Indian Polluted Cities : जगातील सर्वाधिक प्रदूषित १० शहरांमध्ये सर्वच भारतीय शहरे !

नवी देहली : भारतीय शहरांचे वायूप्रदूषण दिवसेंदिवस जीवघेणे बनत चालले आहे. अलीकडेच एका अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित १० शहरांमध्ये सर्वच शहरे भारतातील आहेत. राजस्थानमधील श्रीगंगानगर हे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले असून तेथे ‘एक्यूआय’ (एअर क्वॉलिटी इंडेक्स – हवेचा गुणवत्ता निर्देशांक) ८३० इतका नोंदला गेला आहे. पराली जाळणे (पिकांचे शिल्लक अवशेष), धुळीचे प्रमाण आणि औद्योगिक उत्सर्जन यांमुळे वायूप्रदूषण झपाट्याने वाढत आहे. हरियाणा आणि पंजाब या राज्यांमधील अनेक शहरांत हवा अत्यंत दूषित स्तरावर पोचली आहे. हरियाणातील ६ शहरे या सूचीत आहेत. यंदा देहली सर्वाधिक प्रदूषित १० शहरांच्या बाहेर राहिली असून ती १३ व्या स्थानावर आहे. ‘प्रदूषणाविषयी कठोर उपाययोजना न केल्यास भारतियांसाठी शुद्ध हवा घेणे आणखी कठीण होईल’, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.


सर्वाधिक प्रदूषित १० शहरांच्या सूचीतील शहरे

श्रीगंगानगर (राजस्थान), सिवानी (हरियाणा), अबोहर (पंजाब), चरखी दादरी (हरियाणा), हिसार (हरियाणा), सासरोली (हरियाणा), रोहतक (हरियाणा), नांगली बहरामपूर (नोएडा), चुरू (राजस्थान) आणि भिवानी (हरियाणा)

संपादकीय भूमिका

कुठे गेल्या सहस्रो वर्षांपासून पृथ्वी प्रदूषणमुक्त ठेवणारी भारतीय संस्कृती, तर कुठे अवघ्या १०० वर्षांत पृथ्वीला प्रदूषणाच्या खाईत लोटणारे आधुनिक विज्ञान !