Cheque Clearance Rule : आता एका दिवसात धनादेश वटणार !

देहली – ४ ऑक्टोबरपासून अधिकोषात (बँकेत) भरलेला धनादेश (चेक) ज्या दिवशी भरला जाईल, त्याच दिवशी वटणार आहे आणि संबंधित खात्यात रक्कम जमा होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार ४ ऑक्टोबरपासून सर्व अधिकोषांना एका दिवसात धनादेश वटवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता धनादेशाद्वारे व्यवहार करणे जलद आणि सोपे होणार आहे. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत धनादेश भरता येणार आहेत.

१. एच्.डी.एफ्.सी. बँक, आयसीआयसीआय बँक यांनी त्यांच्या ग्राहकांना या पालटाची माहिती दिली आहे, तसेच धनादेश ‘बाउन्स’ (न वटणे) होण्यापासून टाळण्यासाठी खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक ठेवण्याचे आणि सर्व तपशील अचूक भरण्याचे आवाहन केले आहे. याआधी धनादेश वटण्यासाठी १-२ दिवसांचा कालावधी लागत होता.

२. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार ही नवी पद्धत २ टप्प्यांत लागू होणार आहे. पहिला टप्पा ४ ऑक्टोबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ या काळात असेल, तर दुसरा टप्पा ३ जानेवारीनंतर लागू होईल.

३. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी अधिकोषांनी ‘पॉझिटिव्ह पे’ प्रणालीचा वापर करण्याचे सुचवले आहे. या पद्धतीत धनादेश सादर करण्यापूर्वी त्यातील प्रमुख तपशील अधिकोषाकडे देणे आवश्यक आहे. ५० सहस्र रुपयांहून अधिक रकमेच्या धनादेशासाठी खातेदारांनी किमान २४ कार्यालयीन घंटे आधी खाते क्रमांक, धनादेश क्रमांक, दिनांक, रक्कम आणि लाभार्थीचे नाव कळवणे आवश्यक आहे. धनादेश सादर करतांना अधिकोषाकडून हे तपशील पडताळले जातील. माहिती जुळल्यास धनादेश वटवला जाईल अन्यथा विनंती नाकारली जाईल आणि धनादेश जारी करणार्‍याला पुन्हा तपशील द्यावे लागतील.