समर्थांच्या भक्तीची शक्ती !

‘मनाचे श्लोक’ म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर येते ते श्री समर्थांचे हातात लेखणी असलेले तेजस्वी रूप ! समर्थांनी ‘दासबोध’ ग्रंथ लिहिला, तसेच मनुष्याच्या जीवनात सर्वांत महत्त्वाचे कार्य करणारे ते मन, अशा या ‘मनाचे श्लोक’ लिहून समस्त मानवजातीवर कृपा केली आहे. असे असतांना नुकताच ‘मना’चे श्लोक’ या नावाचा चित्रपट प्रसिद्ध झाला; पण चित्रपटाचे चुकीचे नाव असल्याने भक्तांच्या संघटितपणामुळे अंतिमतः निर्मात्यांना चित्रपटाचे नाव पालटणे भाग पडले. ही समर्थांचीच कृपा आहे; पण हा चित्रपट काढून निर्मात्यांनी समाजावर उपकार नव्हे; अपकार केले. चित्रपटाचे नाव ऐकून प्रथमदर्शनी कुठल्याही धार्मिक व्यक्तीला सहजच वाटते की, ‘अरे वा…समर्थांच्या मनाच्या श्लोकांवर चित्रपट काढला आहे’; पण त्याचे विज्ञापन आणि चित्रपटाचा विषय कळल्यावर भ्रमनिरास होतो. या चित्रपटाची कृती, म्हणजे समाजमन दूषित करणारी, हिंदु धर्म, संस्कृती, परंपरा यांची हानी करणारी होती. समर्थांनी मनाचा संयम राखण्यासाठी मनाचे श्लोक लिहिले आणि इथे मनाला हवे तसे अनिर्बंध जगण्यासाठी ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट काढला गेला. हा विरोधाभास आहे. परिणामी संतसाहित्याचा मोठा अवमान होण्यासह विडंबन झाले. अशा प्रकारे पैसे कमावणे, हेही महापापच आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीकडून हिंदुद्वेषाचे षड्यंत्र गेली कित्येक वर्षे चालूच आहे. त्यांना विरोध करून हिंदु धर्महानी रोखणे तर दूरच; पण मराठी दिग्दर्शक या षड्यंत्राला साहाय्य करून धर्महानी करत आहेत. म्हणतात ना ‘हिंदु धर्माचे वैरी हिंदुच.’ हेच या घटनेवरून सार्थ ठरले नाही का ? चित्रपटाच्या नावाचा चित्रपटाच्या कथेशी संबंध नव्हता. विवाहसंस्था ही कशी अयोग्य आहे आणि मनाप्रमाणे वागण्याच्या नावाखाली अधर्म कसा योग्य आहे ? हे दाखवण्याचा अट्टहास या चित्रपटातून झाला. विवाहसंस्था हे हिंदु संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. त्याच्या अभावी आज पाश्चात्त्य देशात जंगलराज झाले आहे. तसे भारतात करायचे आहे का ? वैवाहिक जीवनात संघर्ष अवश्य आहे; परंतु अनिर्बंध जीवनात त्याहून अधिक संघर्ष आणि दुःख आहे. वैवाहिक जीवनातील सर्व प्रकारची सुरक्षा, आधार, प्रेम आदी लाभ सांगणारा आणि त्यातील संघर्षावर मनाने कशी मात करायची ? हे सांगणारा चित्रपट काढला असता, तर तरुण पिढीला दिशा मिळाली असती. असे चंगळवादी विचारसरणीचे चित्रपट निर्माण करतांना अशा प्रकारे सर्व समाज वागला, तर काय अराजक निर्माण होईल ? याचा थोडा तरी विचार निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते आणि अभिनेत्री अशा संबंधितांनी केला का ? म्हणून मनाला संयम घालणार्‍या समर्थ रामदासस्वामी यांच्या ‘मनाच्या श्लोकां’चे मनन, चिंतन करण्यासह योग्य ते प्रायश्चित्त त्यांनी घेतले पाहिजे !

– सौ. गौरी वैभव आफळे, फोंडा, गोवा.