‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाची समीक्षा

१. चित्रपटातील महाबावळट पात्रे
या चित्रपटातील पात्रे इतकी बावळट आहेत की, त्यांना पडद्यावर पाहून आपल्याला कसेतरी होईल. या चित्रपटात एक मुलगा आणि मुलगी दाखवली आहे. मुलीचे पालक महाबावळट आहेत. आपली मुलगी घरातून रुसून गेल्यानंतर ती रात्रभर कुठे रहाते ? आणि ती काय करते ?, याविषयी तिच्या घरच्या लोकांना काहीच कल्पना नसते आणि त्यांना काही देणे-घेणेही नसते. तुळशीपत्र ठेवून सोडल्याप्रमाणे तिला सोडलेले असते.
२. कौटुंबिक मद्यपानाला प्रोत्साहन
या चित्रपटात मुलाचेही आईवडील चुकीचे दाखवले आहेत. कुठला मुलगा वडिलांसमवेत बसून मद्यपान करतो ? काही घरांमध्ये वडील आणि मुलगा दोघेही मद्यपान किंवा धुम्रपान करत असतील; पण ते एकत्र बसून कधी तसे वागत नाहीत. ही गोष्ट समाजात फार अपवादात्मक दिसते. येणार्या प्रत्येक चित्रपटात मुले वडिलांना ‘अरे तुरे’ करत असल्याचे दाखवले जाते. आईप्रमाणेच वडिलांनाही ‘अरे तुरे’ करणे, हा दोघांनाही समतुल्य आदर देण्याचा हा ‘ट्रेंड’ मराठी चित्रपटसृष्टीने प्रचलित केला असून अयोग्य आहे. काही भूमिका या केवळ आईच निभावू शकते, त्या भूमिका वडील निभावू शकत नाहीत. या चित्रपटात वडिलांसमवेत बसून मुलगा मद्यपान करतो, ही गोष्ट इतक्या वेळा दाखवली आहे की, त्यामागे काय तर्कशास्त्र आहे, हे कळत नाही.

३. एक खुळचट आणि अर्थहीन प्रसंग
या चित्रपटात मुलाचे पालक त्याच्यासाठी मुलगी शोधत असतात. विविध पार्श्वभूमी असणार्या मुलींच्या कुटुंबांना तो भेटतो; पण त्याचे लग्न काही जुळत नाही. त्याच्या अंतर्मनात त्याच्या दोन भावना (गटफिलींग) त्याच्याशीच वाद घालत असतात. त्यामुळे तो गोंधळून जातो आणि तो त्याच्या भावनांना प्रतिसाद देत असल्याने त्याचे लग्न जुळत नाही. त्याला एका मॉलमध्ये मुलगी पहायला पाठवले जाते. ती त्याला विम्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षर्या करायला सांगते आणि हा बावळट मुलगा त्वरित स्वाक्षर्याही करतो. हा ओढून ताणून विनोद निर्माण करण्याचा प्रयत्न वाटला. मराठी चित्रपट वास्तविक विनोदापासून इतके लांब गेले आहेत की, त्याविषयी बोलायलाच नको.
४. विवाह आणि कुटुंब संस्था यांविषयी तरुणांसमोर चुकीचा आदर्श ठेवणारा चित्रपट !
या चित्रपटात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्या पात्राएवढी बावळट मुलगी मी पूर्ण आयुष्यात पाहिली नाही, असे मला वाटते. ती म्हणते, ‘माझा विवाह करण्यास विरोध आहे; पण प्रेमाला नाही.’ त्यांना प्रेम हवे आहे; पण विवाह नको. येथेच खरी अडचण आहे. हा चित्रपट आताच्या पिढीसमोर काय आदर्श ठेवत आहे ? निर्मात्याने चित्रपटातून एखादा चांगला संदेश दिलाच पाहिजे, हे बंधन नाही; पण किमान ‘वोकिझम्’ला (प्रत्येक प्रस्थापित गोष्टींना विरोध करणे), तरी तुम्ही प्रोत्साहन देऊ नका. विवाह आणि कुटुंब संस्था यांवर तरी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका. मृण्मयीला प्रेम हवे; पण लग्न नको. येथे मुलीला मोकळे आणि मनाप्रमाणे वागायला आवडते. त्यामुळे लग्न केले, तर तिला घरातच रहावे लागेल, असा तिचा समज आहे. तिच्या घरी थोडाही वाद झाला की, ती टूथब्रश केसांत माळते आणि सायकलवर मित्राच्या घरी रहाण्यासाठी निघून जाते. मग सकाळी सकाळी तिचा लहान भाऊ येतो. तो तिला ‘ब्लॅकमेल’ करतो की, ती रात्रभर तिच्या मित्राच्या घरी होती, हे आईवडिलांना सांगणार नाही.
ती तिच्या होणार्या पतीला विचारते, ‘उद्या जर आपल्यात भांडण झाले, तर मी असेच ब्रश घेऊन मित्राकडे रहायला गेले, तर तुला चालेल ना ?’ जगातील कुठल्या नवर्या मुलाला हे आवडेल ? हा वेंधळटपणा करायचा आहे; म्हणून यांना लग्न नको. हा हुल्लडपणा कुठपर्यंत जगता येणार आहे ? हे तरुण वयही कधीतरी निघून जाणार आहे. लग्न म्हटले की, बंधन आणि संघर्ष आला. हे बंधन आणि संघर्षच या मुलीला नको. लग्नापासून पळपुटेपणा करण्याला सहजपणे घेतले जात आहे. नवीन नाते म्हटल्यावर बंधन, तडजोडी, त्याग आणि संघर्ष या गोष्टी येतात; म्हणून ती गोष्टच करायची नाही ?, हे योग्य नाही. असे झाले, तर तुमच्या आणि माझ्या आईवडिलांनाही हाच विचार करायला हवा होता. तेही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहिले असते तर ? बंधनात अडकायचे नसते; म्हणून लग्न किंवा कुटुंब संस्था टाळण्याचा विचार तरुण पिढी करते.
| Manache Shlok Review
(सौजन्य : City Lights Marathi) |
जन्मापासून मृत्यूपर्यंत समाजाने जीवनातील काही टप्पे निर्धारित केले आहेत. लग्नाविषयी हा जो पूर्वग्रह निर्माण करून ठेवला आहे, तो एवढा वाईट नाही. त्याच्या सकारात्मक गोष्टींविषयी कुणी बोलतच नाही. योग्य जीवनसाथी मिळाला, तर चांगले संरक्षक कवच आणि स्थैर्य मिळते. बाहेरच्या जगासमवेत लढून जेव्हा आपण घरी येतो, तेव्हा कुणीतरी घरी असते, जे आपल्याला समजून घेणार आहे. यात दुमत असू शकते की, यासाठी चांगला जीवनसाथी मिळायला हवा. जोपर्यंत चांगला जीवनसाथी मिळणार नाही, तोपर्यंत मी लग्नाचा विचार करणार नाही, असे तुम्ही म्हणू शकता; पण असे नाहीच आहे. माझ्या आयुष्यात माझे वडील, भाऊ, पती आणि मित्र आहेत. ही ४ जण चांगली माणसे आहेत. मग समाजात चांगले पुरुषच नाहीत, अशी व्याख्या का केली जाते ?, हे कळत नाही. समाज चांगला नाही, तर मित्रही बनवू नका; कारण तेही कधी कधी चुकीचे निघतातच. त्यामुळे मित्रच नाही, यामागे काही तर्कशास्त्र नाही.
या चित्रपटातील या दोन पात्रांना अडचण आहे की, लग्नापूर्वी जी सिद्धता आहे, उदा. कपडे घेणे किंवा पाहुण्यांना बोलावणे, त्यात निमंत्रितांची संख्या अधिक होते. आईवडिलांना ते अधिक होते, हे सांगता येते; पण त्यांची संख्या ८०० किंवा १२०० झाली, म्हणजे पळून जायचे आणि विनालग्नाचे रहायचे, हे काही कळत नाही. नेहमी क्षणिक विचार न करता पुढचा विचार केला पाहिजे. मग कुत्र्यांमध्ये आणि आपल्यात भेद काय राहिला ? लग्नाविषयी ज्या प्रतिक्रिया दाखवल्या आहेत, त्या संपूर्ण बावळट आणि अर्थहीन आहेत. बॉलीवूडच्या, म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीच्या प्रत्येक तिसर्या चित्रपटात लग्नाविषयी तरुण मुलांमध्ये नकारात्मक गोष्टी भरून ठेवल्या आहेत. बॉलीवूडच्या चित्रपटात लग्न आणि कुटुंब संस्था यांना दाखवल्याचे क्वचितच आढळेल. यापुढे कुठलाही मराठी चित्रपट ज्यात ‘वोकिझम’ असेल, लग्न आणि कुटुंब संस्था यांपासून नवीन पिढीला तोडण्याचा तुमचा उपक्रम असेल, तर त्या विरोधात आवाज उठवला जाईल. त्यामुळे हा चित्रपट चांगला नाही.
५. चित्रपटातील काही चांगल्या गोष्टी
या चित्रपटात ‘तू बोलना…’ हे गाणे फार सुंदर आहे. चित्रपटात दाखवलेले हिमालय, ऋषिकेश आणि त्या क्षेत्रातील निसर्गस्थळे वास्तविक वाटतात. ते पाहिल्यावर चांगले वाटते.’
लेखिका : गायत्री कुलकर्णी, समालोचक, नाशिक.
(साभार : ‘सिटी लाईट्स’ मराठी यू ट्यूब वाहिनी)
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
क्रिकेटचा उदो उदो नको !