संपादकीय : विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची !

(अर्थ : जो भगवंताच्या नामाविषयी शंका घेतो, त्याच्या मनात तर्कवितर्क उठतात आणि त्यामुळे त्याला नरकाची प्राप्ती होते)

‘मनाचे श्लोक’ आगामी मराठी चित्रपट

अलीकडच्या काळात चित्रपटाला प्रसिद्धी मिळण्यासाठी २ मार्ग सहसा पहायला मिळतात. एक म्हणजे जुन्या गाजलेल्या चित्रपटांचा ‘सिक्वेल’ करणे (जुन्या नावानेच नव्या चित्रपटाचे पुढचे पुढचे भाग प्रदर्शित करणे) आणि दुसरे म्हणजे हिंदु देवतांच्या किंवा श्रद्धास्थानांच्या नावांचा वापर करणे. ‘मनाचे श्लोक’ हा आगामी मराठी चित्रपटही याच पठडीतला. देवतांचा किंवा त्यांच्या नावांचा वापर करतांना त्याची मानमर्यादा पाळण्याचे साधे सौजन्य दिग्दर्शकांची टोळी कधी दाखवतांना दिसत नाही. ‘पीके’, ‘काली’, ‘ओ माय गॉड’, अशा असंख्य चित्रपटांची नावे सांगता येतील, ज्यांमध्ये केवळ हिंदु देवतांची टिंगलटवाळी करण्यात आली आहे. आतापर्यंत हिंदी चित्रपटापर्यंत मर्यादित असलेल्या हिंदु देवतांच्या टिंगलटवाळीने अलीकडच्या काळात मराठी चित्रपटांतही शिरकाव केला आहे. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘गुरुपौर्णिमा’ नावाचा मराठी चित्रपटही अशाच टुकार कथेवर आधारित होता, ज्याचा खर्‍या गुरुपौर्णिमेशी काडीमात्र संबंध नव्हता. आता ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ट्रेलर’वरूनही (चित्रपटाचा संक्षिप्त भाग दाखवणार्‍या विज्ञापनावरूनही) हा चित्रपट विवाह जुळवण्याच्या एका कौटुंबिक कथेवर आधारित असल्याचे दिसून येते. या चित्रपटातील नायकाचे नाव ‘श्लोक’ असून त्याच्या मनातील विवाहाविषयीच्या विचारांचे प्रतिबिंब म्हणून या चित्रपटाला ‘मनाचे श्लोक’ असे नाव देण्यात आले आहे. चित्रपटातील कथेचा आणि समर्थ रामदासस्वामींच्या ‘मनाच्या श्लोका’चा अर्थाअर्थी संबंध नाही, हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनीच या ‘ट्रेलर’द्वारे दाखवून दिले, ते बरे झाले. समर्थांनी ‘मनाच्या श्लोका’त म्हटल्याप्रमाणे ‘विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची’, हे सर्वच चित्रपट दिग्दर्शकांनी लक्षात ठेवले पाहिजे.

१० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाला ‘श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड’, समर्थभक्त, तसेच समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. हे नाव न पालटल्यास जनआंदोलन करण्याची चेतावणी ‘श्री समर्थ सेवा मंडळा’ने दिली आहे. हिंदूंनी नेहमीप्रमाणे या चित्रपटाच्या विरोधात दिग्दर्शक, तसेच केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ यांना निवेदने दिली आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत हिंदूंचा विरोध वाढत जाईल, असे चित्र आहे. यावर पोलीस तक्रारी, चित्रपटगृहांना पोलीस संरक्षण, कलाकारांना संरक्षण, हिंदुत्वनिष्ठांना नोटिसा, असा या आंदोलनाचा ठरलेला प्रवास असतो. हिंदूंचा मोठा विरोध झालाच, तर चित्रपटातील १-२ फुटकळ संवाद काढून हिंदूंच्या तोंडाला पाने पुसली जातात. हा सर्व घटनाक्रम म्हणजे अशा चित्रपटाच्या पडद्यामागचे कथानक असते आणि येनकेन प्रकारेण चित्रपटाला प्रसिद्धी मिळवणे, हे त्याचे उद्दिष्ट असते, हे लक्षात घेतले पाहिजे. चित्रपटाला बराच विरोध झाल्यावर ‘निदान या चित्रपटात आहे तरी काय ?’, या ‘जिज्ञासे’ने चित्रपट पहायला जाणार्‍यांची संख्या आपल्याकडे लक्षणीय आहे. अशा लोकांमुळे दिग्दर्शकांचे खिसे भरतात आणि दिग्दर्शकांचे चित्रपटांना अशी नावे देण्याचे इप्सित साध्य होते; कारण एरव्ही ‘अशा कथांना कुणी भीक घालत नाही’, हे प्रेक्षकांपेक्षा दिग्दर्शकालाच अधिक चांगल्या प्रकारे ठाऊक असते.

हिंदूंविरुद्धचे वैचारिक युद्धातील शस्त्र !

केवळ पैशांसाठीच असे केले जाते असे नाही, तर त्यामागेही बरेच ‘अदृश्य हात आणि डोकी’ कार्यरत असतात. हे अदृश्य हात आणि डोकी यांनी हिंदु धर्म संपवण्याचा विडा उचललेला असतो. ते अशा ‘दृश्य हात आणि डोकी’वाल्यांचा वापर करून स्वतःचे इप्सित साध्य करतात. बॉलीवूड चित्रपटसृष्टी आणि कुख्यात आतंकवादी दाऊद यांच्यामधील ‘मधूर’ संबंधांचे शेकडो दाखले म्हणूनच ऐकायला मिळतात. त्यातच भरीस भर म्हणून अशा वेळी व्यक्तीस्वातंत्र्यवाली टोळी हिंदुविरोधी आरडाओरड करण्याची संधी साधते. या सर्वांवर केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ हिंदूंच्या भावनांचा जराही विचार न करता ‘सरकारी शिक्का’ मारून मोकळे होते. पुढे पोलीस-प्रशासन याच सरकारी शिक्क्याचा आधार घेऊन हिंदूंनाच आरोपी ठरवतात. यावरून हिंदूंची मुस्कटदाबी किती पद्धतशीरपणे केली जाते ? हे लक्षात येते. ख्रिस्ती किंवा मुसलमान यांच्या धर्मश्रद्धांच्या संदर्भात मात्र कधी असे प्रकार घडतांना दिसत नाहीत आणि कुणी तसा प्रयत्न केलाच, तर त्या चित्रपटावर थेट बंदीच घातली जाते. ख्रिस्त्यांच्या धर्मश्रद्धांचा अवमान केल्यामुळे देशभर बंदी घातलेला ‘द दा विंची कोड’ हा चित्रपट याचे उत्तम उदाहरण आहे. हिंदूंचा उपहास येथेच थांबतो असे नाही. सलमान खान प्रत्येक वर्षी हमखास ‘ईद’च्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करून हिंदूंना एकप्रकारे खिजवतो, तर दुसरीकडे टुकार मराठी कलाकार हिंदूंच्या सणासुदीच्या तोंडावर हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणारे चित्रपट प्रदर्शित करून हिंदूंना डिवचतात. त्यामुळे हिंदूंना चोहोबाजूंंनी वेढणारे हे षड्यंत्र हिंदूंनी प्रथम नीट समजून घेतले पाहिजे. यावरून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, ती म्हणजे आता चित्रपट हे करमणुकीचे माध्यम राहिलेले नाही, तर हिंदूंविरुद्ध वैचारिक युद्धातील शस्त्र बनले आहे.

विडंबन रोखण्याचे उपाय काय ?

‘मग यावर उपाय काय ?’, असा प्रश्न हिंदूंना पडू शकतो. यावर निश्चित उपाय आहेत. चित्रपटात होणारी हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची टिंगलटवाळी रोखण्यासाठी सर्वप्रथम प्रभावी अन् कठोर कायदा असण्याची नितांत आवश्यकता आहे. खरेतर भाजप सरकार सत्तेत येऊन ११ वर्षे होऊन गेली, तरी असा कायदा न होणे, हे अत्यंत खेदजनक आहे. त्यामुळे आतातरी असा कायदा करण्यासाठी हिंदूंनी सरकारला भाग पाडले पाहिजे. केवळ कायदा करून न थांबता असे खटले चालवण्यासाठी जलद गती न्यायालयांची स्थापनाही केली पाहिजे. दुसरे म्हणजे हिंदूंच्या धार्मिक गोष्टींच्या संदर्भात किंवा देवतांच्या नावांवरून चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी हिंदूंचे धर्माचार्य आणि संत यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे अन् त्यानुसार चित्रपटात विनाअट पालट केले पाहिजेत. तिसरे म्हणजे धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी नेहमी संघटितच असले पाहिजे. यासह त्यांनी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्थाही केली पाहिजे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यानेच हिंदु दिग्दर्शक असे चित्रपट प्रदर्शित करतात आणि हिंदू ते पहातात. त्यांना धर्मशिक्षण दिल्यास त्यांच्यातील धर्माभिमान वाढून ते अशा गोष्टींपासून परावृत्त होतील. शेवटचे म्हणजे हिंदूंनी अशा चित्रपटांवर बहिष्कार घालायला शिकले पाहिजे, तरच हिंदुविरोधी दिग्दर्शक ताळ्यावर येऊ शकतील. संजीवनी देणार्‍या ग्रंथाचा अपप्रचार करणे, ही कुप्रवृत्ती आणि रोखणे, ही समर्थभक्ती !

। जय जय रघुवीर समर्थ ।

चित्रपट हे आता करमणुकीचे माध्यम नव्हे, तर हिंदूंविरुद्ध वैचारिक युद्धातील शस्त्र बनले आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !