थोडक्यात महत्त्वाचे : ११.०६.२०२६


विदर्भात २२ जूनपासून शाळा !

मुंबई – महाराष्ट्रातील शाळा १५ जून या दिवशी चालू होणार असून विदर्भातील शाळा मात्र वाढत्या उन्हाळ्यामुळे २२ जूनपासून चालू होतील, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. २२ जूनच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. याचिकेवर सुनावणीच्या पूर्वी राज्यशासनाने वरील निर्णय दिला.


३ बांगलादेशींना अटक

मुंबई – येथील पोलिसांनी ३ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्यावर याआधीही हद्दपारीची कारवाई झाली होती; मात्र त्यांनी पुन्हा भारतात अवैधरित्या प्रवेश केला. या प्रकरणी फातिमा अब्दुल रशीद उपाख्य फातिमा शांजाय शेख (वय ३२ वर्षे), लिटन मुल्ला (वय ४३ वर्षे) आणि त्याची पत्नी पापी बेगम (वय ३७ वर्षे) हिला कह्यात घेतले आहे.

संपादकीय भूमिका : अशांना हद्दपारीपेक्षा आजन्म कारागृहात डांबायला हवे !


विनयभंग करणार्‍यावर गुन्हा नोंद !

नवीन पनवेल – येथील ३४ वर्षांच्या महिलेसमवेत जातीवाचक अपशब्द वापरून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी सुदर्शन देशमुख याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका : अशांवर कठोर कारवाई कधी होणार ?


कामावरून घरी परतणार्‍या महिलेचा विनयभंग !

वसई – येथे एक महिला कामावरून घरी परत येत असतांना एका अज्ञाताने तिचा पाठलाग केला. तो तिच्या इमारतीपर्यंत पोचला. त्यानंतर त्याने महिलेला मागून स्पर्श केला, तसेच तिचा विनयभंग केला. या वेळी त्याने अश्लील कृत्यही केले. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपी अद्याप पसार आहे.

संपादकीय भूमिका : महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन अशा वासनांधांना चोप द्यायला हवा !


इलेक्ट्रिक बेस्ट बसची दोघांना धडक !

मुंबई – कांदिवलीमध्ये भरधाव वेगाने जाणार्‍या इलेक्ट्रिक बेस्ट बसने दोघांना जोरात धडक दिली. या अपघातात आदर्श हिरालाल यादव (वय २४ वर्षे) आणि सोनम मौर्य (वय २४ वर्षे) हे घायाळ झाले आहेत. बस वाहकाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती केले. सोनमचे डोके आणि पाय यांना गंभीर दुखापत झाल्याने तिला अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले. पोईसर डेपोजवळ अपघाताची घटना घडली. हा अपघात सीसीटीव्हीत चित्रीत झाला आहे. २ दिवसांपूर्वी दादर येथे इलेक्ट्रिक बेस्ट बसने ५ वाहनांना धडक दिली होती.