची फसवणूक करणे !
आर्थिक विकास झाला किंवा वैद्यकीय, तांत्रिक प्रगत शिक्षण मिळाले, म्हणजे लोक धार्मिक कडव्या विचारांपासून दूर जातील, असे समजणे, म्हणजे स्वतःची फसवणूक करणे आहे. अमेिरकेतील ९/११ (११ सप्टेंबर २००१) पासून देहलीतील १०/११ (१० नोव्हेंबर २०२५) पर्यंत घडलेल्या आतंकवादी घटनांमधून लवकरात लवकर हा बोध घेणे आवश्यक आहे.
– श्री. प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक, मुंबई.
| संपादकीय भूमिका : सरकार आणि पोलीस यांनी सर्वसामान्यांना ‘पोलीस मित्र’ म्हणून चौकस रहाणे, संशयितांची माहिती सुरक्षायंत्रणांना पुरवणे, यांचे प्रशिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे ! |


शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !