हिंदु मंदिरांच्या अनुषंगाने करप्रणाली !

‘हिंदु मंदिरांना वेगवेगळ्या स्रोताच्या माध्यमातून दान मिळते, यामध्ये प्रामुख्याने देणगी, देणगीपेटी, गुप्तदान, मंदिरांच्या जागांचे – सभागृहाचे भाडे. शेत भूमीमधून, देवतेसंबंधीचे माहिती पुस्तक, प्रसाद, छायाचित्र विक्री, मंदिरांच्या माध्यमातून पुरवल्या जाणार्‍या विविध सेवा, उदाहरणार्थ भक्त निवास, सशुल्क भोजन व्यवस्था या व्यतिरिक्त आणखी काही स्रोत असतील तर. यापैकी कोणते उत्पन्न करप्राप्त आहे आणि कोणते करमुक्त या संदर्भात मंदिराच्या विश्वस्तांमध्ये मतभिन्नता, संभ्रम असल्याचे दिसून आले. ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या राज्य-जिल्हा अधिवेशनांमध्ये काही विश्वस्तांनी या संदर्भात प्रश्न विचारले. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या सुकाणू समितीच्या रांजणगाव येथील बैठकीत या संदर्भात चर्चा झाली. हा संभ्रम, मतभिन्नता दूर करण्यासाठी या विषयावर ‘सनातन प्रभात’मध्ये लेख लिहावा, हा विचार पुढे आला; म्हणून हा लेख प्रपंच !


१. मंदिरांच्या संदर्भात मुख्य ३ प्रकारचे कर 

सद्यःस्थितीत मंदिरांच्या उत्पन्न, मिळकती, सेवा यांच्या संदर्भात प्रामुख्याने ३ प्रकारचे कर आहेत, असे म्हणता येईल.

अ. आयकर

आ. वस्तू आणि सेवा कर

इ. स्थानिक कर (म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद किंवा महानगरपालिका कर.)

श्री. दिलीप देशमुख

२. करामध्ये सवलत घेण्यासाठी असलेल्या प्रमुख अटी

आयकराचे संचलन करण्यासाठी ‘आयकर अधिनियम १९६१’ आहे. त्या कायद्याचे कलम ११ प्रमाणे धर्मादाय किंवा धार्मिक उद्देश असलेल्या न्यासाच्या मालमत्तेमधून निघणारे उत्पन्न करमुक्त आहे; मात्र ही सवलत घेण्यासाठी प्रामुख्याने काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

अ. या अधिनियमाचे कलम १२ अ, ब प्रमाणे मंदिर न्यासाची नोंदणी आयकर कार्यालयात करणे आवश्यक आहे.

आ. मंदिर न्यासास मिळणार्‍या एकूण उत्पन्नापैकी किमान ८५ टक्के उत्पन्न धर्मादाय किंवा धार्मिक उद्देशासाठी खर्च करणे आवश्यक आहे.

इ. ८५ टक्के उत्पन्न धर्मादाय किंवा धार्मिक उद्देश यांच्या पूर्ततेसाठी व्यय केले आहे, हे दर्शवण्यासाठी जमा-खर्च व्यवस्थित लिहिणे, त्याचा ताळेबंद सिद्ध करणे आणि त्याचे लेखापरीक्षण (सनदी लेखापालाकडून) करून ते आयकर कार्यालयात प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

ई. आयकर अधिनियमाचे कलम १२ स्वेच्छा देणगी संदर्भात आहे. मंदिर न्यासास मिळालेली स्वेच्छा देणगी मंदिर न्यासाचे उत्पन्न आहे, असे गृहित धरले जाते; मात्र ती देणगी ‘स्थायी निधी’ या सदराखाली दिलेली असेल, तर ती मंदिर न्यासाचे उत्पन्न गृहीत धरले जात नाही आणि ती ‘करमुक्त’ असते; मात्र यासाठी वरील अट क्रमांक १ ची पूर्तता करणे आवश्यक आहे.

उ. एका मंदिर न्यासाने दुसर्‍या मंदिर न्यासास दिलेली देणगी ही देणगीप्राप्त मंदिर न्यासाचे उत्पन्न गृहीत धरले जाते. त्याचप्रमाणे मंदिर न्यासाच्या माध्यमातून पुरवल्या जाणार्‍या वैद्यकीय, शैक्षणिक सेवा यांमधून मिळणारे उत्पन्न ही मंदिर न्यासाचे उत्पन्न गृहीत धरले जाते. ते करमुक्त करून घ्यायचे असल्यास वरील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

३. वस्तू आणि सेवा कर

वस्तू आणि सेवा कर यांचे नियमन करण्यासाठी ‘केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७’ आहे. त्याप्रमाणे मंदिरांच्या माध्यमातून केले जाणारे धार्मिक विधी, देणग्या, अर्पण १०० टक्के करमुक्त आहे. त्याचप्रमाणे प्रसाद विक्री, पूजा किंवा दर्शन शुक्ल, विनामूल्य अन्नदान या सेवा पूर्णपणे करमुक्त आहेत; मात्र मंदिरांच्या माध्यमातून चालवल्या जाणार्‍या व्यावसायिक उपक्रमांसाठी कर आकारणी केली जाते. उदाहरणार्थ भक्त निवासमधील खोली भाडे १००० रुपयांपेक्षा अधिक असेल, सभागृह भाडे १० सहस्र रुपयांपेक्षा अधिक असेल, व्यावसायिक दुकान मासिक भाडे १० सहस्र रुपयांपेक्षा अधिक असेल, स्मरणिका विक्री दुकान आणि इतर माल यांना वस्तू अन् सेवा कर लागू आहे.

४. स्थानिक कर

महाराष्ट्रामधील स्थानिक संस्था धार्मिक कार्यासाठी (पूजा, प्रार्थना इत्यादी) वापरल्या जाणार्‍या इमारती मिळकत कर आकारत नाहीत; परंतु ही करमुक्तीची सवलत प्राप्त करण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक असते.

अ. त्या मिळकतीचा, इमारतीचा किंवा त्यातील काही भागाचा उपयोग केवळ धार्मिक कार्यासाठीच होतो, हे दर्शवणे.

आ. त्या मिळकतीमधून, इमारतीमधून कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न, भाडे मिळत नाही, हे दर्शवणे.

इ. इमारतीचा काही भाग धार्मिक कार्यासाठी आणि काही भाग व्यावसायिक कारणासाठी वापरला जात असेल, तर केवळ धार्मिक कार्यासाठी वापरला जाणारा भाग मिळकत करातून मुक्त आहे.

ई. मिळकत, इमारत करमुक्त करून घेण्यासाठी न्यासाची नोंदणी ‘महाराष्ट्र न्यास अधिनियम १९५०’प्रमाणे त्याचप्रमाणे ‘आयकर अधिनियम १९६१’प्रमाणे धर्मादाय तथा आयकर कार्यालय (अनुक्रमे) करणे आणि दोन्ही कार्यालयात वार्षिक ताळेबंद अन् लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असणार्‍या धार्मिक न्यासांच्या मिळकती करमुक्त करून घेण्यासाठी काही नियम आणि अटी यांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

(वरील माहिती ढोबळ मानाने दिलेली आहे. जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी संबंधित कायद्याचे वाचन करावे किंवा सनदी लेखापालाचा सल्ला घ्यावा.) (५.११.२०२५)

– श्री. दिलीप देशमुख, माजी सहधर्मादाय आयुक्त, पुणे.