जैन बोर्डिंग विक्री व्यवहार रहित करा, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपोषण करू !

आचार्य गुप्तिनंदी महाराजांची चेतावणी !

जैन बोर्डिंग जागा

पुणे – जैन बोर्डिंगच्या जागा विक्रीसाठी झालेला व्यवहार रहित करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक आणि विश्वस्त या दोघांनीही न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला आहे. ‘या याचिकेवर २ दिवसांत निर्णय घेऊन आम्हाला अंतिम ‘लीगल डीड’ची (कायदेशीर करारनामा) कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर उपोषण करण्यात येईल’, अशी चेतावणी आचार्य गुप्तिनंदी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१. मॉडेल कॉलनीतील एका भूमीवर जैन विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग आणि भगवान महावीर मंदिर आहे. पुण्यातील ‘गोखले लँडमार्क्स एल्.एल्.पी.’ने ‘शेठ हिराचंद नेमचंद मेमोरियल ट्रस्ट’कडून ३११ कोटी रुपयांना ती भूमी विकत घेतली होती. एकूण रकमेपैकी २३० कोटी रुपये ट्रस्टला देण्यात आले होते.

२. या कराराला विद्यार्थी, माजी विद्यार्थी, साधू आणि जैन समुदाय यांच्याकडून तीव्र विरोध झाला. जैन समुदायाच्या विरोधानंतर ‘गोखले लँडमार्क्स एल्.एल्.पी.’ आणि ‘शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर स्मारक ट्रस्ट’ यांनी विक्री करार रहित करण्याची इच्छा व्यक्त केली होती.