INDIA HOUSE London : क्रांतीकारकांचे वास्तव्य असलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन कह्यात घेणार !

मुंबई – शिक्षणाच्या निमित्ताने लंडन येथे जाऊन क्रांतीकार्यात सहभागी होणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनलाल धिंग्रा यांच्यासारख्या अनेक क्रांतीकारकांचे वास्तव्य असलेले तेथील ‘इंडिया हाऊस’ कह्यात घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र शासन ‘इंडिया हाऊस’ हे स्मारक म्हणून जतन करणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली.

१२ नोव्हेंबर या दिवशी मंत्रालयामध्ये आमदार देवयानी फरांदे, सामान्य प्रशासन विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्व विभाग यांच्या अधिकार्‍यांसमवेत आशिष शेलार यांनी याविषयी बैठक घेतली. या बैठकीत ‘मित्रा’ या शासकीय संस्थेच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून ‘इंडिया हाऊस’ कह्यात घेण्याविषयीचा अहवाल सिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नागपूर येथील रघूजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन दौर्‍यावर असतांना आशिष शेलार यांनी ‘इंडिया हाऊस’ला भेट दिली होती. त्या वेळी लंडन येथील काही भारतियांनी ‘इंडिया हाऊस’ खरेदी करण्याचे सूत्र त्यांच्या लक्षात आणून दिले होते. नाशिक येथील आमदार देवयानी फरांदे यांनीही ‘इंडिया हाऊस’ कह्यात घेण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली होती.