‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव या निमित्ताने १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यातील फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. या वेळी कर्नाटक राज्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती यांचा काही भाग ३ नोव्हेंबर २०२५ या दिवशीच्या अंकात पाहिला, आज त्यापुढील भाग पाहुया.
(भाग २)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/972940.html

३. सावित्री हरिकांत, कुमटा, उत्तर कन्नड.
३ अ. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ठिकाणी प्रवेश केल्यावर ‘देवलोकात आहे’, असे जाणवणे आणि प्रत्येक ठिकाणी भगवंताचे अस्तित्व जाणवणे : ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ठिकाणी महाद्वारातून आत प्रवेश करताच मी ‘स्वर्गलोकात प्रवेश करत आहे’, असे मला वाटले. तेथील वातावरण चैतन्यमय होते. ‘मी देवलोकातच आहे’, असे मला जाणवले. मी भगवान श्रीरामाची मूर्ती पाहिली. तेव्हा ‘भगवंताचे दर्शन होत आहे’, असे मला जाणवले. मला प्रत्येक ठिकाणी भगवंताचे अस्तित्व जाणवत होते.
३ आ. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पाहिल्यावर ‘अनेक तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळाले’, असे वाटणे आणि अन्य कोणतीही यात्रा करण्याची इच्छा न उरणे अन् ‘जीवनाचे सार्थक झाले’, असे वाटणे : महोत्सवातील प्रदर्शनात अनेक पवित्र वस्तू ठेवल्या होत्या. तेथे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वापरलेल्या चैतन्यमय वस्तू आणि सर्व प्रकारचे शाळिग्राम, अन्य संतांच्या पादुका, भारतातील पवित्र नद्यांचे तीर्थ आणि राजा-महाराजा यांनी युद्धात वापरलेली शस्त्रास्त्रे’ पाहून ‘संपूर्ण विश्वच माझ्या समोर अवतरले आहे आणि मी पावन झाले आहे’, असे मला वाटले. ‘एखाद्या व्यक्तीला अनेक तीर्थयात्रा केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होते, तेच पुण्य येथे आल्यामुळे प्राप्त झाले आहे’, असे मला वाटले. आता मला अन्य कोणतीही यात्रा करण्याची इच्छा उरली नाही. महोत्सवात मला हे सर्व पहाण्याचे भाग्य प्राप्त झाल्यामुळे मला अत्यंत आनंद झाला आणि ‘माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असे मला वाटले.
३ इ. भोजनकक्षात अन्नपूर्णामातेचे अस्तित्व जाणवणे आणि महोत्सवात शंखनाद झाल्यावर आनंद होणे : मी भोजनकक्षात प्रवेश केल्यावर ‘तेथे अन्नपूर्णामाता विराजमान झाली आहे’, असे मला अनुभवता आले. मी महाप्रसाद ग्रहण केला, तेव्हा ‘माझे मन आणि शरीर दोन्ही अत्यंत हलके झाले आहेत’, असे मला जाणवले. मला ‘महाप्रसादातून पुष्कळ चैतन्य मिळाले आहे’, असे अनुभवता आले. महोत्सवात शंखनाद झाल्यावर मला अपार आनंद झाला.
३ ई. देवीची पूजा करत असतांना ‘देवी तेथे प्रकट झाली आहे’, असे जाणवणे : धन्वन्तरि यागाच्या वेळी उपस्थित असलेले सहस्रो साधक एकाच परिवारातील आहेत’, असे मला जाणवले. देवीची पूजा करत असतांना ‘तेथे देवी प्रकट झाली आहे आणि या पूजेतून चोहीकडे आनंद अन् चैतन्य यांच्या लहरी पसरत आहेत’, असे मला जाणवले.
३ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले परमात्मासमान असूनही ते सर्वांना हात जोडून नम्रतेने भेटत होते आणि त्यांना दिलेली भेटवस्तू सुहास्य मुद्रेने कृतज्ञतापूर्वक स्वीकारत होते.’
४. सौ. स्वाती ऐगल, अंकोला, उत्तर कन्नड.
४ अ. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त संत, सद्गुरु यांनी मार्गदर्शन करत असतांना सांगितले, ‘‘आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आपली आध्यात्मिक साधना वाढवणे किती आवश्यक आहे.’’ तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली.
४ आ. प.पू. गुरुदेव साक्षात् भगवान श्रीकृष्णाच्या रूपात दिसत होते. ते मार्गदर्शन करत असतांना माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वहात होते. ते पाहून माझ्या मनात हाच विचार येत होता, ‘गुरुदेव आम्हा साधकांची किती काळजी घेत आहेत आणि मी साधनेत किती न्यून पडत आहे.’
४ इ. दुर्गादेवीचे चित्र पाहिल्यावर ‘जणू साक्षात् दुर्गादेवीच माझ्यासमोर उभी आहे. तिच्या हातात आयुधे आहेत आणि ती मला दर्शन देत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझी भावजागृती पुनःपुन्हा होत होती.
४ ई. आम्हाला दिलेल्या निवासस्थानीही गुरुदेवांच्या कृपेने कसलीही असुविधा झाली नाही. आयोजकांनी अत्यंत प्रेमाने आणि लक्षपूर्वक सर्व गोष्टींची व्यवस्था केली होती. गुरुदेवांचे वर्णन करायला शब्दच अपुरे पडत होते.
४ उ. श्रीसत्शिक्त (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन झाल्यावर मला वाटले, ‘जणू साक्षात् देवीची रूपेच मला दिसत आहेत.’
५. सौ. तारा शेट्टी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५२ वर्षे), उडुपी
५ अ. प्रदर्शनकक्षाच्या ठिकाणी सुगंध येणे आणि प.पू. गुरुदेव अन् देवता यांची दिव्य उपस्थिती जाणवणे : प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला महोत्सवात सनातन-निर्मित उत्पादनाच्या प्रदर्शनकक्षाच्या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. प्रदर्शनकक्षात एकदा मला चंदनाचा तर एकदा केवड्याचा सुगंध येत होता. तिथे प.पू. गुरुदेव आणि अनेक देवता यांची दिव्य उपस्थिती मला जाणवत होती.
५ आ. मी प्रथमच महोत्सवस्थळी आले. तेव्हा ‘मी सुंदर राजमहालासमोर उभी आहे’, असे मला अनुभवता आले. त्या वेळी मला श्रीकृष्णाच्या नगरीचे स्मरण झाले.
५ इ. मी सेवेनिमित्त ‘सच्चिदानंद परब्रह्म आठवले नगरी’त दुसरीकडे जात असतांना मला पुष्कळ आनंद आणि उत्साह वाटत होता. ‘माझे संपूर्ण शरीर फुलासारखे हलके झाले आहे’, अशी मला अनुभूती येत होती.
६. सौ. अश्विनी नायक, उडुपी
६ अ. ‘आपत्काळात गुरुदेव साधकांना शक्ती आणि चैतन्य प्रदान करून नेतृत्वगुण वाढवत आहेत’, असे वाटणे : ‘शंखनाद महोत्सवाच्या अंतिम दिवशी जोरात पाऊस पडत होता. सर्व साधकांना निवासस्थानी परत जाण्यासाठी सांगितले. एका बसमध्ये असलेल्या सर्व साधकांचे साहित्य दुसर्या बसमध्ये ठेवले. साधकांनाही दुसर्या बसमध्ये बसण्यास सांगितले. त्या वेळी ‘आपत्काळात गुरुदेव साधकांना शक्ती आणि चैतन्य प्रदान करून आमच्यामध्ये नेतृत्वगुण वाढवत आहेत’, असे जाणवले. यासाठी अंतर्मनापासून गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.
६ आ. ‘कोणत्याही कठीण परिस्थितीत गुरुदेव साधकांचे रक्षण करत आहेत’, याची जाणीव होणे : सामान हलवतांना अकस्मात् जोराने वीज कडाडली आणि दोन चालक अन् एक वाहक यांना ती वीज जवळून गेली. एका चालकाच्या हाताला काही वेळ संवेदनाच जाणवत नव्हत्या. आम्ही पाच साधक त्यांच्या अगदी जवळच उभे होतो; परंतु गुरुदेवांनी आम्हाला या संकटापासून सुरक्षित ठेवले. ‘कोणत्याही कठीण परिस्थितीत गुरुदेव साधकांचे रक्षण करत आहेत’, याची आम्हाला जाणीव झाली आणि आम्ही कृतज्ञता व्यक्त केली.
७. सौ. विनोदा बायलूर, उडुपी
७ अ. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त प.पू.गुरुदेव हिंदुत्वनिष्ठांना पुरस्कार प्रदान करत होते. त्या वेळी त्यांच्या बोटांमधून प्रकाश बाहेर पडत असल्याचे जाणवले. हे अत्यंत दिव्य दृश्य होते.
८. सौ. चेतना शंकर, कुणीगल, तुमकुरू.
८ अ. ‘ईश्वराची कृपा, गुरूंचा संकल्प आणि साधकांचे प्रयत्न यांमुळेच एवढ्या मोठ्या महोत्सवाचे आयोजन करणे शक्य झाले’, असे जाणवणे : हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी त्यांच्या भाषणात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची स्तुती केली, तेव्हा ‘ईश्वराची कृपा, गुरूंचा संकल्प आणि साधकांचे प्रयत्न’ यांमुळेच एवढ्या मोठ्या महोत्सवाचे आयोजन करणे शक्य झाले’, असे मला जाणवले आणि माझे डोळे भरून आले. मी सतत प्रार्थना करत होते, ‘गुरुदेव, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आपले हे विलोभनीय रूप माझ्या डोळ्यांसमोर सतत रहावे.’
८ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चैतन्यमय वाणी ऐकून साधिकेच्या देहावरील त्रासदायक शक्तींचे आवरण नष्ट होणे : प.पू. गुरुदेव मार्गदर्शन करत असतांना ‘त्यांच्या वाणीतील चैतन्यामुळे कितीतरी अंतरापर्यंतचे वातावरण शुद्ध झाले. गुरूंच्या शब्दांमुळे माझ्या देहावरील त्रासदायक शक्तींचे आवरण नष्ट झाले’, असे मला जाणवले.
८ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन हिंदु राष्ट्राचा ध्वज फडकवला, त्या वेळी मी (सौ.) श्रीसत्शक्ति बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे हसतमुख चेहरे पाहिले. तेव्हा ‘या क्षणीच हिंदु राष्ट्राची स्थापना होत आहे’, असे मला जाणवले.’
(क्रमशः)
(सर्व सूत्रांसाठी दिनांक : २३.९.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/973997.html
लक्षात घ्या, विज्ञानाची ही मर्यादा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !