‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या संदर्भात कर्नाटक राज्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव या निमित्ताने १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यातील फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. या वेळी कर्नाटक राज्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती यांचा काही भाग ५ नोव्हेंबर २०२५ या दिवशीच्या अंकात पाहिला, आज उर्वरित भाग पाहुया.        

(भाग ३)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/973640.html

९. पद्मावती, मैसुरू

९ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वप्नात सांगितल्याप्रमाणे रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाचे दर्शन होणे : ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’साठी गोवा येथे जात असतांना मी बसमध्ये झोपले होते. तेव्हा माझ्या स्वप्नात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आले आणि ते मला म्हणाले, ‘मी तुला रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाचे प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे.’ आमची बस थांबली आणि मी डोळे उघडले, तर खरोखरच समोर रामनाथी आश्रमाचे दर्शन झाले. तेव्हा मला समजले की, ‘आमच्या उत्तरदायी साधकाने सर्वांना रामनाथी आश्रम दाखवण्यासाठी बस थांबवली होती.’ या अलौकिक अनुभूतीसाठी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

१०. श्री. राघवेंद्र, मैसुरू

१० अ. प्रवासाचा थकवा असूनही उत्साह टिकून रहाणे आणि काही वेळ नामजप आपोआप होणे अन् स्वभावदोष लक्षात आल्यावर अंतर्मुख होऊन आत्मचिंतन चालू होणे : ‘आम्हाला ३ दिवसांच्या प्रवासाचा थकवा आला होता; परंतु महोत्सव स्थळी गेल्यावर थकव्याचा मागमूसही राहिला नव्हता. माझ्यामध्ये केवळ उत्साह टिकून होता. काही वेळ माझा आपोआप नामजप होत होता. माझे कितीतरी स्वभावदोष लक्षात आले आणि त्यांना दूर करण्यासाठी सतत प्रार्थना होत होती. माझे स्वभावदोष लक्षात आल्यावर मी अंतर्मुख झालो आणि माझे आत्मचिंतन चालू झाले.’

११. श्रीमती ललितम्मा तिम्मप्पैया (वय ७१ वर्षे), येलहंका, बेंगळुरू.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त हनुमानाची शक्ती कार्यरत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मी मारुतीला प्रार्थना केली, ‘हे मारुतिराया, मला तुझ्या कार्याची अनुभूती येऊ दे.’ त्यानंतर मला हनुमानाच्या कार्याचे कितीतरी दिव्य अनुभव आले. ते मी पूर्ण श्रद्धेने प.पू. गुरुदेवांच्या चरणी समर्पित करते.

अ. महोत्सवस्थळी व्यासपिठाची सिद्धता करतांना एक साधक लाकडी फळीवर चढला. तेव्हा ती फळी हलत होती. तेव्हा ‘मारुति त्या फळीवर उभा राहिला आणि त्याने त्या साधकाचे रक्षण केले’, असे मला वाटले.

आ. ‘१७.५.२०२५ या दिवशी, म्हणजे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी त्या ठिकाणी स्वच्छता करतांना तेथील काही विचित्र दगड मारुति बाजूला करत होता’, असे मला दिसले.

इ. १८.५.२०२५ या दिवशी म्हणजे महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी ‘सभामंडपात उभे केलेले खांब आणि त्याची रचना मारुति स्वतः पडताळत आहे’, असे मला दिसले. त्यानंतर मारुति प्रकाशयंत्रणेची पहाणी करत होता आणि वातानुकूल यंत्रणेची दिशा स्वतः पडताळून ठीक करत होता.

ई. पहिल्या दिवशी मंडप उघडल्यावर ‘मारुतीने सभोवती पसरलेल्या असंख्य दुष्ट शक्तींना पळवून लावले’, असे मला दिसले. त्यानंतर मारुतीने आसन व्यवस्थेची पहाणी केली. तेव्हा आसनांच्या मध्यभागी हनुमानाची विशाल आकृती दिसली. तेव्हा मारुति चारही बाजूंना फिरत होता.

११ उ. शतचंडी यागाच्या वेळी आलेली अनुभूती

११ उ १. शतचंडी यागाच्या वेळी संत आणि सद्गुरु यांनी देवीला सामूहिक प्रार्थना करणे, तेव्हा देवी यज्ञकुंडाजवळ येणे आणि तिने आहुती स्वीकारून क्षणात अदृश्य होणे : २०.५.२०२५ या दिवशी म्हणजे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या चौथ्या दिवशी शतचंडी याग झाला. श्री गुरुदेवांच्या कृपेने तेथे पुष्कळ चैतन्य अनुभवायला मिळाले. पुरोहितांनी देवीला आवाहन केल्यावर देवी आकाशामार्गे आली आणि यज्ञकुंडापासून साधारण १० फूट उंचीवर थांबली. कितीही प्रार्थना केली, तरी ती खाली येत नव्हती. तेव्हा अनेक संत आणि सद्गुरु यांनी सामूहिक प्रार्थना केली. देवी हळूहळू यज्ञकुंडाजवळ आली आणि तिने आहुति स्वीकारली अन् ती क्षणात अदृश्य झाली.’

१२. सौ. शारदा योगेश, येलहंका, बेंगळुरू.

अ. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या कालावधीत ‘मी कोणत्यातरी उच्च लोकात आहे’, असे मला जाणवले.

आ. मला प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र अत्यंत सजीव वाटत होते.

इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आगमन झाल्यावर जणू ‘चैतन्याची लाट येत आहे’, असे मला जाणवले.

ई. ध्वजारोहणाच्या वेळी ‘आकाशमंडळात देवता पुष्पवृष्टी करण्यासाठी शंखाकृती आकारात उभ्या आहेत’, असे मला जाणवले. संपूर्ण आकाशात सायंसंध्येचे सूर्यकिरण अत्यंत तेजस्वी वाटत होते.

उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ध्वजारोहण करत होते. तेव्हा देवता, यक्ष, किन्नर, गंधर्व पुष्पवृष्टी करत होते आणि ही पुष्पवृष्टी पुष्कळ वेळपर्यंत चालू होती. ध्वजारोहणानंतर ‘ध्वज पुष्कळ वेगाने फडकत आहे’, असे मला जाणवले.’

१३. सौ. कविता सकरी, हनुमंतनगर, बेंगळुरू.

१३ अ. महोत्सवातील ३ दिवस ‘वैकुंठलोकातील तिरुपति येथे रहात आहे’, असे जाणवणे : ‘महोत्सवस्थळी प्रवेश केल्यानंतर मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाले. त्या वेळी मला ‘तिरुपतीच्या वेंकटेश्वर आणि श्रीमहालक्ष्मी यांचे दर्शन झाले’, असे मला वाटले. तिरुपति येथे गेल्यावर दर्शनासाठी २ – ३ घंटे उभे रहावे लागते. येथे आल्यावर १ – २ मिनिटांतच भगवंताचे दर्शन झाले. ‘मी महोत्सवातील तीन दिवस वैकुंठलोकातील तिरुपति येथे रहात आहे’, असे मला जाणवले. तेव्हा माझे मन अंतर्मुख झाले होते.’

(समाप्त)

(सर्व सूत्रांसाठी दिनांक : २३.९.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक