कबुतरांमुळे होणारी हानी आणि त्यावरील उपाय

वाढत्या लोकसंख्येमुळे बैठी घरे पाडून शहरात मोठमोठ्या इमारती बनवल्या जात आहेत. या इमारतींना कट्टे, व्हरांडा, विजेच्या तारा, ‘इंटरनेट केबल्स’, त्याचे पाईप, केबल वाहिन्या यांसाठी ‘डक्ट’ (मार्ग) बनवले जातात, तसेच वातानुकूलित यंत्राचा पंखा घराबाहेर बसवला जातो. अशा या वेगवेगळ्या जागा कबुतरांना रहायला उपलब्ध होतात. काही ज्योतिषीही कबुतरांना दाणे घालण्याचा सल्ला देतात. ‘चांगले कर्म होते, आध्यात्मिक लाभ होतो किंवा पितरांना अन्न पोचून जीवनातील समस्या दूर होतात’, या धारणांमुळे काही ठिकाणी लोक कबुतरांना दाणे घालतात. या कारणांमुळे अलीकडे कबुतरांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे, जी पर्यावरण आणि मनुष्याचे आरोग्य या दोन्हींसाठी हानीकारक आहे. सध्या चिमण्यांची संख्या न्यून होण्याचे एक कारण म्हणजे कबुतर ! 

१. मानवाला काय हानी होते ? 

अ. घरांचे छप्पर, खिडक्या, व्हरांडे यांच्या वरच्या भागात कबुतरे स्थायिक होतात आणि घरटीही बनवतात. यामुळे सगळीकडे अस्वच्छता पसरते. ती रहातात, तिथे त्यांची विष्ठा पडते. ही विष्ठा सुकल्यावर वार्‍यामुळे धुळीसह घरात येते. या धुळीत जे जंतू असतात, ते शरिराला हानीकारक असतात.

कबुतरांच्या विष्ठेमुळे फुप्फुसाचे विकार होतात. विष्ठेतून ‘अल्लर्जेन’ (ॲलर्जी निर्माण करणारे पदार्थ) सिद्ध झाल्यामुळे काहींना सतत शिंका, खोकला आणि सर्दी होते. ज्यांना मुळातच दम्याचा आजार आहे, त्यांच्या आजारात वाढ होते. ज्यांची प्रतिकार शक्ती अल्प आहे, त्यांना ‘हिस्टोप्लासमोसिस’ हा बुरशीजन्य विकार होण्याची शक्यता असते. आरंभी खोकला, ताप येऊ शकतो आणि गंभीर स्थितीत अशक्तपणा, वजन कमी होणे, सतत धाप लागणे ही लक्षणे दिसून येतात.

फुफ्फुसात ‘फायब्रोसिस’ (श्वसनासंबंधी विकार) आजार होऊ शकतो, ज्यामुळे फुप्फुस्यांची लवचिकता न्यून होते. फुप्फुसे फुग्यासारखी असतात. त्यात चांगल्या प्रकारे प्राणवायू गेल्यावर ती फुलतात आणि शरिराला रक्तातून प्राणवायू पुरवतात. ‘फायब्रोसिस’ झाल्यावर ही प्रक्रिया न्यून होते आणि फुफ्फुसे निकामी होतात. ही स्थिती उलट करता येत नाही. शेवटी रुग्णाचे श्वसनाचे कार्य न्यून होते. रुग्णाला सतत धाप लागते आणि कृत्रिमरित्या प्राणवायू (ऑक्सिजन) घ्यावा लागतो. कालांतराने फुप्फुसांचे कार्य पूर्णपणे बंद पडते.

आ. कबुतरांच्या विष्ठेमुळे घरातील धातूचे पाईप, रंगकाम आदी खराब होते, तसेच ‘ड्रेनेज पाईप’ तुंबतात. कबुतरांच्या सततच्या आवाजाने घरात रहाणार्‍यांना त्रास होऊ शकतो.

डॉ. (सौ.) लिंदा बोरकर

२. हानी टाळण्यासाठी उपाय 

अ. कबुतरांना अन्न आणि दाणे घालणे टाळावे. भगवंताने प्रत्येक प्राण्याची पोटापाण्याची सोय करून दिलेली असते. मानवाने ‘आपण प्राण्यांचे रक्षक आहोत आणि आपल्यामुळे त्यांना जगता येते’, ही धारणा बाळगू नये. निसर्गाने त्यांना अन्नासाठी स्वतः शोध घेण्याची कुवत दिलेली असते.

आ. आपण कबुतरांना दाणे खायला घालून स्वतःच्या स्वार्थापोटी समाजाचीही हानी करतो, याची जाणीव व्हायला पाहिजे. या चुकीचे आपल्याला पाप लागू शकते.

इ. कबुतरे घराभोवती येऊ नये; म्हणून नेट (जाळी बांधणे), काटेरी भाग लावणे आदी घालू शकतो.

ई. थेट हाताने कबुतरांची घाण स्वच्छ न करता मुखपट्टी लावून आणि हातमोजे (ग्लोव्हज) घालून स्वच्छता करावी.

उ. स्थानिक महानगरपालिकेने जनजागृती मोहीम चालू करावी. त्याही पुढे जाऊन कबुतरांना खाऊ घालणार्‍यांना आर्थिक दंड करण्याची व्यवस्था करावी. जागरूक नागरिकांनी कबुतरांना अन्न घालण्यात येणारी सार्वजनिक ठिकाणे महानगरपालिकेला कळवावी, जेणेकरून पालिका त्या विरोधात योग्य ती कार्यवाही करू शकेल.

– डॉ. (सौ.) लिंदा बोरकर, फोंडा, गोवा  (२.१०.२०२५)