मधुमेहावर नियंत्रण ठेवणे काहींना अत्यंत कठीण जाते. ‘ॲलोपॅथी’ औषधांचा मारा, सातत्याने घ्यावे लागणारे ‘इन्सुलिन’, त्यामुळे पालटलेले भुकेचे गणित यांमुळे रुग्ण त्रासलेले असतात. मधुमेहाची कारणे अन् त्यासाठी काही पथ्ये समजून घेतली, तर नक्कीच मधुमेहाचा सामना सहजतेने करता येऊ शकतो.

१. मधुमेह होण्याची प्रमुख कारणे
चांगल्या आरोग्याचा सर्वांत महत्त्वाचा मंत्र आहे, ‘जेवण वेळच्या वेळी करणे आणि रात्री वेळेत झोपणे.’ सध्या नोकरी, घरातील सदस्यांचे वेगवेगळे वेळापत्रक, अशा अनेक कारणांमुळे जेवण आणि झोपणे या ज्या शरिराच्या मूलभूत गरजा आहेत, त्यांचे वेळापत्रक पाळणे सहजसाध्य होत नाही. या वेळा सतत मागे-पुढे झाल्याने होणार्या दूरगामी दुष्परिणामांची जाणीव नसल्यानेही असे होते. वर्षानुवर्षे जेवण वेळेवर न करणे आणि रात्री उशिरापर्यंत जागणे, या सवयींमुळे मधुमेहासारखे रोग होतात.

२. अनियंत्रित आहार
सध्या असे झाले आहे की, आपण खाण्यासाठी जगतो आहोत कि जगण्यासाठी खात आहोत ?, हेच आपल्याला कळत नाही. आपण केवळ जगण्यासाठी आवश्यक तेवढेच योग्य वेळेत भूक भागेल एवढेच खाल्ले, तर स्वतःचे शरीर निरोगी रहायला साहाय्य होते. दिवसातून दोन वेळेलाच जेवण करणे, हे चांगल्या जीवनशैलीसाठी आवश्यक आहे. सकाळचा भरपेट नाश्ता, त्यानंतर दुपारचे जेवण, संध्याकाळी स्नॅक्स आणि रात्री ८-९ वाजल्यानंतर पुन्हा पोटभर जेवण अशा प्रकारच्या आहाराची शहरी अन् बैठी जीवनशैली असलेल्यांना आवश्यकता नसते. स्वतःचा आहार भूक भागेल एवढाच असावा. सकाळी ११ ते १२ आणि सायंकाळी ५.३० ते ७ या जेवणाच्या योग्य वेळा आहेत. अशा वेळांमध्ये २ वेळाच स्वतःचा आहार ग्रहण केला की, पचनशक्ती चांगली रहाते.
‘पांढरी साखर, तांदूळ यांचा आहारातील वापर न्यून केला, तर मधुमेह लवकर आटोक्यात येतो’, हे मी माझ्या रुग्णांच्या अनुभवातून सांगू शकतो. हे पथ्य पाळल्याने ज्यांना मधुमेह नाही, त्यांना भविष्यात मधुमेह होण्याचा धोकाही अल्प होतो.
३. रात्री उशिरा झोपण्याऐवजी लवकर झोपणे
सध्या नोकरी आणि इतर अनेक कारणांमुळे रात्री १२-१२.३० ही झोपण्याची सामान्य वेळ झाली आहे. दिवसभराच्या श्रमाने थकलेले स्वतःचे शरीर रात्री १० ते ३ या कालावधीत एकप्रकारे ‘रिसेट’ (पूर्ववत्) होते. त्यामुळे या वेळेत घेतलेली झोप ही खरी झोप असते. त्यानंतर आपण कितीही घंटे झोपलो, तरी त्याने शरिराचा थकवा भरून निघत नाही. त्यानेही अनेक दीर्घकालीन आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे ज्यांना चांगले आरोग्य हवे आहे, त्यांनी रात्री १० पर्यंत झोपून किमान ७ घंटे झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
४. व्यायामाचा अभाव
नियमित सकाळी उठून व्यायाम, योगासने आणि प्राणायाम करणे, हे सर्वांसाठीच आवश्यक आहे. नियमित किमान ४० मिनिटे चालणे, पोटाचे व्यायाम करणे आणि सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे पोट साफ होण्याकडे लक्ष दिले, तर मधुमेहापासून दूर रहाणे शक्य आहे.
ज्यांना मधुमेह झाला आहे, त्यांनी या त्रिसूत्रींचे पालन केले, तर त्यांचा मधुमेह नैसर्गिकरित्या नियंत्रणात येईल, तसेच ॲलोपॅथी औषधांच्या मार्यापासून स्वतःचा बचाव करणे शक्य होईल. ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब यांच्यासारखे ‘लाईफस्टाईल डिसऑर्डर्स’ (जीवनशैलीतील विकार) होऊ नयेत, असे वाटते, अशा युवकांनीही आतापासूनच त्यांची जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न अवश्य करावा.
निसर्गोपचारात लोहचुंबकाचे उपाय, बिंदूदाबन म्हणजेच ‘ॲक्युप्रेशर’, ‘ॲक्युपंक्चर’, पोटावर मातीच्या पट्ट्या ठेवणे असे वेगवेगळे निसर्गोपचार केल्याने मधुमेह नियंत्रणात रहाण्यास साहाय्य होते.
– डॉ. दीपक जोशी, निसर्गोपचार तज्ञ (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स), देवद, पनवेल. (८.११.२०२५)
आनंदी जीवनासाठी ‘जेवण, प्राणायाम आणि नामस्मरण’ हीच त्रिसूत्री ! – वैद्य सुविनय दामले
आक्रमणाचा परिणाम भारत-अमेरिका संबंधांवरही होऊ शकतो !
गुडघेदुखी आणि जळू !
जेवढे रुपये कमवण्यासाठी आर्यभट्ट यांचा अवमान केला, तेवढे भारत सरकारने दंड म्हणून वसूल करावेत !
आज सोमवती अमावास्या !
प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’विषयी देवस्थानांच्या शासनाकडून अपेक्षा !