साधकांना साधनेत साहाय्य करणारे आणि संतांप्रती कृतज्ञताभाव असलेले सनातनचे १०२ वे (समष्टी) संत पू. शिवाजी वटकर (वय ७९ वर्षे) !

‘काही वर्षांपासून मला पू. शिवाजी वटकरकाका यांचा जवळून परिचय आहे. ६.१०.२०२५ या दिवशी त्यांचा ७९ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या चरणी त्यांच्या गुणवैशिष्ट्यांची शब्दसुमने मी अर्पण करत आहे.

पू. शिवाजी वटकर

१. शिस्तबद्ध दिनक्रम

पू. वटकरकाका या वयातही प्रतिदिन पहाटे ३.३० वाजता उठतात. ते व्यायाम, सेवा, समष्टीसाठी नामजपादी उपाय इत्यादी नियमित करतात. ते भ्रमणभाषवर संरचना करून संतांची सुवचने अनेक साधकांना पाठवतात. यात त्यांचा कधीही खंड पडलेला नाही.

२. साधकांना साधनेत साहाय्य करणे

सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

पू. काकांना साधकांना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करण्याची पुष्कळ तळमळ आहे. पू. काका महाप्रसाद ग्रहण करण्याच्या वेळी प्रतिदिन वेगवेगळ्या साधकांच्या समवेत बसून त्यांना साधनेतील विविध विषयांवर सूत्रे सांगून अंतर्मुख करतात. माझी साधना आणि सेवा चांगली होण्यासाठी ते मला प्रतिदिन काही सूत्रे सांगतात. ‘मी साधनेत पुढे जावे’, याची माझ्यापेक्षा त्यांनाच अधिक तळमळ आहे.

३. शिकण्याची वृत्ती

अ. पू. काकांनी वयाच्या ७९ व्या वर्षी भ्रमणभाषमध्ये सुवचनांची संरचना करणे शिकून घेतले आहे.

आ. आजही ते त्यांना शिकायला मिळालेले प्रत्येक सूत्र त्यांच्या वहीत नोंद करून ठेवतात.

४. संतांप्रती कृतज्ञताभाव

४ अ. जीवनातील संतांचे अनन्य साधारण महत्त्व जाणून संतांविषयी कृतज्ञताभावाने बोलणे : पू. काका संतांविषयी सतत कृतज्ञताभावाने बोलतात. पू. वटकरकाका सांगतात, ‘‘मी अतिशय सामान्य व्यक्ती आहे. माझ्यावर संतांची अतिशय कृपा आहे. प.पू. भक्तराज महाराज, त्यांचे शिष्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, प.पू. काणे महाराज, प.पू. जोशीबाबा आणि परात्पर गुरु पांडे महाराज’ यांचे माझ्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे.’’ असे सांगतांना पू. काकांचे डोळे भरून येतात.

४ आ. पू. वटकरकाकांनी संतांच्या जीवनातील बोधप्रद प्रसंग सांगितल्यावर साधक सद्गदित होणे : पू. काकांना संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत कबीर, संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर इत्यादी अनेक संतांविषयीच्या गोष्टी मुखोद्गत आहेत. पू. काका एखाद्या प्रसंगात एखाद्या संतांच्या जीवनातील एखादा प्रसंग सांगतात. तेव्हा त्यांचे बोलणे ऐकून साधक सद्गदित होतो आणि भावविश्वात रमून जातो.

५. शरणागतभाव

पू. काका प्रत्येक गोष्टीत स्वतःची असमर्थता कथन करतात आणि सर्व श्रेय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना देतात. ‘पू. काका सतत शरणागतभावात असतात’, असे मला जाणवते. ‘गुरुदेव, पू. वटकरकाकांमधील गुण आम्हा सर्व साधकांमध्ये येवोत’, अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करते.’

– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.९.२०२५)