कर्नाटकातील शाळांत हिजाबला दिलेल्या अनुमतीच्या विरोधात हिंदूंची ‘भगवे उपरणे मोहीम’ !

पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना कह्यात घेऊन सोडले

(हिजाब म्हणजे मुसलमान मुली डोके आणि मान झाकण्यासाठी वापरत असलेले वस्त्र)

दरबार हायस्कूल आणि महाविद्यालयाच्या परिसराजवळ भगव्या उपरणांसह जमा झालेले हिंदुत्वनिष्ठ

विजयपूर (कर्नाटक) – शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यास काँग्रेस सरकारने अनुमती दिल्याच्या निषेधार्थ येथील हिंदु विद्यार्थ्यांना ‘भगवे उपरणे वाटप’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात सहभागी झालेले प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ५ जूनला कह्यात घेतले. थोड्या वेळाने त्यांना सोडून देण्यात आले. ५ जूनला येथील दरबार हायस्कूल आणि महाविद्यालयाच्या परिसराजवळ भगव्या उपरणांसह हिंदुत्वनिष्ठ जमा झाले होते.

विद्यार्थ्यांना भगवे उपरणे वाटण्याची सिद्धता चालू असतांनाच पोलिसांनी त्यांना रोखले. या वेळी पोलीस आणि समर्थक यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यानंतर आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ घटनास्थळी पोचले आणि त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांना भगवे उपरणे वाटप करण्यास आरंभले असताच पोलिसांनी यत्नाळ आणि त्यांच्या समर्थकांना कह्यात घेतले. यामुळे संतप्त झालेल्या समर्थकांनी पोलीस वाहनासमोर बसून निषेध केला. कालांतराने यत्नाळ आणि त्यांचे समर्थक यांची सुटका करण्यात आली.

सुटकेनंतर राज्य सरकारवर टीका करत आमदार यत्नाळ यांनी, हिजाबला दिलेल्या अनुमतीवर सरकारने त्वरित पुनर्विचार करावा, अशी मागणी केली.

संपादकीय भूमिका

धार्मिक स्वातंत्र्याचा संदर्भ देत कर्नाटकातील पाकिस्तानी राजवट असलेल्या काँग्रेसने मुसलमान मुलींसाठी हिजाबला अनुमती दिलेली असतांना दुसरीकडे हिंदूंची निषेधमोहीम मात्र चिरडण्यात येते. हिंदूंनी काँग्रेसला निवडून दिलेल्या पापाची फळेच तेथील हिंदू भोगत आहेत, हे लक्षात घ्या !