पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !

पू. शिवाजी वटकर

१. वर्ष २०२१ मध्ये श्री. तुकाराम लोंढे यांनी स्वतःच्या आयुष्यातील काही वर्षे पू. शिवाजी वटकर यांना देण्याची सिद्धता दर्शवणे

‘१९.१०.२०२१ या दिवशी मी बीड येथे घरी आई-वडिलांची सेवा करण्यासाठी राहिलो होतो. तेव्हा मला पू. रमेश गडकरी (सनातनचे १९ वे संत, वय ६८ वर्षे) यांचा भ्रमणभाष आला. त्या वेळी त्यांनी मला विचारले, ‘‘तुमचे मित्र पू. वटकरकाका (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) यांचा आज वाढदिवस आहे. तुम्ही त्यांना काय भेट देणार ?’’ मी पू. वटकरकाकांना भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘माझ्याकडे तुम्हाला वाढदिवसानिमित्त देण्यासारखे काही नाही. मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील काही वर्षे देतो.’’ तेव्हा पू. वटकरकाका मला म्हणाले, ‘‘असे काही द्यायला नको. प.पू. डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) जे करतील, ते आपण आनंदाने स्वीकारूया.’’

श्री. तुकाराम लोंढे

 

२. वर्ष २०२५ मध्ये श्री. तुकाराम लोंढे यांना स्वप्नात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ‘पू. वटकरकाकांचे आयुष्य वाढवतो’, असे सांगत आहेत’, असे दिसणे

६.१०.२०२५ या दिवशी पहाटे ४ वाजता मला स्वप्नातच वरील प्रसंगाचे स्मरण झाले आणि स्वप्नात माझ्या मनात विचार आला, ‘पू. वटकरकाका जिवंत नाहीत.’ तेव्हा स्वप्नात अकस्मात् प.पू. डॉक्टर मला म्हणाले, ‘पूर्वी तुम्ही पू. वटकरकाकांना तुमच्या आयुष्यातील काही वर्षे दिली होती, ती आता द्यायला नको. मीच त्यांचे आयुष्य वाढवतो. देवाला त्यांच्याकडून साधना आणि सेवा करून घ्यायची आहे.’

३. अगस्ती नाडीपट्टीत ‘पू. वटकरकाकांचे आयुष्य ७५ वर्षे आहे’, असे लिहिले असणे; मात्र सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने त्यांना वयाच्या ७५ व्या वर्षानंतरही आयुष्य लाभले असणे

सकाळी मी वरील स्वप्न आठवत आनंदातच जागा झालो. त्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी तळमळ असलेले आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७९ वर्षे) !’, या मथळ्याखाली पू. वटकरकाकांच्या वाढदिवसानिमित्त लेख प्रसिद्ध झाला होता. तेव्हा ‘आज (६.१०.२०२५ या दिवशी)

पू. वटकरकाकांचा वाढदिवस आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. मी त्यांना मला पडलेल्या स्वप्नाविषयी सांगितले. त्यानंतर आम्ही दोघांनी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. त्या वेळी आमची पुष्कळ भावजागृती झाली.

तेव्हा पू. वटकरकाका मला म्हणाले, ‘‘अगस्ती नाडीपट्टीचे वाचन केले होते. त्यात ‘माझे आयुष्य ७५ वर्षे आहे’, असे सांगितले होते, म्हणजे माझे आयुष्य वर्ष २०२१ पर्यंतच असायला हवे होते. केवळ प.पू. गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मी माझ्या ७९ व्या वर्षांनंतरही जिवंत आहे. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने आपल्या दोघांची आध्यात्मिक मैत्री आहे आणि ती ३० वर्षे टिकून आहे. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने तुमची त्यागी वृत्ती आहे; म्हणून माझे आयुष्य वाढवण्यासाठी तुम्ही स्वतःच्या आयुष्यातील काही वर्षे मला सहजतेने दिली. तुम्ही माझे प्राणप्रिय आणि श्रेष्ठ मित्र आहात. कितीही पैसे दिले किंवा प्रयत्न केले, तरीही मनुष्याच्या शेवटच्या क्षणी त्याचे आयुष्य वाढवता येत नाही, तसेच कुणीही कुणाचे आयुष्य १ मिनिटांनीही वाढवून देऊ शकत नाही. तुम्हाला स्वप्नात ‘प.पू. डॉक्टरांनी आपल्या दोघांचेही आयुष्य वाढवले आहे’, असे दिसले. तुम्ही मला दिलेली तुमच्या आयुष्यातील काही वर्षे तुम्हाला परत मिळाली आणि माझेही आयुष्य प.पू. डॉक्टरांनी वाढवले आहे. जी गोष्ट देव किंवा कुणीच करू शकत नाही, ती प.पू. गुरुमाऊलींनी केली आहे. या त्यांच्या कृपेला काय म्हणावे ? आणि त्यांचे ऋण कसे फेडावे ?’’ ‘आयुष्यभर प.पू. डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परमेश्वरानेच आम्हाला बुद्धी आणि शक्ती द्यावी’, अशी प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करूया.’’

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पू. शिवाजी वटकर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ते सूक्ष्मातून समवेत आहेत’, असे आश्वस्त केले’, असे जाणवणे

हा प्रसंग सकाळी ११.३० वाजता घडला. त्यानंतर अनुमाने दुपारी १२.१० वाजता प.पू. डॉक्टर पू. वटकरकाकांशी भ्रमणभाषवर बोलले. तेव्हा ‘आम्हा दोघांची प्रार्थना आणि कृतज्ञता प.पू. डॉक्टरांच्या चरणी पोचली अन् त्यांनी आम्हाला स्थुलातून अनुभूती दिली’, असे आम्हाला वाटले. प.पू. डॉक्टरांनी जणू ‘मी सूक्ष्मातून नेहमी तुमच्या समवेत आहे आणि राहीन. तुम्ही केवळ साधना आणि सेवा करून पुढे जायचे आहे. मी तुमची साथ कधीच सोडणार नाही’, असे आम्हाला आश्वस्त केले. ‘आम्हा दोघांची श्रद्धा वाढवण्यासाठी ‘मला असे स्वप्न पडणे, प.पू. डॉक्टर भ्रमणभाषवर बोलणे आणि इतर वेळी त्यांच्याविषयी येणार्‍या अनुभूती’, या घटना ‘प.पू. डॉक्टर आमची साथ कधीच सोडणार नाहीत’, याच्या द्योतक आहेत’, असे आम्हाला वाटते.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा 

त्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘माझे आयुष्य पू. वटकरकाकांना देण्यासंदर्भात वर्ष २०२१ मध्ये माझे त्यांच्याशी झालेले बोलणे आणि ‘प.पू. डॉक्टरांनी पू. वटकरकाकांना आयुष्य वाढवून देतो’, या संदर्भात मला वर्ष २०२५ मध्ये पडलेले स्वप्न’ या दोन्ही घटना पू. वटकरकाकांच्या वाढदिवसाच्या दिवशीच घडल्या होत्या. ‘प.पू. गुरुमाऊलींनी आम्हा दोघांचेही कल्याण केले’, त्याबद्दल प्राणदात्या प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी आयुष्यभर कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.’

– श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.१०.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.