संपादकीय : दैवी स्वरसाज हरपला !

श्रीमती सुमन कल्याणपूर

भारतीय संगीताच्या सुवर्णयुगात, म्हणजे १९६०-७० च्या दशकात मराठी गानविश्वात आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवणार्‍या ‘लता’ आणि ‘आशा’ यांच्या तोडीस तोड ठरावा, असा आणखी एक दैवी आवाज ३१ मे या दिवशी या पृथ्वीतलावरून लोपला. श्रीमती सुमन कल्याणपूर यांच्या निधनानंतरची वृत्ते वाचून अनेक संगीतरसिकांना हे लक्षात आले, ‘…अरे हे गाणे सुमनताईंचे होते’; कारण त्यांच्या आणि गानसम्राज्ञी लतादीदी यांच्या आवाजात इतके साम्य होते की, त्यांनी गायलेली कित्येक गाणी ही लतादीदींचीच आहेत, असेच अनेक जण समजत होते. त्यामुळेच त्यांना ‘दुसरी लता’ म्हटले गेले. लतादीदी आणि आशाताई या दोन दैवी स्वरतारकांच्या समकालीन असूनही तेवढ्याच जोरकसपणे सुमनताईंच्या स्वतंत्र अस्तित्वाची नोंद रसिकांना आजपर्यंत वारंवार घ्यावी लागली, यातच त्यांचे मोठेपण सामावले आहे.

सालस आणि सात्त्विक व्यक्तीमत्त्व !

सुमन कल्याणपूर यांचे व्यक्तीमत्त्वही दैवी होते, याची अनेक उदाहरणे लक्षात येतात. ‘विद्या विनयेन शोभते’ (म्हणजे नम्रता असणार्‍यांकडे विद्या शोभून दिसते.) त्याप्रमाणे कलाकाराकडे निगर्वीपणा असेल, तर तो समाजाच्या मनात अधिक ठसतो, सर्वांना जवळचा वाटतो. सुमनताईंचे हे एक वैशिष्ट्य होते. लतादीदींशी त्यांची नेहमीच तुलना झाली आणि पत्रकार त्यांना त्याविषयी काही नकारात्मक प्रश्नही सतत विचारत; परंतु सुमनताई कधीही तुलना, स्पर्धा, ईर्ष्या आदींच्या आहारी गेल्या नाहीत; कारण पत्रकारांना कधी त्यांनी त्या विषयावर रेंगाळू दिले नाही. हेच त्यांच्या सालस आणि सुसंस्कारी स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. हीच मनाची शुद्धता त्यांच्या मुखावर झळकली आणि तीच त्यांच्या अलौकिक दैवी आवाजातून रसिकांपर्यंत पोचली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रचंड प्रसिद्धीवलयाच्या हिंदी, मराठी गानविश्वात तेथील मायाजालाचा स्पर्शही होऊ न देता, त्यापासून अलिप्त राहून रसिकांना उत्तमोत्तम स्वरसाज प्रदान करणार्‍या सुमनताई ‘रंगात रंगूनी सार्‍या रंग माझा वेगळा’ याप्रमाणे राहिल्या, असेच म्हणावे लागेल.

संगीतकार आणि गायक यांच्या तारा जुळल्या, तर अजरामर वाटाव्यात अशा संगीत कलाकृतींची निर्मिती होऊ शकते. त्याप्रमाणे ‘सुमनताईंचे मन त्यांना स्वरबद्ध करणार्‍या संगीतकारांशी एकरूप झालेले असायचे’, असे वाटते. त्यात सुधीर फडके, यशवंत देव, कमलाकर भागवत, दशरथ पुजारी यांच्यापासून नौशाद, शंकर जयकिशन, कल्याणजी आनंदजी, आर्.डी. बर्मन आणि लक्ष्मीकांत प्यारेलालपर्यंत अनेक जण होते. त्यांचे ‘सुमन सुगंध’ हे चरित्र लिहिणार्‍या आणि गानविश्वातून अलिप्त झाल्यावरही कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांची भेट घालून देऊन त्यांचा उत्साह परत मिळवून देणार्‍या प्रसिद्ध निवेदिका सौ. मंगला खाडीलकर लिहितात, ‘त्या सुखाने, समाधानाने आणि सात्त्विकतेने भरभरून जगल्या.’ यातील ‘सात्त्विकते’ने हा पैलू अतिशय महत्त्वाचा आणि त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील आध्यात्मिक अंग दर्शवणारा आहे. त्या अत्यंत सोज्वळ, शालीन, सुस्वभावी आणि मीतभाषी होत्या. त्यांचे आयुष्य स्वच्छ आणि पारदर्शी होते. माधुर्य आणि कोमलता हे त्यांच्या स्वरांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यांच्या निर्मळ व्यक्तीमत्त्वानेच त्यांना दिलेली ती दैवी देणगी होती, असे लक्षात येते. त्यांनी लावलेली झाडे नेहमीच बहरत. चित्रकलेतही त्यांना उत्तम जाण होती. केवळ अपार गोडवाच नव्हे, तर आर्जव, तळमळ, आत्मीयता, आपुलकी आणि मुख्य म्हणजे एक प्रकारची प्रगल्भता त्यांच्या स्वरांमध्ये होती अन् तिनेच रसिकश्रोत्यांच्या अंतरंगाचा ठाव घेतला. ‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे’ या आध्यात्मिक गाण्यात जशी ती दिसली, तेवढीच ती त्यांच्या प्रेमगीतांतही दिसली. त्यांची युगुलगीते ऐकतांना कधी छछोरपणा वाटला नाही, याला कारण तो काळ तर होताच; परंतु त्यांच्या स्वरातील अंतर्मुखता हेही त्यामागील एक कारण होते. इतकेच काय ‘उठा उठा चिऊताई’ यांसारख्या ज्या बालगीतांसाठी त्या प्रसिद्ध झाल्या, तशा सर्व बालगीतांमध्ये आणि त्यांच्या प्रसिद्ध ‘निंबोणीच्या झाडामागे’ यांसारख्या अंगाईगीतामध्येही एक प्रकारची दर्जेदार आणि इतरांना अंतर्मुख करणारी स्वरप्रगल्भता आहे. ‘जिथे सागरा धरणी मिळते’सारख्या विरहगीतांमध्ये तर ती प्रकर्षाने जाणवलीच. संगीतातील सर्व प्रकार तेवढ्याच ताकदीने गाता येणार्‍या हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच गायक कलाकार असतात, त्यांपैकी त्या एक होत्या. गझल, ठुमरी, भावगीते, प्रेमगीते आणि भक्तीगीते सर्वच त्यांनी लीलया गायले, हेही एक दैवी लक्षण होते. ८५ व्या वर्षी २५ शीच्या मुलीसारखा सूर हाही दैवीच होता.

मराठी गानविश्वात संतपरंपरा रुजवणारा स्वर !

कुठल्याही आवाज चांगला असलेल्या मराठी मुलीला गाणे म्हणायला सांगितले, तर आतापर्यंत ती ‘केशवा, माधवा’ हे गाणे म्हणत असे. १९७०-८० च्या दशकात ‘मुलगा बघण्याच्या कार्यक्रमा’त कित्येक मुलींनी हे गाणे म्हटल्यावर त्यांची लग्ने जुळलेली आहेत. ही गंमत नव्हे, तर सत्यता आहे. या भक्तीगीताच्या माध्यमातून  सुमनताईंचा स्वर प्रत्येक मराठी घरात पोचला. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे अभंग त्यांनी गायले. त्यातील ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ आणि ‘ॐकार प्रधान रूप गणेशाचे’ हे तर अविस्मरणीय झाले. संत नामदेवांचा ‘देह जाओ अथवा राहो’ हा अभंग किंवा कवि सुधांशु यांची ‘देव माझा विठू सावळा’ ही रचना ऐकत २ पिढ्या मोठ्या झाल्या. ‘तुझ्या कांतीसम रक्तपताका पूर्व दिशा उजळती’ हे ग.दी. माडगुळकरांचे भक्तीगीत अतिशय लोकप्रिय झाले. बहिणाबाईंचे ‘अरे संसार संसार’ असो किंवा अशोकजी परांजपे यांचे ‘केतकीच्या बनी’ असो त्या त्या भावनेची आर्तता त्यांच्या स्वरातून परिपूर्ण व्यक्त झाली.

प्रेमगीतांतही अंतरंगाची ठाव घेणारा स्वर !

‘मृदूल करांनी तारा छेडी’त त्यांनी साडेतीन सहस्रांहून अधिक गाणी १३ भाषांत गायली आणि त्यांतील ‘शब्द शब्द रसिकांच्या गानगंगाजळीत जपून ठेवले’ आहेत. चपखल शब्द आणि उत्कृष्ट संगीत यांना तितक्याच तोडीचा स्वर लाभला, तर काय होते, यासाठी ‘ना तुम हमे जानो’, ‘रहे ना रहे हम’, ‘तुमने पुकारा और हम चले आये’, अशा त्यांच्या अनेक प्रेमगीतांची उदाहरणे देता येतील. ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे’ किंवा ‘नाना करते प्यार’ यांसारखी उडती गाणीही रसिकांच्या लक्षात राहिली. शेवटी ‘रहे ना रहे हम महका करेंगे’ हे त्यांनी त्यांच्या आयुष्यात सिद्ध करून दाखवले. ‘कितीही मोठ्या स्पर्धेच्या युगात ‘अस्सल’ टिकतेच’ हा धडा त्यांच्या व्यक्तीमत्त्वातून घेऊन युवा पिढी स्वतः कष्ट घेण्यावर भर देऊ शकते. केवळ ‘पद्मभूषण’ आणि ‘लता मंगेशकर’च नव्हे, तर महंमद रफी, सुधीर फडके, माणिक वर्मा यांच्या नावांचे पुरस्कारही त्यांना लाभले. त्यांच्या सत्त्वगुणी विलोभनीय व्यक्तीमत्त्वाचे स्मरणरंजन, हीच त्यांना आदरांजली !

स्पर्धा आणि ईर्ष्या या मायाजालापासून दूर राहून दैवी स्वरसाजाची साधना करणार्‍या सुमन कल्याणपूर यांना आदरांजली !