संपादकीय : …केवळ ‘सिंदूर’ अपुरे !

डॉ. मुजम्मिल शकील, डॉ. अहमद राठर आणि डॉ. अहमद सय्यद

अनंतनागमधील ‘एके ४७’सह अटक केलेला डॉ. अहमद राठर आणि डॉ. अदिल यांसह अन्य जम्मू-काश्मीरमधील ५ जण; चीनमध्ये शिक्षण घेतलेला मूळचा भाग्यनगरचा कर्णावतीमधील डॉ. अहमद सय्यद, फरीदाबादमधील डॉ. शाहीन शाहिद अन् ३६० किलो बाँब बनवण्यात वापरले जाणारे अमोनियम नायट्रेट असणारा डॉ. मुजम्मिल यांची एकामागोमाग होणारी अटक आणि या पार्श्वभूमीवर १० नोव्हेंबरला देशाची राजधानी देहली येथील लाल किल्ल्यासमोर झालेला रासायनिक बाँबस्फोट यांची जुळवणी साहजिक झाली. फरीदाबादमधून तब्बल २ सहस्र ९०० किलो अमोनियम नायट्रेट आणि २ सहस्र ५६३ किलो स्फोटके अन् कर्णावतीमधूनही स्फोटक साहित्य जप्त होणे आणि अंतिमतः या सर्वांचा जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेशी संबंध निघणे, हा सर्व ‘ऑपरेशन सिंदूर’चा सूड आहे, हे ओघाने समोर येत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने जैश-ए-महंमदला लक्ष्य केले होते.

काही ठळक गोष्टी

डॉ. मुजम्मिल याच्या घरातील शस्त्रसाठ्यात चिनी पिस्तुले मिळाली आहेत. आतंकवाद्यांना चीनसह अन्य देशांचे साहाय्य आहे, याचा हा आणखी एक पुरावा आहे. ते ‘एन्क्रिप्टेड चॅनल’द्वारे (केवळ प्राप्तकर्त्यालाच माहिती कळण्याचे माध्यम) संवाद साधत होते. अहमद सय्यद हा एरंडाच्या बियांपासून ‘रासिन’ नावाचे अत्यंत विषारी विष निर्माण करत होता. हे सर्व आधुनिक वैद्य समाजसेवेच्या नावाखाली काम करत होते. शस्त्रपुरवठा, निधी पुरवठा आणि जिहादी विचारसरणी पसरवणे या सर्वच गोष्टी हे पांढरपेशे आधुनिक वैद्य करत होते. ‘बेरोजगारी तरुणांना आतंकवादाकडे वळवते’, असे म्हणणार्‍या निधर्म्यांना ही सणसणीत थोबाडीत मारल्यासारखी गोष्ट आहे. ‘आपल्या आजूबाजूला असणारी धर्मांध व्यक्ती घुसखोर आहे का ? तिचे वागणे संशयास्पद आहे का ? याविषयी सतत जागरूक राहून पहाणे किंबहुना त्यांच्याकडे संशयाने पहाणे, हे आवश्यक का आहे ?’, हे आतंकवादी संघटनेच्या ‘स्लिपर सेल’चे (स्थानिक साहाय्यकांचे) प्रचंड जाळे पाहिले की, लक्षात येते. भारतीय नागरिकांनीही अत्यंत सतर्क राहून सुरक्षायंत्रणांना साहाय्य करणे आवश्यक आहे; त्याविना भारतमातेच्या शरीरभर पसरलेले हे ‘स्लिपर सेल’चे विष संपवणे कठीण आहे. सुदर्शन वाहिनीने ‘या स्फोटाच्या अंतरापासून जवळच असलेले गौरी-शंकर मंदिर कसे सुरक्षित राहिले ?’, याविषयी पोस्ट प्रसारित केल्यावर अनेक देशविरोधी शक्तींनी त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या विषारी पिलावळीला सुधारणे, हेही देशांतर्गत नागरिकरूपी सैन्याला करावे लागणार आहे.

आपत्काळाची सिद्धता

तज्ञ पोलीस आणि लष्करी अधिकारी यांच्या मते शासकीय यंत्रणा ९० टक्के घटनांमध्ये आतंकवादी घटना होण्यापूर्वीच आतंकवाद्यांचे डाव उद्ध्वस्त करत आहेत. आपल्या गुप्तचर यंत्रणांसह विविध यंत्रणांचे हे यश नाकारून चालणार नाही; परंतु आक्रमणांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याने आता परत त्रुटी आणि आत्मपरीक्षण यांकडे जाण्याची वेळ येत आहे. काँग्रेस सरकारच्या काळातील भारतावरील विविध आक्रमणे आणि बाँबस्फोट यांचा विचार करता या घटनेत ज्या गतीने चक्रे फिरली अन् सर्व यंत्रणांच्या समन्वयातून ज्या गतीने मुळाकडे जाण्याचा प्रयत्न होत आहे, तो चांगलाच आहे. तंत्रज्ञानही पुढे गेले असल्याने त्याचीही साथ मिळाली; परंतु हे सर्व करतांना माध्यमांनी त्यांचे दायित्वही लक्षात घेतले पाहिजे. काही माध्यमे ते घेतही होती; परंतु या आणीबाणीच्या काळात अधिकार्‍यांच्या मागे लागून त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचाही भाग होत होता; ज्या वेळी पीडितांचे जीव वाचवणे त्यांचे प्राधान्य होते. अशा प्रकारचे मोठे आक्रमण देशावर होते, तेव्हा एकाच वेळी अनेक आघाड्यांवर आणि तेही तातडीने अन् तेवढेच विचारपूर्वक काम चालू करावे लागते. त्यात पीडितांना रुग्णालयात पाठवणे, पुरावे गोळा करणार्‍या विविध यंत्रणा कार्यरत करणे, त्यासाठी परिसर बंद करणे, अग्नीशमन यंत्रणा चालू करणे, प्रत्यक्षदर्शी पुरावे गोळा करणे, त्याच वेळी विविध ठिकाणी गस्त वाढवणे, सीसीटीव्ही पडताळणे, जे पुरावे मिळत आहेत, त्यांच्या मागेमागे जाऊन मुळाशी जाण्याच्या कृती कार्यान्वित करणे, त्यामध्ये विविध यंत्रणांचा योग्य समन्वय साधणे, माध्यमे आणि नागरिक यांना दिलासा देणे, अन्य कुठे अशा प्रकारे आक्रमणाची शक्यता नाही ना ? ते पडताळणे, अशा एका ना अनेक गोष्टी या अंतर्गत येतात. या सार्‍याच गोष्टी या घटनेच्या २ घंट्यांत कार्यान्वित झाल्याने त्याची फलनिष्पत्तीही चांगली मिळत गेली. विशेष म्हणजे गृहमंत्री अमित शहा स्वतः काही वेळात तातडीने घटनास्थळी आल्याने ‘शासनाने ही गोष्ट अत्यंत गांभीर्याने घेतली आहे’, याची निश्चिती जनतेला झाली. ‘शासन अपराध्यांना शिक्षा करील’, हा विश्वास जनतेला वाटणे, ही महत्त्वाची गोष्ट आहे.

आता होऊनच जाऊ द्या… !

मोदी शासनाने आतापर्यंत आतंकवाद्यांचा घेतलेला प्रतिशोध पहाता या घटनेनंतरही शासन काही ना काही प्रतिशोध नक्की घेईल, याची निश्चिती जनतेला आहे; परंतु ‘आता हा मारामारीचा खेळ किती दिवस चालू ठेवायचा आहे ?’, हा प्रश्नही सूज्ञ आणि देशप्रेमी जनतेला पडला आहे. जिहाद्यांच्या प्रत्येक आक्रमणात काहींचे मृत्यू झाल्यावर त्यांना त्याच्या दुप्पट-तिप्पट शिक्षा द्यायची; परत काही दिवसांनी त्यांनी वेगळ्या स्वरूपाचे आक्रमण करण्याचे धाडस करायचे, असेच चालू आहे. गुरुदासपूर, पठाणकोट, उरी, जम्मूतील सैन्य छावणी, अमरनाथ, पुलवामा आणि आता देहली, ही आक्रमणांची मालिका काही संपण्याचे नाव घेत नाही. ज्या ध्येयाने सरकारने नक्षलवाद संपवण्याच्या स्थितीत आणून ठेवला आहे, त्याच ध्येयाने आता भारतातील अंतर्बाह्य आतंकवादी आक्रमणे संपूर्णपणे संपवण्याचा पण केला पाहिजे; नाहीतर ‘झिरो टॉलरन्स’ (शून्य सहनशक्ती), ‘देश की जनता सुरक्षित है’ (देशाची जनता सुरक्षित आहे) या सगळ्या वल्गना ठरू शकतात. भारत सर्व दृष्टीने अधिकाधिक सक्षम होत असतांना आणि दुसरीकडे पाक अधिकाधिक भिकेकंगाल होत असतांना अशा प्रकारचे आक्रमण होणे, हे खेदजनक आहे. यापुढेही अधिक तीव्रतेने सूड घेतला, तरी पाकरूपी श्वानाचे शेपूट कधीही सरळ होऊ शकत नाही. आता कायमस्वरूपी पर्यायांचा वापर करण्याकडेच भारताने पावले उचलली पाहिजेत, असे तज्ञांसमवेत सामान्य नागरिकांनाही वाटते. किती दिवस ही आतंकवादी आक्रमणे सहन करायची ? आणि किती दिवस ‘स्ट्राईक’ अन् ‘ऑपरेशन’ करत रहायचे ? आतार्यंत आपण सहस्रो सैनिक आणि लक्षावधी नागरिक यांना या जिहाद्यांमुळे गमावले आहे. आता केंद्र सरकारने या संधीचा लाभ घेऊन पाकचे कंबरडे पुरते मोडावे. भारताच्या डोक्यावर बसलेले हे पाप नष्ट झाल्याविना भारताला शांती मिळणार नाही. ‘हिंदु राष्ट्र’ या एका नावात हे पापस्तान नष्ट करण्याची सूक्ष्म क्षमता आहे, हे मात्र निश्चित !

वारंवार आक्रमणे करणार्‍या आतंकवाद्यांचा प्राण असलेले पापस्तान नष्ट करण्याचेच ध्येय आता सरकारने ठेवले पाहिजे !