Goa Pakistan Zindabad Signboard : बागा आणि हडफडे येथील २ दुकानांच्या फलकांवर आढळले ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे लिखाण !

  • दुकानमालकांसह ९ जणांना अटक

  • एल्.ई.डी. फलक ‘हॅक’ झाल्याची शक्यता

(हॅक : एखाद्याची माहिती चोरून प्राप्त करून त्यात हवा तसा पालट करणे)

म्हापसा – येथील बागा आणि हडफडे  येथील २ वेगवेगळ्या दुकानांबाहेर लावलेल्या एल्.ई.डी. (आधुनिक विद्युतदिवे) फलकांवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे लिखाण केल्याप्रकरणी पोलिसांनी या दुकानांच्या मालकांसह ९ जणांना अटक केली आहे, तसेच या एल्.ई.डी. फलकांची वीजजोडणी तोडली आहे.

१. बागा येथील ‘रिव्हाइव्ह हेअर कटींग सलून’ आणि हडफडे येथील ‘व्हिस्की पीडिया’ या दुकानांच्या एल्.ई.डी. फलकांवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे लिखाण असलेले फलक ४ नोव्हेंबरच्या संध्याकाळी झळकत होते.

२. बाजारपेठेतील काही जणांना हे आक्षेपार्ह लिखाण दिसल्यावर त्यांनी त्याचे चित्रीकरण करून ते व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित करत दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी केली.

३. ‘या प्रकरणी पोलिसांनी या दुकानांशी संबंधित ९ जणांना अटक केली आहे. ही दुकाने स्वतंत्रपणे चालवली जातात. ४ नोव्हेंबरला संध्याकाळी दोन्ही ठिकाणी एकाच वेळी ‘पाकिस्तान झिंदाबार’, असे लिखाण प्रदर्शित झाले’, असे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. ‘व्हिस्की पीडिया’ या दुकानाशी संबंधित रंचित भाटिया, विपिन पाहुजा, विनय चंद्रा राव, क्रिष्णा लमाणी आणि मनोज कुमार, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

४. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी रहिवाशांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अमदार लोबो म्हणाले की, ही घटना गोव्यात शांततेने रहाणार्‍या समुदायांमध्ये जातीय तणाव निर्माण करण्यासाठी जाणूनबुजून करण्यात आलेली असू शकते.

५. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक रहिवासी, सरपंच आणि पंचायत सदस्य यांनी दुकान मालकांना या लिखाणाविषयी विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की, त्यांचे एल्.ई.डी. फलक ‘हॅक’ झाले असून ‘हे लिखाण कसे प्रदर्शित झाले ?’, हे त्यांना माहिती नाही. पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, तांत्रिक तज्ञ ‘अन्य ठिकाणाहून ‘डिस्प्ले’मध्ये फेरफार करण्यात आला का ?’, याची पडताळणी करत आहेत.

सरकार अशी कृत्ये सहन करणार नाही ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या घटनेचा निषेध केला आहे. मुख्यंमत्री म्हणाले की, ज्या एल्.ई.डी. फलकांवर हे लिखाण प्रदर्शित करण्यात आले होते, ते फलक विनाअनुमती लावण्यात आले होते. पोलिसांनी ते फलक त्वरित काढून संबंधितांना अटक केली आहे. सरकार अशी कृत्ये सहन करणार नाही. ‘गोवा हे एक शांत आणि देशभक्त राज्य राहील. येथील सुसंवाद बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल. प्राथमिक अन्वेषणात एल्.ई.डी. फलक ‘हॅक’ झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सायबर गुन्हे शाखाही अन्वेषण करत आहे. ‘नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच शांतता आणि एकता कायम राखावी’, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

देशभरात ठिकठिकाणी पाकिस्तानविषयी प्रेम बाळगणारे आढळून येत आहेत. गोवा सरकारने अशा पाकप्रेमींना कायमचे पाकमध्ये पाठवावे !