देववाणी संस्कृतचे अद्वितीयत्व !

१. भारताची विशालता
‘सूत ऋषींच्या वचनानुसार आपला संपूर्ण देश कन्याकुमारीपासून मानससरोवरापर्यंत आणि सिंधूपासून ब्रह्मपुत्रेपर्यंत असा अत्यंत विशाल भूप्रदेश आहे. तो पवित्र मंदिरे, क्षेत्रे, नगरे आणि संस्कृत यांचा अमूल्य ठेवा आहे.
२. भारताला अधःपतनातून वाचवण्याकरता संस्कृत आणि संस्कृतपणा अपरिहार्य !
गणित, शास्त्र, इंग्रजी, इतिहास इत्यादी विषयाने आपण पदव्युत्तर पदवी संपादू शकाल आणि तरीसुद्धा जसे तुमचे स्वैर उधळलेले मन सांगेल, तसे पशुवत वागूही शकाल ! परंतु संस्कृतच्या अध्ययनात कर्मविपाक (कृतीची फलश्रुती) आणि सभ्यता आहे, तसेच पापाकरता नरकसुद्धा आहे. संस्कृतचे अध्ययन करणारा पापीसुद्धा शुद्ध होतो. संस्कृतमध्ये सर्व शाश्वत तत्त्वे आहेत. शास्त्रीय सत्ये आहेत. जे विवाहादी विधीतील मंत्र सर्व भारतभर प्रचलित आहेत, ते आमच्या सनातन शास्त्रातून आले आणि ते संस्कृतातूनच आहेत. सर्वश्रेष्ठ वाङ्मय संस्कृतमध्ये आहे. विशुद्ध चरित्राची बांधणी संस्कृतच करते. आधुनिक जगाच्या पातकाला आणि पाशवी आचरणाला दूर सारण्याकरता अन् भारताला अधःपतनातून वाचवण्याकरता संस्कृत आणि संस्कृतपणा अपरिहार्य आहे !
३. स्वरूप न पालटणारी संस्कृत भाषा !
जगात जितक्या संस्कृतेतर भाषा आहेत, त्या सर्वच भाषा १०० – २०० वर्षांत रूपांतरित होतात. त्या भाषांमध्ये इतका पालट होतो की, त्यांच्यातील जुने लेखन दुर्बोध होते. संस्कृतमध्ये असे कधीच होत नाही; कारण संस्कृत ही देव आणि वेद यांच्याशी निगडित आहे; म्हणूनच कुणीही मानव तिचे स्वरूप पालटू शकत नाही.

४. देववाणी संस्कृत
देवाद्याः संस्कृतं प्राहुः प्राकृतं किन्नरादयः ।
पैशाच्यथ पिशाचाद्या मागधं हीनजातयः ।। – सरस्वती कण्ठाभरण, परिच्छेद २, श्लोक ९
अर्थ : देवादिक संस्कृत बोलतात, किन्नरादिक प्राकृत बोलतात, पिशाच्च पैशाची भाषा बोलतात आणि हीन जातीचे लोक मागधी भाषा (मगध म्हणजे आजच्या बिहार राज्यातील प्राचीन भाषा) बोलतात.
हे शास्त्रप्रमाण आहे. त्यात मानवांना आपल्या इच्छेप्रमाणे कोणताही पालट करता येणार नाही.
५. विलक्षण प्रभावी, रमणीय, सुनिष्पन्न, प्राणस्पर्शी, सूक्ष्म आणि सर्वश्रेष्ठ अशी संस्कृत भाषा !
संस्कृत भाषा ही विलक्षण प्रभावी आणि पवित्र आहे. सर्व त्रैलोक्य हे संस्कृत भाषेचे क्षेत्र आहे. संस्कृतमुळे त्रैलोक्यात त्या प्रमाणात पावित्र्य रहाते. संस्कृत ही कोणतीही भावना सहज व्यक्त करणारी सुंदर भाषा आहे. ती सगळ्या भाषांची जननी देववाणी आहे. संस्कृत तर भारताचे हृदय आहे. भारताचे अंतःकरण संस्कृतमधून भरभरून वहाते आहे. देव संस्कृत भाषेतून बोलतात, हनुमंत संस्कृतमधून प्रभु श्रीरामाशी बोलला. सीतेशी परिचय झाल्यानंतर हनुमंत तिच्याशीही संस्कृतमधून बोलला. संस्कृतविना भारताच्या परंपरा, प्रथा आणि संस्कृती यांमध्ये प्रवेश होणे अशक्यच ! अपौरुषेय वेद संस्कृतमध्येच आहेत. पुराणे, श्रुति, स्मृति इत्यादी सर्व जाणण्यासाठी संस्कृत हीच गुरुकिल्ली आहे. विश्व वाङ्मयात संस्कृत हे सर्वश्रेष्ठ रत्न आहे. विश्वातील सगळेच तज्ञजन तसा निर्णय देतात. व्याकरण आणि ध्वनीशास्त्र यादृष्टीने विश्वातील कोणतीच भाषा संस्कृत इतकी उन्नत नाही. अत्यंत प्राचीन आणि अतीउच्च कोटीची रचना इथे आहे.
संस्कृत स्वयंमेव गुणसंपन्न आहे. उत्कर्ष पावित्र्याचे प्राचुर्य (विपुल प्रमाणात) आहे. संस्कृत स्वयंमेव शक्तीशालिनी आहे, तिथेच सारतत्त्व आहे. सौंदर्यात ओज आहे, रचनाशिल्पात कौशल्य आहे. वाणीत वैभव आणि औचित्यात आकर्षण आहे. भावना क्षेत्रात उदात्तता आहे. विश्वाच्या महावाङ्मयात संस्कृत अत्यंत स्वच्छ आणि स्पष्टपणे अग्रणी आहे. संस्कृत भाषा मधुर, रमणीय, सुनिष्पन्न, प्राणस्पर्शी आणि सूक्ष्म आहे. ती अत्यंत सुलभ आहे.

६. संस्कृतची मौखिक परंपरा आणि वेदरक्षण
मानवाप्रमाणे देवतांनाही वाणीचा व्यवहार आहे.‘ निरुक्त’ (म्हणजे यास्क ऋषींनी लिहिलेला ग्रंथ) सांगते,
‘तेषां मनुष्यवत् देवताभिधानम् ।’ (निरुक्त, अध्याय १, खंड २) म्हणजे ‘(संस्कृत) शब्दांचा जो अर्थ मनुष्यांमध्ये होतो, तोच अर्थ देवतांमध्येही होतो.’
व्यासादी अधिकारी महापुरुषांचे देवतांशी संभाषण होत होते. मानव आणि देव यांचे वेदादि देवभाषा संस्कृतमधून संभाषण व्हायचे. रामायण, महाभारत, पुराणात तसे असंख्य निर्देश आहेत; म्हणून संस्कृतला ‘देववाणी’ म्हणतात. प्रथम सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाने त्याच्या अत्रि, गौतमादी मानसपुत्रांना संस्कृत भाषा शिकवली. शिक्षण (उच्चारशास्त्र) हे वेदांग आहे. शास्त्रशुद्ध वर्णोच्चार कसे करायचे ? हे सृष्टीकर्त्याने शिकवले. वर्णोच्चार तसेच कसे करायचे ? हे सृष्टीकर्त्याने शिकवले. तशीच वर्णोच्चाराची शुद्धता आजही वेदपठण आणि वेदाध्ययन करणार्या वैदिकांची आहे. वैदिकांची सर्वच वाङ्मयात शुद्धता आहे. ऋषींना शास्त्रार्थांचे प्रतिभाज्ञान प्राप्त करून घेण्याकरता प्रथम शास्त्रानुष्ठान करून ऋषीत्व प्राप्त करून घ्यावे लागले. संस्कृत देवभाषा असल्याने शुद्ध वर्णोच्चारण झाले, तर देवभाव प्राप्त होतो. संस्कृत वर्णाच्या शुद्धतेने सदैव रक्षण व्हावे; म्हणून शिक्षणशास्त्राचा (उच्चारशास्त्राचा) प्रचंड विस्तार झाला. शुद्ध वर्णोच्चाराविना वेदरक्षण शक्य नाही.
७. संस्कृत आणि संस्कृती यांचे रक्षण ब्राह्मण अन् ऋषिमुनी यांनी करणे
ब्राह्मण हा संस्कृती रक्षक आहे. तो सनातन हिंदूंच्या सर्व शास्त्रांचा व्यवहार आणि आचार यांचा रक्षक आहे. तो समाजाचा श्रेष्ठ असा निरपवाद रक्षक आहे; म्हणून वेदरक्षणाकरता ब्राह्मणाला ‘म्लेंच्छ’ (अपभ्रष्ट आणि परकीय भाषा बोलणारे, वेदविरोधी किंवा असंस्कृत लोकांच्या) संपर्कापासून दूर केले. ‘ब्राह्मणाने म्लेंच्छ भाषा बोलू नये, ऐकू नये’, असे नियम केले. त्याला शहरापासून दूर ग्रामांमध्ये अग्रहार (दान) देऊन त्याच्या उपजीविकेची व्यवस्था केली. आचार्य आणि शिष्यवर्ग यांच्याविना त्यांना जनसंपर्क अत्यावश्यक तेवढाच ठेवला. या ब्राह्मणांची एकमेव जीवनशैली आणि तपश्चर्या यांमुळे ब्रह्मदेवाने जसे संस्कृत वाणीचे उच्चारण केले, तसेच आजवर शुद्ध स्वरूपात राहिले आहे.
जगातील कोणतीही भाषा २०० – ३०० वर्षांत इतकी भ्रष्ट होते की, मूळची भाषा समजू शकत नाही. ७०० वर्षांपूर्वीची मराठी ‘ज्ञानेश्वरी’ आज वाचायची, म्हणजे ज्ञानेश्वरीचा कोश घेऊनच अभ्यासता येते. वेदाला अपेक्षित असणारे शुद्ध वर्णोच्चारण कुणीही अर्वाक्दृष्टी (असुरस्वभावी) पुरुष करू शकत नाही. संस्कृत जशीच्या तशी राखण्याच्या किमयेच्या मागे ऋषिमुनी आणि ब्राह्मण वर्गाची एकांतातील अखंड तपश्चर्या हेच एक रहस्य आहे.’
८. जगातील सर्वाधिक प्राचीनतम ऋग्वेदादी वेद हे संस्कृतमध्ये आहेत.

९. संस्कृतप्रमाणे वाणी शुद्ध हवी ! वाणीने आणि शुद्ध स्पष्ट वर्णोच्चाराने सात्त्विक भावाचा उत्कर्ष होतो. वाणी अशुद्ध असेल, तर सात्त्विक, राजस आणि तामस भाव त्या त्या प्रमाणात प्राप्त होतो.’
१०. संस्कृतच्या पुनःश्च आगमनासाठी करावयाचे प्रयत्न
संस्कृत भाषा आणि सांस्कृतिक विद्या यांची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यासाठी सर्व बाजूंनी, सर्व स्तरांवर अथक प्रयत्न सातत्याने काही काळ करावे लागतील.
अ. संस्कृतला राजमान्यता मिळवावी लागेल.
आ. संस्कृत शिकवणारे शिक्षक आधी सिद्ध करावे लागतील.
इ. शिशु विहारापासूनच मातृभाषेसह संस्कृतचे शिक्षण चालू करावे लागेल.
ई. भारतातील प्रत्येक प्राकृत भाषा अधिकाधिक संस्कृतनिष्ठ होईल, यासाठी प्रयत्न करावा लागेल.
उ. ‘संस्कृत बोलीभाषा व्हावी’, असा निकराचा प्रयत्न करावा लागेल, म्हणजे व्याकरण बाजूला सारून संस्कृत संभाषण करता यावे, अशा योजना आखाव्या लागतील. त्यासाठी छोटी छोटी पुस्तके प्रसिद्ध करावी लागतील. शिबिरे भरवावी लागतील.
ऊ. भारतात पूर्वी तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, मैथिली अशी विद्यापिठे होती. त्यांच्याच धर्तीवर वैज्ञानिक प्रगतीसुद्धा संस्कृत माध्यमातूनच जपली जाईल.

११. संगणकासाठी असलेले संस्कृतचे सामर्थ्य आणि माहात्म्य
आजच्या जगाने संस्कृतचे सामर्थ्य आणि माहात्म्य ओळखले आहे. संगणक शास्त्रज्ञ हे अशा भाषेच्या शोधात होते की, जिचा माध्यम म्हणून वापर करून जगातील कोणत्याही ८ भाषांत तत्क्षणीच रूपांतर करता येईल आणि त्यांना तशी संस्कृत भाषा आढळली. तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. रिक ब्रिग्जसारखे श्रेष्ठ संगणक शास्त्रज्ञ हे तर श्रेष्ठ व्याकरणकार पाणिनीची ती अद्भुत प्रतिभा, प्रज्ञा आणि ज्ञान पाहून स्तिमित झाले.
१२. संस्कृत भाषेतून अन्य भाषांचा उगम होणे
अनुमाने २५० वर्षांपूर्वी बंगालवर इंग्रजांचे अधिपत्य होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सर विल्यम् जोन्स यांनी प्राचीन ग्रीक, लॅटिन, फारशी आणि संस्कृत या भाषांचा अभ्यास केला. या चारही भाषांमध्ये त्यांना कमालीचे साम्य आढळले. त्यांनी तुलनात्मक भाषाशास्त्रांचा अभ्यास चालू केला.’
१३. विश्व वाङ्मयातील सर्वश्रेष्ठ रत्न म्हणजे संस्कृत !
‘संस्कृतविना भारताच्या परंपरा, प्रथा आणि संस्कृतीत प्रवेश होणे अशक्यच आहे. अपौरुषेय वेद संस्कृतमध्येच आहेत. पुराणे, श्रुति, स्मृति इत्यादी सर्व जाणण्यासाठी संस्कृत हीच गुरुकिल्ली आहे. विश्व वाङ्मयातील संस्कृत हे सर्वश्रेष्ठ रत्न आहे. विश्वातील सगळेच तज्ञजन तसा निर्णय देतात. व्याकरण आणि ध्वनीशास्त्र यांच्या दृष्टीने विश्वातील कोणतीच भाषा संस्कृत इतकी उन्नत नाही. अत्यंत प्राचीन, अतीउच्च कोटीची रचना इथे आहे. स्वयंमेव गुणसंपन्न आहे. उत्कर्ष पावित्र्याचे प्राचुर्य (विपुल प्रमाण) आहे. संस्कृत स्वयंमेव शक्तीशालिनी आहे, तिथेच सारतत्त्व आहे. सौंदर्यात ओज आहे, रचनाशिल्पात कौशल्य आहे. वाणीत वैभव आहे, औचित्यात आकर्षण आहे. भावनाक्षेत्रात उदात्तता आहे. विश्वाच्या महावाङ्मयात अत्यंत स्वच्छ आणि स्पष्टपणे अग्रणी आहे. संस्कृत युगपद भव्य आहे, मधुर आहे, रमणीय आहे, सुनिष्पन्न आहे, प्राणस्पर्शी आहे, सूक्ष्म आहे. अत्यंत सुलभ आहे.’
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : ग्रंथ ‘देववाणी संस्कृत’)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !