प्रत्येक शनिवारी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वाचा ‘वास्तूशास्त्रा’ची माहिती देणारी लेखमाला !
वास्तूशास्त्र – लेख क्रमांक १
वास्तूशास्त्र हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. भगवान विश्वकर्मा यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये प्रथम गृह म्हणजे घराविषयी सांगितले आहे.
आब्रह्मभुवनाल्लोका गृहस्थाश्रममाश्रिताः।
यतस्तस्मात् गृहारम्भप्रवेशसमयं ह्यहम्॥ – विश्वकर्मप्रकाश, अध्याय १, श्लोक २
अर्थ : या ब्रह्मलोकात जेवढे जीव आहेत, ते सगळे गृहस्थाश्रमाच्या आधारे आपले जीवन जगतात. त्यामुळे त्या गृहात रहाणार्यांसाठी गृहनिर्माणाविषयी आणि त्याच्या प्रवेशाविषयी मी सांगतो.

१. वास्तूची शुभाशुभता मनुष्याच्या जीवनावर दूरगामी परिणाम करत असणे
या विश्वामध्ये प्रत्येक जीव गृहाचा आश्रय घेऊन रहात असतो. अगदी पशू-पक्ष्यांपासून मानवापर्यंत सर्वच घराचा आश्रय घेऊन जीवन व्यतीत करतात; म्हणून आपल्या जीवनामध्ये गृहाचा, म्हणजेच वास्तूचा मोठा सहभाग असतो. त्याची शुभाशुभता ही मनुष्याच्या जीवनावर दूरगामी परिणाम करत असते; म्हणून आपल्या शास्त्रामध्ये याचा सखोल अभ्यास केलेला आहे. सध्या समाजामध्ये याविषयी बरेच समज-अपसमज पसरलेले आढळतात. सामाजिक माध्यमांतून वास्तूशास्त्राविषयी सांगितले जाते. त्यामुळे मूळ ग्रंथांमध्ये नेमके काय सांगितलेले आहे, याविषयी बर्याच जणांच्या मनात जिज्ञासा असते.

२. ‘वास्तू वास्तूशास्त्राच्या कसोटीवर उतरते का ?’, याचा अभ्यास करावा !
सध्या बरेच बांधकाम व्यावसायिक ‘आमच्या सदनिका वास्तूशास्त्राप्रमाणे निर्माण केलेल्या आहेत’, असा सर्रास प्रसार करतांना दिसतात; पण खरोखरच ती वास्तू वास्तूशास्त्राच्या कसोटीवर उतरते का ?, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. म्हणून वास्तूशास्त्राविषयी सर्वांना प्राथमिक माहिती मिळावी, या उद्देशाने या लेखांच्या माध्यमातून माहिती मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
३. शास्त्रकार काय सांगतात ?
प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) टेंब्येस्वामी यांनी सांगितले आहे,
शास्त्र बुद्धी शुद्ध करी । युक्तीने भ्रम निवारी ॥
अर्थ : शास्त्राच्या अभ्यासाने बुद्धीची शुद्धी होऊन भ्रम दूर होतो. यासाठी आपल्या शास्त्रांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.
वराहमिहीर यांनी ‘बृहत्संहिता’ ग्रंथामध्ये म्हटले आहे,
‘वास्तुशास्त्रम् प्रवक्ष्यामि लोकानां हितकाम्यया ॥’ – बृहत्संहिता
अर्थ : वास्तूशास्त्र हे मी लोकांच्या हितासाठी सांगत आहे.
वराहमिहीर यांनी सांगितलेल्या उद्देशाप्रमाणेच ‘या लेखांच्या माध्यमातून पूर्वी आपल्या शास्त्रकारांनी उपलब्ध करून दिलेल्या अमूल्य ज्ञानाचा सर्वांना लाभ व्हावा आणि सर्वांचे जीवन व्यावहारिक अन् आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध व्हावे, अशी भगवान नारायणाच्या चरणी प्रार्थना करतो.’
४. परमेश्वराच्या कमलचरणांना नमस्कार !
उत्पत्तित्त रक्षणलयान् जगतां प्रकुर्वन् भूवारिवन्हिमरुतोगगनं च सूते ।
नानासुरेश्वरकिरीटविलोलमालाभृंगावलीढचराणाम्बुरुहं नमामि ॥ – मानसार, श्लोक १
अर्थ : या विश्वाची निर्मिती, पोषण आणि संहार करत पृथ्वी, जल, तेज, वायु, आकाश या पंचमहाभूतांची निर्मिती करणार्या अन् अगणित देवतांच्या मस्तकावरील मुकुटावर हलणार्या मालांवर असणारे भुंगे ज्या चरणरूपी कमळावर चिकटलेले आहेत, त्या परमेश्वराच्या कमलचरणांना मी नमस्कार करतो.
५. वास्तू म्हणजे काय ? आणि तिची व्याप्ती
अ. वसन्ति प्राणिनो यत्र तद् वास्तु ।
अर्थ : ज्या ठिकाणी प्राणी निवास करतात, त्याला वास्तू म्हणतात.
आ. अमर्त्याश्चैव मर्त्याश्च यत्र यत्र वसन्ति हि । – मयमतम्, अध्याय २, श्लोक १
अर्थ : मर्त्य आणि अमर असे लोक ज्या ठिकाणी वास करतात, त्याला ‘वास्तू’ असे म्हणतात. मयाने सर्व मर्त्य प्राण्यांसमवेत अमर्त्य अशा देवादिकांचाही यामध्ये विचार केलेला आहे.
इ. भूरेव मुख्यं वास्तु तत्र जातानि यानिहि ।
प्रासादादीनि वस्तूनि वस्तुत्वात् वास्तुसंश्रयात् ॥ – समराङणसूत्रधार
अर्थ : भूमी (पृथ्वी) हीच खरी वास्तू आहे, पृथ्वीवर उत्पन्न होणार्या जिवांच्या आश्रयासाठी जे प्रासाद वगैरे निर्माण केले जातात, त्यांनासुद्धा ‘वास्तू’ असेच म्हणतात.
वरील व्याख्यांचा अभ्यास केल्यावर आपल्याला लक्षात येते की, भूमीवर आश्रयासाठी उभारलेल्या प्रासादादी रचनेसह निवासासाठी निवडलेल्या आणि चारही बाजूंनी बंदिस्त केलेल्या मोकळ्या भूमीलासुद्धा ‘वास्तू’ म्हणतात. यासाठीच भूमीच्या शुभाशुभतेचा अभ्यास आणि भूमी परीक्षण यांवर वास्तूशास्त्रकारांनी अधिक भर दिलेला दिसतो. रहाण्यासाठी निवडलेली भूमी जिला चारही बाजूंनी बंदिस्त केले आहे, तीसुद्धा वास्तूच आहे. यालाच आपल्या शास्त्रामध्ये ‘दिग्बंधन’ असे म्हटले आहे. प्रासाद, भवन, धाम, गृह, सदन, विमान, अगार, वेश्म, स्थान, पद, हर्म्य, निलय, आस्पद, वास, आलय, दम, क्षेत्र, उद्वासित, गेह, सौध, आयतन, मंदिर, पुरी, कुटी असे अनेक शब्द ‘वास्तू’ या शब्दाचे प्रतिनिधित्व करतात.
मग आपण जेथे रहातो, त्या घराला वास्तू म्हणणे योग्य आहे कि नाही ? तर तीसुद्धा वास्तूच आहे; पण आपण शास्त्रीयदृष्ट्या त्याला ‘भवन’ असे म्हणतो.
६. वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचा समतोल !
वास्तूशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. त्यामुळे वास्तूशास्त्राचे मूळ नियम वापरतांना सामाजिक परिस्थिती, परंपरा आदींचा विचार करावा लागतो. स्वतःचे जीवन सुखी व्हावे, यासाठी आपण प्रयत्नरत असतो; पण बर्याच वेळा प्रारब्ध, संचित यांमुळे लाभामध्ये आपल्याला न्यूनता दिसून येते. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला त्याची कल्पना आल्यास वास्तूशास्त्रानुसार त्यामध्ये काही प्रमाणात सुधारणा करता येते.
७. वास्तूशास्त्राची उपयुक्तता !
अ. वास्तूशास्त्राचे नियम पूर्वी ऋषिमुनींनी त्यांचे सामर्थ्य, अभ्यास आणि दीर्घ अनुभव यांतून सिद्ध केले आहेत. त्यामुळे त्या नियमांना वास्तूनिर्मितीच्या वेळी लागू करून आपण त्यांचा लाभ घेऊ शकतो.
आ. वास्तूशास्त्राचे नियम हे पंचमहाभूते, दिशा, वैश्विक ऊर्जा, चुंबकीय ऊर्जा, भूगर्भीय ऊर्जा, विद्युत ऊर्जा यांचा अभ्यास करून सिद्ध केले आहेत; कारण या सर्व ऊर्जांचा परिणाम वास्तूमध्ये रहाणार्या व्यक्तींच्या आरोग्यावर होत असतो.
इ. वास्तूशास्त्राचे नियम संपूर्ण विश्वामध्ये एकाच पद्धतीने लागू होतात; म्हणून त्यांचा लाभसुद्धा वैश्विक स्तरावर मिळत असतो. जे नियम भारतामध्ये लागू होतात, तेच नियम पृथ्वीवरील कोणत्याही भागात लागू आहेत; कारण पंचमहाभूते आणि ऊर्जा संपूर्ण विश्वात एकाच पद्धतीने काम करतात.
ई. ज्याप्रमाणे पृथ्वीभोवतीच्या ओझोनच्या आवरणामुळे सूर्याचे त्रासदायक किरण अडवले जाऊन लाभदायक किरणांचा जीवसृष्टीच्या विकासासाठी लाभ होतो, त्याप्रमाणे वास्तूशास्त्रानुसार सर्व ऊर्जांचे योग्य संतुलन करून निर्माण केलेली वास्तू ही त्या वास्तूत रहाणार्यांचे रक्षण करते आणि त्यांच्या प्रगतीला लाभदायक ठरते.
उ. वराहमिहीर यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये सांगितले आहे,
वास्तुशास्त्रम् प्रवक्ष्यामि लोकांना हितकाम्यया ।
आरोग्यं पुत्रलाभं च धनं धान्यं लभेन्नर: ॥ – बृहत्संहिता
अर्थ : वास्तूशास्त्र हे मी लोकांच्या हितासाठी सांगतो. याद्वारे आरोग्य, संतती, धन-धान्य इत्यादींचा मनुष्याला लाभ होईल.
याप्रमाणे अभ्यास करून वास्तूनिर्मिती केल्यावर मनुष्याची सर्वांगीण प्रगती साध्य होते. आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास वास्तूतील असंतुलित ऊर्जेचा नकारात्मक परिणाम मनुष्याच्या शरिरावर होतो. त्यामुळे त्याचे योग्य संतुलन करण्याविषयी अभ्यास वास्तूशास्त्रामध्ये आलेला आहे.
ऊ. वास्तूशास्त्रानुसार केलेले उपाय हे अल्प काळात लाभदायी असतात. त्यांचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.
ए. वास्तूशास्त्रामध्ये श्रीमंत आणि गरीब असा भेद नाही. जो नियम १००० चौरस मीटर जागेसाठी लागू होतो, तोच नियम १०० चौरस मीटरसाठीही लागू होतो. त्यामुळे जागा मोठी असो किंवा छोटी, त्यामध्येसुद्धा आपण शास्त्राचे नियम लागू करून निर्मिती करू शकतो. वास्तूशास्त्रामध्ये प्रत्येकाकडे उपलब्ध असलेला वेळ, पैसा आणि श्रम यांनुसार आपण वास्तूचे उपाय करू शकतो.
ऐ. वास्तूशास्त्राच्या ज्ञानाचा उगम हा जरी हिंदु धर्मामध्ये असला, तरी ते शास्त्र सर्व जाती-धर्माच्या लोकांना लाभदायक आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी कुटुंब आहे.) या उक्तीची प्रचीती आपल्याला वास्तूशास्त्राच्या माध्यमातून घेता येते.
ओ. वास्तूशास्त्राप्रमाणे आपण घरामध्ये पालट केल्यास घरातील मानसिक संघर्ष, वादविवाद, भांडणे इत्यादी न्यून होऊन घरातील सर्वांचे मानसिक आरोग्य सुधारण्यास साहाय्य होते; कारण बर्याच वेळा मानसिक विकार किंवा संघर्षाचे कारण हे दूषित वास्तू असते.
औ. कारखाने, दुकाने, कार्यालये इत्यादी व्यावसायिक वास्तूंमध्ये आपण ऊर्जेप्रमाणे योग्य ते पालट करून अधिक लाभ मिळवू शकतो. रुग्णालय आदींची रचना योग्य करून आपण रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचा लाभ घेऊ शकतो.
अं. वास्तूशास्त्रामध्ये घराच्या परिसरात कोणत्या दिशेला कोणते वृक्ष लावावेत, याविषयी माहिती असल्याने त्याद्वारे आपण पर्यावरणाचा समतोल राखू शकतो.
क. ज्याप्रमाणे आपण वास्तूशास्त्राचे नियम वापरून वास्तूची निर्मिती करतो, तेच नियम व्यापक स्वरूपातही लागू असल्याने आपण एखाद्या नगराची किंवा राज्याची रचना करतांना वास्तूशास्त्राप्रमाणे विचार केल्यास त्या नगरात किंवा राज्यात रहाणार्या व्यक्तींना व्यापक स्तरावर लाभ होऊ शकतो.
ख. आध्यात्मिक स्तरावर विचार केल्यास आणि वास्तूतील ऊर्जेचे योग्य संतुलन केल्यास आणि वास्तूच्या कोणत्या पदामध्ये बसून उपासना करावी; कोणत्या पदामध्ये सत्संग, नियोजन, बैठका आदी घ्याव्यात इत्यादी सूत्रांचा अभ्यास करून रचना केल्यास त्या त्या पदांच्या ऊर्जेचा आपल्याला लाभ मिळून आपण जलद गतीने प्रगती साध्य करू शकतो आणि असंतुलित वास्तूमुळे संघर्षात व्यय होणारी आपल्या साधनेची ऊर्जा वाचवू शकतो.
(लेखात वापरलेले संदर्भ ग्रंथ : विश्वकर्मप्रकाश, मयमतम्, वाल्मीकि रामायण, समराङगणसूत्रधार, अपराजितपृच्छा, मानसार, महाभारत)
– श्री. श्रेयस पिसोळकर, वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न, फोंडा, गोवा. (१५.१०.२०२५)
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/976969.html
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !