रस्त्यांवरील खड्ड्यांविषयीच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना

सिंधुदुर्गनगरी – जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत हद्दीबाहेरील ग्रामीण भागातील क्षेत्रात रस्त्यांवरील खड्ड्यांविषयी प्राप्त होणार्‍या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीद्वारे खड्ड्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेवर १३ ऑक्टोबर २०२५ या दिवशी सुनावणी झाली. या वेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे रस्त्यावरील खड्डे आणि मानवनिर्मित उघडे गटार यांमुळे मृत्यू झाल्यास वारसांना ६ लाख, तर गंभीर दुखापत झाल्यास ५० सहस्र ते २ लाख ५० सहस्र रुपये इतकी हानीभरपाई संबंधित प्राधिकरणाकडून देण्यात येणार आहे. भरपाई देण्याचे दायित्व संबंधित स्थानिक संस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग, एम्एम्आर्डीए (मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलॉपमेंट ॲथॉरिटी – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) किंवा संबंधित प्राधिकरण यांच्यावर रहाणार आहे. ही रक्कम नंतर रस्त्यांच्या देखभालीतील त्रुटींसाठी उत्तरदायी ठरलेला कंत्राटदार किंवा अधिकारी यांच्याकडून वसूल करण्यात येईल.

भरपाईची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हानीभरपाई ठरवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये संबंधित नगरपरिषदेचे /नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि सचिव; जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नगरपंचायत हद्दीबाहेरील ग्रामीण भागातील क्षेत्रात रत्यांवरील खड्ड्यांविषयी प्राप्त होणार्‍या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी समितीमध्ये संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांचा समावेश आहे.

खड्ड्यांमुळे अपघात किंवा मृत्यू झाल्यास संबंधित पोलीस ठाण्याने ४८ घंट्यांच्या आत समितीला कळवणे आवश्यक आहे, भरपाई देण्यास विलंब झाल्यास संबंधित जिल्हाधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी किंवा विभाग प्रमुख अधिकारी यांना उत्तरदायी धरले जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले आहे.

खड्ड्यांमुळे आणि मानवनिर्मित उघडे गटार यांमुळे मृत्यू झाल्यास हानीभरपाईकरता अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग या कार्यालयाचा ई-मेल आयडी-[email protected], दू. क्र. ०२३६२-२२८४१४, भ्रमणभाष क्र. ८५९१९०३६०७ आणि टोल फ्री क्रमांक १५१०० यावर संपर्क साधावा.