सप्तकोटी तीर्थोद्धार ठराव सर्वानुमते संमत !

दिवाडी (गोवा), ४ ऑक्टोबर (वार्ता.) – भारताला सामर्थ्यशाली बनवायचे असेल, तर हिंदूंचे संघटन करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शनपर उद्गार अयोध्येतील ‘श्रीरामजन्मभूमी न्यासा’चे कोषाध्यक्ष, तसेच ‘महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान’चे संस्थापक प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी येथे काढले.
गीता परिवार, गोवा आणि हिंदवी स्वराज्य, देववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच गोवा सरकारच्या सहकार्याने दिवाडी येथील सप्तकोटी तीर्थ देववाडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘कोटी तीर्थोद्धार’ या ‘पुनर्जीर्णोद्धार ठराव सोहळ्या’त ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, तसेच केंद्रीय राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांचे चिरंजीव तथा या कार्यक्रमाचे आयोजक श्री. सिद्धेश श्रीपाद नाईक, हिंदवी स्वराज्य देववाडीचे अध्यक्ष श्री. पुंडलिक भोमकर, गीता परिवाराचे गोवा राज्याचे समन्वयक ईश्वर कुबल, समन्वयक संगीता जाधव, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
प.पू. स्वामीजी पुढे म्हणाले, ‘‘आज आपल्या देशासमोर अनेक समस्या ‘आ’ वासून उभ्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी ‘शिवचरित्र’ हा एकमेव आधार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु धर्माचे साकार रूप होत. त्यांनीच या सप्तकोटेश्वर मंदिराची पुन्हा उभारणी केली. या तीर्थोद्धारातून हिंदूंना प्रेरणा मिळेल. राष्ट्राचा कणा ताठ ठेवायचा असेल, तर हिंदुत्व प्रबळ आणि जागृत ठेवावे लागेल अन् हिंदुत्व जागृत ठेवण्यासाठी हिंदूंना संघटित करावे लागेल.’’
हिंदु परंपरा नष्ट करू पहाणार्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता ! – राजेंद्र आर्लेकर
केरळचे राज्यपाल श्री. राजेंद्र आर्लेकर म्हणाले, ‘‘आज समाजात अनेक कुप्रवृत्ती आहेत. या प्रवृत्ती हिंदूंच्या परंपरांवर आघात करून त्या नष्ट करू पहात आहेत. असे करू पहाणार्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. संपूर्ण गोव्यात गावागावांतून यात्रा काढून सप्तकोटी तीर्थोद्धाराचा संदेश पोचवला पाहिजे.’’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सिद्धेश नाईक यांनी केले, तर सूत्रसंचालन गीता परिवाराचे गोवा राज्याचे अध्यक्ष श्री. दीपक आमोणकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सप्तकोटी तीर्थोद्धाराचा मांडण्यात आलेला ठराव उपस्थितांनी हात उंचावून घोषणा देत संमत केला.

श्री सप्तकोटीश्वराचे पौराणिक माहात्म्य !‘श्री सप्तकोटीश्वर देवस्थान’ हे गोमंतकातील प्राचीन देवस्थानांपैकी एक असून त्याचे पौराणिक माहात्म्य पुष्कळ मोठे आहे. या देवस्थानाच्या अद्भुत इतिहासाची परंपरा चित्तवेधक आहे. ‘कोकणात महादेवाची १० पुण्यक्षेत्रे आहेत’, असे मानले जाते. ‘त्यांपैकी ६ अत्यंत श्रेष्ठ गणली जात असून त्यांमध्ये नार्वे या क्षेत्राचा समावेश होतो’, असा उल्लेख ‘संगमेश्वर क्षेत्र माहात्म्य’मध्ये आढळतो. गोमंत पर्वतावर त्रिहोत्रपुरातील प्रमुख देव श्री मांगिरीश महादेव, श्री महालक्ष्मी, श्री महालसा, श्री शांतादुर्गा, श्री नागेश, श्री सप्तकोटीश्वर इत्यादी पुष्कळ देवता परशुरामाने आणल्या आणि त्या गोमंतकात स्थापन केल्या. सह्याद्रीच्या पायथ्यापासून उगम पावलेल्या पंचनद्यांचा समुद्राशी जिथे संगम झाला आहे, तेथे सप्तर्षींनी अनुमाने ७ कोटी वर्षे कठोर तपश्चर्या केली असता महादेवांना त्यांची करुणा आली. महादेवांनी प्रसन्न होऊन या ऋषींना इच्छित वर मागण्यास सांगितला, तेव्हा ते ब्रह्मज्ञानी ऋषी म्हणाले, ‘‘हे महेश्वरा, जर वर द्यायचा असेल, तर ज्याच्या कृपेसाठी आम्ही ७०० कोटी वर्षे तप केले आहे, तेवढी वर्षे त्याच नावाने तेजोरूप होऊन तुम्ही येथे रहा.’’ त्या सर्व ऋषिमुनींच्या वचनाचा आदर करून ‘सप्तकोटीश’ या नावाने तेजोरूप लिंग होऊन देव तेथे राहिले. सप्तर्षींचा स्वामी या अर्थाने त्याला ‘सप्तनाथ’ असेही म्हणतात. सांप्रत ‘सप्तकोटीश्वर’ किंवा ‘सप्तकोटेश्वर’ हे नाव प्रचलित आहे. सप्तकोटीश्वराचे लिंग सोने, रूपे, तांबे, लोखंड, कथील, शिसे आणि कांस्य, या सप्तधातूंपासून रसाने बनले आहे. श्री सप्तकोटीश्वर या दैवताची मूळ स्थापना जुन्या गोव्यासमोर दिवाडी (दीपवती) या बेटाच्या उत्तर भागात नार्वे क्षेत्रात झाली होती. त्यानंतर सोळाव्या शतकात स्थलांतर करून ते आजच्या नार्वे (भतग्राम) गावात गेले. |
सप्तकोटी तीर्थोद्धार कार्यक्रमातील ठरावात मांडण्यात आलेली सूत्रे
१. गोमंतकाची जीवनदायिनी कुशावती अन्य ४ छोट्या नद्यांसहित गोमती (मांडवी) आणि अघनाशिनी (जुवारी) या सप्तगंगांचे ज्या ठिकाणी मीलन होते, त्या पवित्र तीर्थस्थानी वसलेला सप्तगंगा तीर्थांचा श्रद्धेय अधिपती सप्तकोटीश्वर हे गोमंतकाचे आराध्य दैवत आहे.
२. कदंब राजघराण्याने ज्याची मनोभावे भक्ती करून त्यांची राजवट उत्कर्षाप्रत नेली, ज्या शिवलिंगाचे माहात्म्य केदारलिंगाहून अधिक आहे. श्री काशीक्षेत्राहून ज्या तीर्थक्षेत्राचे माहात्म्य कणभर सरस आहे, असा ज्या क्षेत्राचा महिमा स्कंदपुराणातील सह्याद्री खंडात वर्णिला आहे. ज्याच्या दर्शनाने पापनाश आणि स्पर्शाने मुक्ती यांचा लाभ होतो, असा विश्वास पुरातन काळापासून आमच्या पूर्वजांनी मनात बाळगला, त्या महातीर्थक्षेत्राच्या जीर्णोद्धारासाठी गोमंतकीय आसुसले आहेत.
३. सप्तऋषींनी सप्तकोटी वर्षे तपश्चर्या करत गोकुळाष्टमीच्या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करून सप्तकोकणाच्या मध्यभागी असलेल्या गोमंतकातील सप्तद्विपांमधील दीपवती बेटावरील सप्तत्रिसंगमाच्या सप्तगंगा तीर्थावर सप्तधातूमय लिंगाची स्थापना केली म्हणून ज्याला श्री सप्तकोटीश्वर आणि सप्तऋषींचा स्वामी म्हणून श्री सप्तनाथ हे नाव पडले, त्या महातीर्थक्षेत्राचा जीर्णोद्धार ‘याचि देही, याचि डोळा पहाण्यासाठी गोमंतकियांची मने आतुर झाली आहेत.
४. भगवान श्रीकृष्णाने त्याचा अत्याचारी मामा कंस याचा वध केल्याने कृद्ध झालेला कंसाचा सासरा जरासंध याने भगवान श्रीकृष्णाला ठार मारण्यासाठी तब्बल १८ वेळा मथुरेवर स्वारी केली. तेव्हा आपल्यामुळे मथुरेची नासधूस नको म्हणून भगवान श्रीकृष्ण गोमंतभूमीत आले आणि श्री सप्तकोटीश्वराचा वर प्राप्त करून जरासंधाला गोमंत भूमीतून पळवून लावले. त्यामुळे मुक्तीलाभासाठी तीर्थस्नान करण्यास गोकुळाष्टमीला भरणार्या तीर्थयात्रेस देशभरातून जिथे सहस्रावधी भक्तगणांचा महासागर लोटायचा, त्या पवित्र तीर्थक्षेत्राचा जीर्णोद्धार पहाण्यासाठी ‘अवयव सगळे नयनी जमले’, अशी आम्हां सर्वांची अवस्था झाली आहे.
५. सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी तिसवाडी बेटावरील मंदिरे नष्ट करून हिंदूना पिटाळून लावले, त्याच शतकात छत्रपती शिवाजी माहाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्या वेळी सप्तकोटीश्वर देवस्थान दीपवती/देववाडी (दिवाडी) बेटावरून डिचोली तालुक्यातील नार्वे येथे सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. म्हणून ज्या स्थानाला पोर्ने तीर्थ (जुने तीर्थस्थान) असे संबोधले जाते, त्या स्थानावर श्री सप्तकोटीश्वराचे दिमाखाने झालेले पुनरागमन पहाण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत.
६. म्हणून कोकणकाशी असा ज्याभूमीचा उल्लेख केला जातो, त्या देवभूमी गोमंतकातील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तकोटीश्वर तीर्थक्षेत्राचा दीपवती/देववाडी (दिवाडी) बेटावर जीर्णोद्धार करण्यासाठी गोवा शासनाने विनाविलंब पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी या ठिकाणी जमलेली सप्तकोटीश्वराची समस्त भक्तमंडळी अयोध्येतील श्रीराममंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष तथा मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी न्यासाचे उपाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद गिरि यांच्या पावन नेतृत्वाखाली आयोजित सोहळ्यात, केरळ राज्याचे राज्यपाल श्री. राजेंद्र आर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करत आहे.
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !